Joshimath Sinking News: कुठे भूस्खलन, तर कुठे जमिनीतून येणारं पाणी; डेंजर झोनमध्ये जोशीमठ, कुठे जाणार हजारो लोक?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2023 09:20 AM2023-01-08T09:20:22+5:302023-01-08T09:33:34+5:30

सध्या जोशीमठमध्ये होणारे भूस्खलन, भिंतींना गेलेले तडे आणि रस्त्यांना पडलेल्या मोठ-मोठ्या भेगा आणि सुरू असलेल्या आंदोलने देशात चर्चेचा विषय ठरली आहेत.

Joshimath Sinking News: जोशीमठ हे उत्तराखंडमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. मात्र सध्या जोशीमठमध्ये होणारे भूस्खलन, भिंतींना गेलेले तडे आणि रस्त्यांना पडलेल्या मोठ-मोठ्या भेगा आणि सुरू असलेल्या आंदोलने देशात चर्चेचा विषय ठरली आहेत. जोशीमठमधील ९ हून अधिक भागातील ६०३ घरांना मोठे तडे गेले आहेत.

जोशीमठामधील लोक सध्या भीतीच्या वातावरणात जगत आहेत. येथील लोकांना अन्य ठिकाणी हलवले जात आहे. वारंवार भूस्खलन होत असल्याने छत कोसळण्याची शक्यता आहे. येथे कडाक्याच्या थंडीत लोकांना भीतीच्या छायेत घराबाहेर झोपावे लागत आहे. आपली घरे, शहरे उद्ध्वस्त होताना लोक स्वतःच्या डोळ्यांनी पाहत आहेत.

एका सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की शहरातील सुरक्षित ठिकाणीही भेगा पडल्याच्या घटना घडल्या आहेत. काही हॉटेलांना याचा फटका बसला असून काही ठिकाणी पाण्याचे स्रोत उघडले आहेत, असे आपत्ती व्यवस्थापन सचिव रणजीत सिन्हा यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

जमिनीखालून येणारे पाणी धोकादायक आहे, कारण ते एक प्रकारचे व्हॅक्युम तयार करत आहो. आम्हाला लोकांना सुरक्षित स्थळी हलवायचे आहे. ज्या प्रकारे या भेगा पडत आहेत, त्यावरुन शहरातील बांधकामे वास्तवापासून दूर गेल्याचे अनेकांचे मत असल्याचेही त्यांनी सांगितले.

उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात 6,000 फूट उंचीवर असलेले, बद्रीनाथ आणि हेमकुंड साहिबच्या मार्गावर असलेले जोशीमठ शहर हाय रिस्क भूकंपाच्या 'झोन-V' मध्ये येते. आतापर्यंत शहरातील विविध भागात शेकडो घरांना तडे गेले आहेत. एनटीपीसी प्रकल्पाविरोधात येथेही तीव्र आंदोलन करण्यात आले होते. या धोक्यामागे हे देखील एक कारण असू शकते असे म्हटले जातेय.

अंजली रावत यांच्या जोशीमठ येथील बहुमजली घराचे नुकसान झाले आहे. खांब पडले आहेत, घर पूर्णपणे झुकले आहे आणि जमिन पाण्याने भरली आहे. अंजली यांना आता आपल्या कुटुंबासोबत पालिकेच्या मदत शिबिरातील एका खोलीत राहावे लागत आहे.

रेशन आणि ब्लँकेटपेक्षाही महत्त्वाचे म्हणजे आम्हाला राहण्यासाठी कायमस्वरूपी जागा हवी, असे त्यांचे कुटुंबीय सांगतात. जोशीमठ येथील थंडीपासून बचाव करण्यासाठी हिटर, जागा आणि साधनसामग्रीची गरज आहे. येथे सहा महिन्यांची मुलगीही या मदत शिबिरात या थंडीचा सामना करत आहे, असेही त्यांनी सांगितले.

जोशीमठ येथील लोकांच्या पुनर्वसनासाठी सरकार पावलं उचलत आहे. त्या ठिकाणी सुरु असलेल्या बांधकामांना तात्काळ थांबवण्यात आलंय. लोकांना राहण्यासाठी गेस्ट हाऊस आणि हॉटेलचीही व्यवस्था करण्यात आलीये. पुनर्वसन होईपर्यंत लोकांना भाडंही दिलं जाईल, असं भाजपच्या महेंद्र भट्ट यांनी सांगितले.

जोशीमठातील स्थिती ही चिंतेचा विषय आहे. सर्व वैज्ञानिक आणि आमचे अधिकारी घटनास्थळी आहेत. ज्यामुळे ही मोठी घटना घडली आहे त्याचं कारण शोधले जातेय. परंतु ज्या प्रकारे आता परिस्थिती दिसतेय त्यावरून ती जागा राहण्यायोग्य नाही. म्हणून मुख्यमंत्र्यांनी सर्वांना हलवण्याचे आदेश दिले आहे, अशी माहिती उत्तराखंडचे कॅबिनेट मंत्री गणेश जोशी यांनी दिली.

मिश्रा आयोगाच्या अहवालात जोशीमठच्या मुळाशी जोडलेल्या खडक आणि दगडांना अजिबात धक्का लागता कामा नये, असे सांगण्यात आले. त्याचबरोबर येथे होत असलेले बांधकाम मर्यादित कार्यक्षेत्रात करण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र, आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी होऊ शकली नाही.

एकीकडे जोशीमठामध्ये एनटीपीसीच्या ५२० मेगावॅटच्या प्रकल्पाचे काम सुरू आहे, तर दुसरीकडे हेलांग मारवाडी बायपासचे बांधकामही सुरू झाले आहे. असे प्रकल्प बंद व्हावेत, यासाठी अनेक मोठी आंदोलनेही करण्यात आली. मात्र सरकारने लक्ष दिले नाही. याच काळात जोशीमठामध्ये नव्याने जमीन खचण्याची घटना सुरू झाली आहे.

१९७५ मध्ये आयुक्त मुकेश मिश्रा यांनी एक आयोग स्थापन केला. याला मिश्रा आयोग म्हणत. यामध्ये भूवैज्ञानिक, अभियंते, प्रशासनातील अनेक अधिकारी सामील होते. एक वर्षानंतर आयोगाने आपला अहवाल सरकारला सादर केला. या अहवालात जोशीमठ हे वालुकामय खडकावर वसलेले असल्याचे म्हटले होते.

जोशीमठाच्या पायथ्याशी कोणतेही मोठे काम करता येत नाही. स्फोट, खाणकाम या सर्व बाबींचा उल्लेख या अहवालात करण्यात आला होता. मोठे बांधकाम किंवा खाणकाम करू नये तसेच अलकनंदा नदीच्या काठावर सुरक्षा भिंत बांधावी, येथून वाहणाऱ्या नाल्यांचे संरक्षण करावे, असे सांगण्यात आले, मात्र या अहवालाकडे सरकारने दुर्लक्ष केले, असे सांगितले जात आहे.