शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

राजस्थानात स्टिंग ऑपरेशनं सत्ताधारी अन् विरोधकांमध्ये खळबळ; आमदारांच्या पायाखालची जमीन सरकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 12:38 IST

1 / 10
राजस्थानच्या राजकीय वर्तुळात रविवारी मोठं वादळ आले. या वादळामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोघांच्या पायाखालची जमीन सरकली. आमदार निधीतून काम मंजूर करण्याच्या बदल्यात कमिशन घेण्याचे गंभीर प्रकार समोर येताच मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी तातडीने कठोर कारवाई केली.
2 / 10
मुख्यमंत्र्‍यांनी ३ आमदारांचा निधी गोठवला आहे. त्याशिवाय या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ४ जणांची उच्चस्तरीय समिती नेमली आहे. येत्या १५ दिवसांत या समितीने चौकशी अहवाल मुख्य सचिवांना सोपवावा असा निर्देश भजनलाल शर्मा यांनी दिले आहेत. दैनिक भास्करने हे स्टिंग ऑपरेशन केले आहे.
3 / 10
आमदार निधी घोटाळ्यात खिंवसर येथील भाजपा आमदार रेवतराम डांगा, हिंडौन येथील काँग्रेस आमदार अनिता जाटव आणि बयानाच्या अपक्ष आमदार डॉ. रितू बनावत यांची नावे समोर आली आहेत. या आमदारांनी आपापल्या मतदारसंघात आमदार निधीतून काम मंजूर करण्याच्या बदल्यात कमिशन मागितल्याचा आरोप आहे. हे प्रकरण लोकांसमोर उघडकीस होताच सरकारने ही कारवाई करत संबंधित विधानसभा मतदारसंघातील निधी गोठवला आहे.
4 / 10
आमदार निधीतील भ्रष्टाचाराचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा स्टिंगच्या माध्यमातून केलेला पर्दाफाश आहे, ज्यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की, विकासकामांची शिफारस करण्याच्या नावाखाली आमदारांनी उघडपणे ४० टक्के कमिशन मागितले. या स्टिंगमध्ये एका डमी फर्मचा मालक असल्याचे भासवणाऱ्या एका व्यक्तीने खादी ग्रामोद्योग मंडळाशी संलग्न असल्याचा दावा करून आमदार निधीतून शाळांना गालिचे/कार्पेट पुरवण्याचा प्रस्ताव दिला होता.
5 / 10
कामाची प्रत्यक्ष गरज किंवा खर्च यावर चर्चा झाली नाही. मात्र आमदारांचे लक्ष एकाच प्रश्नावर राहिले 'आम्हाला किती मिळणार?' खिंवसर येथील भाजपा आमदार रेवंतराम डांगा यांनी ४० टक्के कमिशनच्या बदल्यात ५० लाख रुपयांचे काम देण्याचे बोलले तर हिंडौन येथील काँग्रेस आमदार अनिता जाटव यांनी ५० हजार रुपयांचे आगाऊ पैसे घेऊन ८० लाख रुपयांच्या कामासाठी शिफारस पत्र दिले.
6 / 10
दुसरीकडे बयाना येथील अपक्ष आमदार रितू बनावत यांनी ४० लाखांचे डील फायनल करण्याचा दावा केला. डांगा आणि अनिता यांनी जिल्हा परिषदेच्या सीईओ यांच्या नावे पत्रही दिले होते. उल्लेखनीय म्हणजे राजस्थानात प्रत्येक आमदाराला मतदारसंघातील विकास कामांसाठी दरवर्षी ५ कोटी मिळतात. ज्याचा उद्देश जनकल्याणासाठी असतो, मात्र कमिशनखोरीमुळे निधी वाटप चर्चेत आले आहे.
7 / 10
स्टिंग ऑपरेशनमध्ये आमदार निधीतील घोटाळा समोर आल्याने सर्वच आमदारांची झोप उडाली आहे. भाजपा आमदार रेवंतराम डांगा यांनी या व्हिडिओत केवळ स्वत:च्या सौद्याची पोलखोल केली नाही तर अधिकाऱ्यांनाही थोडे थोडे द्यावे लागते असं म्हटलं. डांगा यांनी १० लाख रूपये आगाऊ आणि ५० लाखांच्या कामाचे शिफारस पत्र देत अनेक कामांमध्ये ४० टक्के कमिशन चालते असं म्हटलं आहे.
8 / 10
जेव्हा रिपोर्टरने २५ ते ३० टक्के कमिशन घेण्यास सांगितले तेव्हा डांगा यांनी त्यांच्या प्रदीर्घ राजकीय अनुभवाचा हवाला देत मला सर्व सिस्टम माहिती आहे. अधिकाऱ्यांना हाताशी धरायला लागते नाहीतर ते कामे अडवतात असं सांगितले. तर हिंडोन येथील काँग्रेस आमदार अनिता जाटव यांनी अधिकाऱ्यांकडून काम रोखले जाईल या तक्रारीवरून थेट डिल करण्याची हमी दिली.
9 / 10
मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत स्पष्ट शब्दात आमदार निधी वाटपात भ्रष्टाचाराचा आरोप गंभीर असल्याचे म्हटलं. सरकार भ्रष्टाचाराविरोधात कठोर कारवाई करेल. जनतेचा पैसा जनकल्याणासाठी असतो, कुणाचा खिशा भरण्यासाठी नव्हे. यातील दोषींवर योग्य कारवाई होईल. कुणालाही सोडणार नाही असं मुख्यमंत्र्‍यांनी सांगितले.
10 / 10
दरम्यान, राजस्थानातील या स्टिंग ऑपरेशनमुळे ना केवळ सत्ताधारी भाजपाला फटका बसला आहे तर विरोधी काँग्रेसनेही याची दखल घेतली आहे. काँग्रेसने आमदार अनिता जाटव यांच्यावरील आरोपा प्रकरणी ३ सदस्यीय समिती बनवली आहे. जर त्यात ते दोषी आढळले तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती प्रदेश प्रभारी सुखजिंदर सिंह रंधावा यांनी दिली.
टॅग्स :Rajasthanराजस्थानMLAआमदार