शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भारतीय लष्कराची ती चाल आणि चीनला पँगाँगमधून घ्यावी लागली माघार, नॉर्दन आर्मी कमांडरांनी सांगितली इनसाइड स्टोरी

By बाळकृष्ण परब | Published: February 18, 2021 9:05 AM

1 / 8
जवळपास आठ ते नऊ महिने चाललेल्या तणावानंतर अखेर चिनी सैन्याने पँगाँग त्सो परिसराातून माघार घेण्यास सुरुवात केली आहे. भारत आणि चीनमध्ये डिसएंगेजमेंट्सबाबत एकमत झाले आहे. त्यानंतर दोन्ही देशांनी संवेदनशील ठिकाणांवरून लष्कर मागे घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
2 / 8
दरम्यान, अचानक घुसखोरी करून भारताच्या ताब्यातील क्षेत्र बळकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या चिनी ड्रॅगनची चाल भारतीय लष्कराने कशी हाणून पाडली याची इनसाइड स्टोरी आता लष्कराचे नॉर्दन आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल वाय. के. जोशी यांनी सांगितली आहे. इंडिया टुडेशी साधलेल्या संवादात जोशी यांनी ही माहिती दिली आहे.
3 / 8
कारगिल युद्धातील हीरो आणि वीरचक्राने सन्मानित झालेल्या जोशी यांच्याच कमांडखाली भारतीय लष्कराचे लडाखमधील संपूर्ण ऑपरेशन चालले होते. लडाखमध्ये भारतीय लष्कराने केलेल्या Opration Snow leopard बाबत माहिती देताना वाय. के. जोशी यांनी सांगितले की, या कारवाईत भारतीय लष्कराने आपला कुठलाही भूभाग गमावला नाही. पँगाँग त्सोमधून चिनी सैन्याची माघार हा भारताचा विजय आहे.
4 / 8
पूर्व लडाखमधील पँगाँग सरोवराच्या दक्षिण आणि उत्तर किनाऱ्यावर भारतीय लष्कराच्या धडाकेबाज कारवाईमुळे चिनी सैन्य हैराण झाले होते. भारताने अनेक ठिकाणी चीनपेक्षा अधिक रणनीतिक आघाडी घेतली होती. त्यामुळे भारत आपल्या मागण्यांपासून माघार घेणार नाही, त्यामुळे पूर्वस्थितीत जावे लागेल, याची जाणीव चीनला झाली.
5 / 8
या संपूर्ण तणावाच्या काळात भारतीय लष्कराने या परिसरातील काही महत्त्वपूर्ण शिखरांवर केलेला कब्जा हा टर्निंग पॉईंट ठरला. लेफ्टनंट जनरल जोशी यांनी सांगितले की, या आक्रमक कारवाईमुळे बळाचा वापर करून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील स्थिती एकतर्फी बदलता येणार नाही आणि भारत आपल्या भूभागाचे समर्थपणे रक्षण करेल हे चिनी सैन्याला कळून चुकले.
6 / 8
त्यांनी सांगितले की, २९-३० ऑगस्टच्या रात्री रेजांग ला आणि रेचिन ला वर भारतीय लष्कराने कब्जा केला. त्यामुळे भारतीय लष्कराला या परिसरात आघाडी मिळाली. त्यानंतर पुढच्या फेरीत झालेल्या बैठकीत भारताचे पारडे जड झाले.
7 / 8
आता डिसएंगेजमेंटची प्रक्रिया १० तारखेपासून सुरू झाली आहे. डिसएंगेजमेंट पूर्ण झाल्यानंतर कॉर्प्स कमांडर स्तरावरील १०व्या फेरीची चर्चा सुरू होईल. त्यामध्ये गोगरा, हॉटस्प्रिंग आणि डेपसांगमधील स्थितीची चर्चा होईल.
8 / 8
डिसएंगेजमेंटसाठी झालेल्या सहमतीनुसार चीन फिंगर आठवर जाईल. तर भारत मागे हटून फिंगर तीन जवळील आपल्या धनसिंह थापा पोस्टवर येईल. त्याशिवाय पँगाँगच्या दक्षिण किनाऱ्यावरील सैन्याची तैनातीही हटवली जाईल. तसेच परिस्थिती सामान्य होईपर्यंत दोन्ही देश पेट्रोलिंग करणार नाहीत.
टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावladakhलडाखIndian Armyभारतीय जवानchinaचीन