कोरोनाचा उद्रेक, देशात अलर्ट! मोदी सरकार मोठा निर्णय घेणार? दुसरा बुस्टर डोस घ्यावा लागणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2023 12:28 PM2023-01-03T12:28:16+5:302023-01-03T12:34:29+5:30

Coronavirus Updates: जगभरात उद्रेक होत असलेल्या कोरोना विषाणूचा प्रसार भारतात होऊ नये, यासाठी विविध स्तरांवरून खबरदारी घेतली जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून जागतिक स्तरावर चीनसह अन्य अनेक देशांमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला आहे. कोरोना रुग्णांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सेलिब्रेशननंतर जपान, अमेरिका, दक्षिण कोरिया आणि ब्राझीलमध्येही कोरोनाचा विस्फोट झाला आहे.

गेल्या ७ दिवसांत जगभरात कोरोनाचे ३० लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी, महामारीमुळे ९८४७ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. चीनमध्ये झिरो कोविड पॉलिसी मागे घेतल्यापासून कोरोनाने हाहाकार माजवला आहे. चीनच्या आरोग्य व्यवस्थेवर वाईट परिणाम झाला आहे. गर्दीमुळे रुग्णालयांमध्ये बेडच शिल्लक नाहीत.

जगभरात कोरोनाचा संसर्ग तीव्र होत चालला असून, या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या संभाव्य लाटेचा धोका लक्षात घेता भारत सरकार अलर्ट मोडवर आहे. केंद्र सरकारची आरोग्य तज्ज्ञ समिती कोविड-१९ प्रतिबंधात्मक लसींच्या बूस्टर डोसच्या गुणवत्तेवर विचार करत आहे. दुसरा बुस्टर डोस घेण्याबाबत सरकारमध्ये खलबते सुरु आहेत.

पहिला बुस्टर डोस आणि त्याचा परिणाम तसेच गुणवत्ता यांचा कालावधी तपासला जात आहे. सध्या फक्त २८ टक्के लोकांनी बुस्टर डोस घेतला आहे. कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता पाहता, केंद्र सरकारकडून नागरिकांना बूस्टर डोस घेण्याचे आवाहन केले जात आहे. भारताने जानेवारी २०२२ मध्ये कोविड लसीचा बुस्टर देण्यास सुरुवात झाली.

नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप एक्सपर्टने सांगितले आहे की, केंद्र सरकारच्या आरोग्य तज्ज्ञ समितीकडून दुसरा बूस्टर डोसचा घेण्याची गरज आहे का, यावर विचार केला जात आहे. याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सर्व वैज्ञानिक डेटाचा बारकाईने अभ्यास करण्यात येईल.

संशोधनात समोर आलेल्या माहितीनुसार, कोरोना प्रतिबंधात्मक लसीमुळे मिळालेली प्रतिकारशक्ती साधारणपणे चार ते सहा महिन्यांनी कमी होते. तसेच बूस्टर डोस गंभीर आजारापासून बचाव करण्यास मदत करतो. तज्ज्ञ आता दुसरा बुस्टर डोस म्हणजे कोविड लसीचा चौथा डोस घेण्याबाबत आरोग्य प्रशासनाचे निरीक्षण सुरु आहे.

काही डॉक्टरांनी कोविड लसीचा चौथा डोस म्हणजे दुसरा कोविड बुस्टर डोस सुरु करण्याची मागणी केली आहे. अधिक जोखीम असलेल्या लोकांसाठी जसे की, आरोग्य सेवा कर्मचारी, वृद्ध आणि गंभीर आजार असलेल्या लोकांसाठी दुसरा बुस्टर डोस देण्याची विनंती करण्यात आली आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या प्रतिनिधींनी २६ डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांना दुसऱ्या बुस्टर डोसबाबत सांगितले आहे. आरोग्य सेवा आणि फ्रंटलाइन कामगारांसाठी सुमारे एक वर्षापूर्वीच कोविड लसीचा तिसरा डोस देण्यात आला होता.

आम्ही आरोग्यमंत्र्यांना नागरिकांसाठी, विशेषत: डॉक्टर, परिचारिका, रुग्णालयातील इतर कर्मचारी आणि फ्रंटलाइन कामगार ज्यांना रुग्णांचे व्यवस्थापन करावे लागते आणि ज्यांना संसर्गाचा जास्त धोका असतो त्यांच्यासाठी दुसरा कोविड बूस्टर डोस देण्याबाबत निर्णय घेण्याचे आवाहन केले आहे, असे संघटनेचे माजी अध्यक्ष डॉ. जे.ए. जयलाल यांनी सांगितले.

केंद्र सरकारकडून सध्या बूस्टर डोस देण्यावर भर दिला जात आहे. आरोग्य विभागाकडून नागरिकांना वारंवार बूस्टर डोस घेण्याचे आवाहन केले जात आहे. सध्या केंद्र सरकारचे लक्ष तिसऱ्या डोसचे देण्याचे प्रमाण वाढविण्यावर आहे. आतापर्यंत देशातील फक्त २८ टक्के लोकांनी बुस्टर डोस घेतला आहे.

केंद्र सरकारच्या एका अधिकाऱ्याने सुत्रांना दिलेल्या माहितीनुसार, दुसऱ्या बुस्टर डोसबाबच चर्चा सुरु आहे, पण अद्याप सरकारने याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. सध्या सरकारचे लक्ष्य अधिकाधिक नागरिकांना पहिला बुस्टर डोस देणे हे आहे.