पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 13:44 IST
1 / 8दोन दिवसांपूर्वी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने भारत-पाकिस्तानमध्ये उरल्या सुरलेल्या संबंधांनाही तोडले आहे. भारताने या दहशतवादी हल्ल्याविरोधात पाकिस्तानसोबतचा गेल्या ६० वर्षांपासूनचा सिंधू जल करार रद्द केला आहे. याविरोधात पाकिस्तानने देखील शिमला करारासह अन्य द्विपक्षीय करार निलंबित केले आहेत. अशातच पाकिस्तानची नांगी ठेचण्यासाठी भारताने सिंधू जल वाटप करार रद्दबातल केला आहे. यातून असे किती पाणी अडविले जाणार आहे, असा प्रश्न देशवासियांना पडला आहे. 2 / 8पाकिस्तानला धक्का देण्यासाठी भारताने सिंधू जलकरार निलंबित केला असला तरी आपल्याकडे तेवढे पाणी रोखण्याची ताकद आहे का? हा मोठा प्रश्न आहे. एवढेच नाही तर पाकिस्तानला याचा काय आणि किती खोलवर फटका पडू शकतो, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. चला पाहुया या प्रश्नांची उत्तरे...3 / 8दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये प्रदीर्घ तणाव असूनही गेली ६० वर्षे हा करार शाबूत होता. यामुळे या कराराकडे सर्वात यशस्वी पाणीवाटप करार म्हणून पाहिले जात होते. १९६० च्या सिंधू पाणी करारानंतर भारत आणि पाकिस्तानने १९६५, १९७१ आणि १९९९ अशी तीन युद्धे लढली आहेत. तसेच गेली साडेतीन दशके भारत दहशतवादाचा शिकार झालेला आहे. 4 / 8तीन युद्धे झेलणारा हा करार कालच्या दहशतवादी हल्ल्यात संपुष्टात आला आहे. ऐन उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाकिस्तानला जाणारे पाणी रोखण्याची कल्पना चांगली असली तरी भारत सध्याच्या बंधाऱ्यांच्या क्षमतेनुसार केवळ ५ ते १० टक्केच पाणी रोखू शकतो. बंधारे, धरणे बांधण्यासाठी वेळ लागतो. कित्येक वर्षे खर्ची पडतात. अद्याप असे इन्फ्रास्ट्रक्चर नाहीय. मोदी सरकारला ते निर्माण करण्यासाठी पाऊले उचलावी लागणार आहेत. यास कित्येक वर्षे जाण्याची शक्यता आहे, परंतू एक गोष्ट चांगली आहे ती म्हणजे याला आता सुरुवात होणार आहे. 5 / 8पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाने हजारो भारतीयांचे बळी घेतले आहेत. तरी देखील भारताने पाकिस्तानवर दया दाखवत स्वत:ला २० टक्के तर पाकिस्तानला ८० टक्के पाणी देणे सुरुच ठेवले होते. या करारामुळे भारत या नद्यांवर जास्त मोठे निर्माण करू शकत नव्हता. २०१९ मध्ये केंद्रीय मंत्री गडकरी यांनी पुलवामा हल्ल्यानंतर सिंधू नदीचे पाणी रोखण्याची धमकी दिली होती. ती आता प्रत्यक्षात येणार आहे. 6 / 8या करारानुसार पूर्वेकडील तीन नद्या रावी, बियास आणि सतलजवर भारताचा अधिकार होता, तर पश्चिमेकडील नद्यांचे पाणी सिंधू, चिनाब आणि झेलम पाकिस्तानला दिले जाते. परंतु भारताला या नद्यांचे पाणी शेती आणि इतर कारणांसाठी वापरण्याचा अधिकार होता. सिंधू, चिनाब आणि झेलम नद्यांच्या एकूण १६.८० कोटी एकर फूट पाण्यापैकी ३.३० एकर फूट पाणी भारताला देण्यात आले होते. जे एकूण पाण्याच्या २० टक्केच होते. 7 / 8कराराची कायमस्वरुपी अंलमबजावणी होते का हे पाहण्यासाठी सिंधू आयोग स्थापन करण्यात आला होता. दोन्ही बाजूंनी एक आयुक्त नियुक्त करण्यात आला. दोघेही आपापल्या सरकारचे प्रतिनिधित्व करतात. आता हे दोघेही निलंबित झाले आहेत. 8 / 8पाकिस्तानची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. परंतू, तिथे भारतासारख्या नद्या नाहीत. यामुळे तेथील शेती त्या पाण्यावर जगू शकत नाही. पाकिस्तानात ज्या काही छोट्या मोठ्या नद्या आहेत, त्यांचा पाण्याचा स्तर खालावलेला आहे. यामुळे भारताच्या या तीन नद्या पाकिस्तानची तहान भागवितात. जर हे पाणी पाकिस्तानला मिळाले नाही तर त्यांची अर्थव्यवस्था उध्वस्त होणार आहे.