ऑनलाइन लोकमत कारगिल-द्रास सेक्टरमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये लढल्या गेलेल्या चौथ्या युद्धात आजच्याच दिवशी २६ जुलै १९९९ रोजी भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला होता. या संपूर्ण मोहिमेला ऑपरेशन विजय नाव देण्यात आले होते. ६० पेक्षा जास्त दिवस लढल्या गेलेल्या या युद्धामध्ये भारताचे ५२७ जवान शहीद झाले. १९६५ आणि १९७१ पेक्षा या युध्दाचे स्वरुप वेगळे होते. या दोन्ही युद्धामध्ये भारतीय सैन्य सीमा ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत घुसले होते. पण कारगिल युद्धाच्यावेळी भारताने आपल्या हद्दीत राहून पाकिस्तानी सैन्याने बळकावलेली ठाणी आणि भूप्रदेश पुन्हा ताब्यात ताब्यात घेतला. कारगिल युद्धामध्ये भारतीय जवानांनी आपल्या प्राणांची पर्वा न करता सर्वोच्च पराक्रम दाखवला. ज्यामुळे शत्रू फक्त चीत झाला नाही तर, त्याला तिथून पळ काढावा लागला. आणखी वाचा कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानचा एअरबेस नेस्तनाबूत करण्याची केली होती तयारीकारगिल आमची चूक, वाजपेयींच्या पाठित खंजीर खुपसला - नवाझ शरीफमुशर्रफ बरळले, म्हणे कारगिलमध्ये पाकने भारताचा गळाच पकडला होता या लढाईत तोलोलिंग आणि टायगर हिलवरील ताब्यानंतर कारगिल युद्धाचे पारडे पूर्णपणे भारताच्या बाजूने वळले. चार जुलैला भारताने टायगर हिलवर ताबा मिळवला. हा पाकिस्तानसाठी रणनितीक आणि मानसिक दृष्टया मोठा धक्का होता. कारगिल युद्धातील शहीद जवानांच्या स्मरणार्थ दरवर्षी कारगिल-द्रास सेक्टर आणि नवी दिल्लीत कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. या दिवशी दरवर्षी इंडिया गेटवरील अमर जवान ज्योती येथे पंतप्रधान शहीद जवानांना आदरांजली वाहतात. असे मिळवले टायगर हिल रणनितीदृष्टया टायगर हिल का महत्वाचे - टायगर हिल कारगिल- द्रास क्षेत्रातील सर्वोच्च शिखर आहे. हिवाळयात घुसखोरी करुन पाकिस्तानी सैन्याने इथे ताबा मिळवला होता. टायगर हिलवरुन पाकिस्तानी सैनिक सहजतेने राष्ट्रीय महामार्ग एकवर नजर ठेऊ शकत होते. या शिखरावरुन श्रीनगर-लेह मार्ग तसेच ५६ ब्रिगेडचे लष्करी मुख्यालय टप्प्यात येत होते. उंचावर बसलेला शत्रू राष्ट्रीय महामार्गाच्या २५ कि.मी.च्या टप्प्यातील भारतीय लष्कराच्या हालचालींना सहजतेने लक्ष्य करत होता. पाकिस्तानने बळकावलेला भूप्रदेश पुन्हा ताब्यात घेण्यासाठी टायगर हिलवर ताबा मिळवणे त्यासाठी महत्वाचे होते. - तीन जुलैच्या संध्याकाळी सातच्या सुमारास भारतीय लष्कराने टायगर हिल ताब्यात घेण्याची कारवाई सुरु केली. १८ ग्रेनेडीयन्सकडे या मोहिमेचे नेतृत्व होते. एकूण २०० जवान या कारवाईत सहभागी होते. अल्फा, चार्ली आणि घाटक अशा तीन गटांमध्ये जवानांची विभागणी करण्यात आली होती. - टायगर हिलच्या लढाईमध्ये भारतीय जवानांनी सर्वोच्च शौर्य, पराक्रम दाखवला. घाटक प्लाटूनकडे १००० फूटाचा सरळ कडा चढून जाण्याचे कठिण आव्हान होते. योगेंद्र सिंह यादव सर्वप्रथम या कडयावर पोहोचला व इतर सहका-यांची दोरखंडाच्या सहाय्याने कडयावर पोहोचण्याची व्यवस्था केली. ही चढाई सुरु असताना शत्रूचे हालचालींवर लक्ष गेले व त्यांनी गोळीबार केला. यामध्ये कंपनी कमांडरसह तीन जवान शहीद झाले. यादवच्या खांद्यालाही गोळी लागली. पण त्याने या परिस्थितीतही शत्रूवर गोळया, ग्रेनेडचा वर्षाव केला आणि पाकिस्तानच्या चार सैनिकांना कंठस्नान घातले. या पराक्रमासाठी योगेंद्र सिंह यादवला परमवीर चक्र या सर्वोच्च शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.