पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 18:43 IST
1 / 6 जम्मू आणि काश्मीर नेहमीच नयनरम्य दऱ्या, बर्फाच्छादित पर्वते आणि सुंदर बागांसाठी लोकप्रिय पर्यटन स्थळ राहिले आहे. काश्मीर घाटीचे सौंदर्य दरवर्षी लाखो पर्यटकांना आकर्षित करते. मात्र, या वर्षी एप्रिलमध्ये पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे राज्याचे संपूर्ण रुपच बदलून गेले. हल्ल्यानंतर सुरक्षा कारणास्तव ५० हून अधिक पर्यटनस्थळे बंद करण्यात आली होती.2 / 6गेल्या १६० दिवसांपासून या स्थळांवर संपूर्ण शांतता पसरली होती. हॉटेल्स, हाउसबोट्स, टॅक्सी सेवा आणि छोटे व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर आले होते. उन्हाळ्यात नेहमी भरलेले हॉटेल्स यंदा १० टक्क्यांपेक्षा कमी बुकिंगवर चालू होती. लाखो लोकांच्या उपजीविकेवर संकट आलेहोते. हा सर्व विचार करुन सरकारने आता १२ पर्यटनस्थळे खुली करण्याचा निर्णय घेतला आहे.3 / 6२९ सप्टेंबर रोजी जम्मू-काश्मीर प्रशासनाने १२ प्रमुख पर्यटनस्थळे पुन्हा सुरू केली आहेत. काश्मीर विभागात: अरु व्हॅली, राफ्टिंग पॉइंट यान्नर, अक्कड पार्क, पादशाही पार्क, कमन पोस्ट, दारा शिकोह गार्डन आणि वझीर बाग सुरू झाले आहेत. तर, जम्मू विभागात: डगन टॉप, रामबन, धग्गर, शिव गुहा आणि रियासी भाग पर्यटकांसाठी खुला झाला आहे.4 / 6सुरक्षा यंत्रणांनी व्यापक पुनरावलोकन केल्यानंतर ही ठिकाणे पुन्हा खुली करण्याचा निर्णय घेतला. यासाठी विशेष सुरक्षा व्यवस्था केली आहे. जागोजागी पोलिस, पॅरामिलिटरी आणि विशेष दल तैनात करण्यात आले आहेत. तसेच, प्रत्येक चेकपॉइंट्सवर ओळखपत्र तपासणी, CCTV कॅमेरे आणि लाइव्ह सर्व्हिलन्स नेटवर्कद्वारे निगराणी ठेवली जात आहे.5 / 6याशिवाय, आपत्कालीन स्थितीत तत्काळ कारवाई करणाऱ्या क्विक रिस्पॉन्स युनिटदेखील तैनात असतील. महत्वाचे म्हणजे, घाटीत रात्रीच्या प्रवासावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच, फक्त सरकारी मान्यता असलेल्या एजन्सीद्वारेच बुकिंग घेतली जात आहे. पहलगाम हल्ल्यातील स्थानिकांचा सहभाग लक्षात घेता, प्रत्येक ठिकाणी संशयास्पद हालचालींवर विशेष लक्ष ठेवले जात आहे.6 / 6पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे काश्मीरच्या पर्यटन उद्योगाला मोठा धक्का बसला होता. २०२५ मध्ये पर्यटकांची संख्या गेल्या वर्षाच्या तुलनेत ७२ टक्क्यांनी घटली. उद्योगांना सुमारे ३५ हजार कोटी रुपयांचे थेट नुकसान झाले. पर्यटन क्षेत्रातील ९० हजारांहून अधिक लोकांच्या नोकऱ्या गेल्या. जुलै अखेरपर्यंत २० लाखांहून अधिक पर्यटकांनी आपल्या बुकिंग रद्द केल्या होत्या. पण, आता परिस्थिती पूर्ववत होण्याची अपेक्षा आहे.