Corona Vaccination: कोरोनाविरोधात आरपारची लढाई; तिसऱ्या लाटेचा धोका असताना देशासाठी तीन मोठ्या गुडन्यूज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2021 04:12 PM2021-08-06T16:12:17+5:302021-08-06T16:16:38+5:30

Corona Vaccination: कोरोना लसीकरण अभियानाला बूस्ट मिळण्याची शक्यता

देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशात दररोज ४ लाखांहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली व्हायची. आता हाच आकडा ५० हजाराच्या खाली आला आहे.

दुसरी लाट ओसरत आली असताना तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. त्यामुळे लसीकरण मोहिमेला वेग देण्याची गरज आहे. मात्र सध्या देशातील अनेक राज्यांत लसींचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याचं दिसत आहे. त्यामुळे अनेकांना पहिला डोसच मिळत नाही. तर काहींना दुसऱ्या डोससाठी मोठी वाट पाहावी लागत आहे.

तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी करण्यासाठी लसीकरणाचा गती देण्याची आवश्यकता आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतासाठी तीन दिलासादायक बातम्या आहेत. सप्टेंबर, ऑक्टोबरपर्यंत भारतात आणखी चार कोरोना लसी उपलब्ध असतील.

केंद्र सरकारमधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार झायडन कॅडिला, बायोलॉजिकल ई, नोवावॅक्स आणि जेनोवा या तार लसी पुढील १ ते २ महिन्यांत देशात उपलब्ध होऊ शकतात.

सप्टेंबरमध्ये देशातील कोरोना लसींचं उत्पादन २० कोटींवर जाऊ शकतं. ऑक्टोबरमध्ये हाच आकडा २५ कोटींवर जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती केंद्र सरकारनं दिली आहे.

पुढील १ ते २ महिन्यांत देशात मोठ्या प्रमाणात कोरोना लसी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे लसीकरण मोहिमेचा वेग वाढू शकतो. कोरोनाची दुसरी लाट संपण्यास अद्याप बराच वेळ असल्याचं केंद्रानं म्हटलं आहे.

देशात आणखी ४ लसी उपलब्ध होत असताना मेड इन इंडिया कोवॅक्सिनचं उत्पादनदेखील वाढणार आहे. कोवॅक्सिन लस भारत बायोटेकनं तयार केली आहे. लसीसाठीचं संशोधन भारतात झालं असून उत्पादनही भारतात झालं आहे.

भारतात अनेकांनी कोवॅक्सिन लस घेतलेली आहे. मात्र ही लस घेतलेल्यांना परदेशात जाताना अडथळे येत आहेत. त्या आघाडीवरही दिलासादायक घडामोडी घडत आहेत.

कोवॅक्सिनला जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता मिळावी यासाठी भारत बायोटेकचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठीची प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. १५ ऑगस्टपर्यंत कोवॅक्सिनला जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता मिळू शकते.