Janmashtami: राधा-कृष्णाच्या श्रृंगारासाठी १०० कोटींचे अलंकार, सुरक्षेसाठी १०० जवान, अशी आहे शिंदे राजघराण्याच्या मंदिराची भव्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2021 14:43 IST
1 / 8आज संपूर्ण देशभरात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी केली जात आहे. यानिमित्त आज आम्ही तुम्हाला भगवान श्रीकृष्णाच्या एका खास मंदिराची माहिती देणार आहोत. हे मंदिर मराठेशाहीतील सरदार असलेल्या शिंदेचे वास्तव्य असलेल्या ग्वाल्हेर येथे आहे. 2 / 8शिंदे राजघराण्याशी संबंधित असलेल्या या ऐतिहासिक गोपाल मंदिरामधील राधा-कृष्णाच्या मूर्तींचा मौल्यवान अशा जवाहिरांचा वापर करून शृंगार केला जातो. या दागदागिन्यांची किंमत सुमारे १०० कोटींच्या आसपास आहे. जन्माष्टमी दिवशी बँकेमधून कडेकोट सुरक्षाव्यवस्थेमध्ये हे दागिने मंदिरात आणले जातात. तसेच हे दागिने मंदिरात असेपर्यंत सुरक्षेसाठी १०० पोलीस तैनात केले जातात. 3 / 8ग्वाल्हेरमधील फूलबाग परिसरामध्ये असलेल्या भव्य गोपाल मंदिराची निर्मिती शिंदे राजघराण्याने केली होती. शिंदे राजघराण्यातील तत्कालीन महाराज माधवराव यांनी १९२१ मध्ये या मंदिराचा जिर्णोद्धार केला होता. स्वातंत्र्यपूर्व काळात हे मंदिर शिंदे राजघराण्याकडे होते. मात्र स्वातंत्र्यानंतर शिंदे घराण्याने हे मंदिर आणि मौल्यवान दागदागिने भारत सरकारकडे सुपुर्द केले. तेव्हापासून हे दागिने पालिकेने बँकेच्या लॉकरमध्ये ठेवले आहेत. 4 / 8अनेक वर्षांपर्यंत या दागिन्यांची माहिती कुणालाच नव्हती. २००७ मध्ये तत्कालीन आयुक्त पवन शर्मा यांनी दागिन्यांची माहिती गोळा केली त्यानंतर जन्माष्टमीला या दागिन्यांनी राधा-कृष्णाचा श्रृंगार करण्याची परंपरा पुन्हा सुरू झाली. 5 / 8शिंदे राजघराण्याने राधा-कृष्णाच्या पूजेसाठी चांदीची भांडी तयार केली होती. तसेच देवाच्या श्रृंगारासाठी रत्नजडीत सोन्याचे दागिने बनवले होते. यामध्ये श्रीकृष्णासाठी माणिक, पुखराज जडलेला सोन्याचा मुकुट, सोन्याच्या तारेचे कडे, हिरे, मोती आणि पन्ना जडवलेला सात लड्यांचा हार, सोन्याची बासरी असे दागिने आहेत. तर राधेसाठी रत्नजडीत सोन्याचा मुकुट, सोन्याची नथ, रत्ने जडवलेला पाच लडींचा हार, सोन्या्च्या बांगड्या आणि कंठीही राधेला घातली जाते. 6 / 8जन्माष्टमी दिवशी कडेकोट सुरक्षेमध्ये हे दागिने गोपाल मंदिरात आणले जातात. यावेळी महापालिका आणि प्रशासनाचे अधिकारी उपस्थित असतात. त्यांच्या उपस्थितीमध्ये देवाचा श्रृंगार केला जातो. त्यानंतर मंदिर दर्शनासाठी उघडले जाते. 7 / 8 हे दागिने ग्वाल्हेरमधील सेंट्र्ल बँकेत ठेवले जातात. जन्माष्टमी दिवशी दिवसा हे दागिने मंदिरात आणले जातात. तर रात्री केवळ हे दागिने पुन्हा जमा करण्यासाठी बँक उघडली जाते. दागिन्यांच्या सुरक्षेसाठी गणवेशधारी तसेच साध्या देशातील जवान तैनात असतात. तसेच सीसीटीव्ही कॅमेरेही लावले जातात. 8 / 8गोपाल मंदिरामध्ये जन्माष्टमीनिमित्त हजारोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. जोपर्यंत दागिने गोपाल मंदिरात असतात तोपर्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्था असते. तसेच प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्यावर नजर ठेवली जाते.