दिल्लीचा प्रसिद्ध लाल किल्ला होत चालला आहे काळा! शास्त्रज्ञांनी सांगितले कारण; म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 11:22 IST
1 / 8मुघल बादशाह शाहजहान यांनी बांधलेला आणि २००७ मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ घोषित केलेला दिल्लीचा लाल किल्ला आता एका नव्या संकटात सापडला आहे. या किल्ल्याचा ऐतिहासिक लाल रंग आता हळूहळू काळा पडू लागला आहे. भारत आणि इटलीतील संशोधकांनी केलेल्या एका संयुक्त अभ्यासात यामागचे धक्कादायक कारण समोर आले आहे.2 / 8अभ्यासानुसार, राजधानी दिल्लीतील अतिप्रदूषणामुळे किल्ल्याच्या लाल बलुआ दगडांच्या भिंतींवर रासायनिक थर तयार होत आहेत, ज्यामुळे किल्ल्याचे सौंदर्य आणि मूळ रचना दोन्ही धोक्यात आल्या आहेत.3 / 8संशोधकांनी केलेल्या तपशीलवार तपासणीत आढळले आहे की, हवेतील विषारी प्रदूषकांमुळे किल्ल्याच्या भिंतींवर 'काळे थर' जमा होत आहेत. हे थर म्हणजे जिप्सम, क्वार्ट्झ आणि शिसे, तांबे व जस्त यांसारख्या जड धातूंनी युक्त प्रदूषण जमावाचे आवरण आहे.4 / 8या काळ्या थरांमुळे केवळ भिंतींचा रंग बदलत नाहीये, तर ते दगडांची झीज देखील होत आहे. २०२१ ते २०२३ दरम्यान झालेल्या आणि जून २०२५ मध्ये 'हेरिटेज जर्नल'मध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासानुसार, किल्ल्याच्या भिंतींवर ५५ ते ५०० मायक्रोमीटर जाडीचे थर विकसित झाले आहेत.5 / 8हा अभ्यास लाल किल्ल्यावर वायुप्रदूषणाच्या रासायनिक प्रभावाचा पहिला विस्तृत तपास आहे. लाल किल्ल्याची ही अवस्था पाहता, जर दिल्लीतील हवेच्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवले नाही, तर नजीकच्या काळात हुमायूं मकबरा आणि सफदरजंग मकबरा यांसारख्या दिल्लीतील इतर ऐतिहासिक स्थळांवरही असाच नकारात्मक परिणाम दिसेल, असा गंभीर इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.6 / 8दिल्लीतील एकूण वायुप्रदूषण कमी करणे ही दीर्घकालीन समस्या असली, तरी लाल किल्ल्याचे स्वरूप वाचवण्यासाठी त्वरित हस्तक्षेप करणे आवश्यक आहे, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.7 / 8अभ्यासात असे म्हटले आहे की, यात सुरुवातीला काळ्या रंगाचा पातळ थर तयार होतो. जर त्यावर त्वरित उपाय केले, तर दगडांना हानी न पोहोचवता तो थर काढता येऊ शकतो. यासाठी संशोधकांनी काही उपाय सुचवले आहेत.8 / 8किल्ल्याच्या उच्च-धोक्याच्या भागांसाठी नियमित देखभाल आणि स्वच्छता कार्यक्रम सुरू करणे. नवे काळे थर तयार होऊ नयेत यासाठी दगडांवर संरक्षक कोटिंग लावणे. असे संरक्षण उपाय किल्ल्याची होणारी झीज कमी करू शकतात आणि भावी पिढ्यांसाठी त्याचा विशिष्ट लाल रंग टिकवून ठेवू शकतात, असा विश्वास शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.