लग्नाची वरात, म्हणून नवरदेव चक्क उंटावरून पोहोचला वधूच्या दारात...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2021 12:48 IST
1 / 7गेल्या वर्षभरापासून देशात पसरत असलेल्या कोरोनाच्या साथीमुळे लग्नसमारंभांसारख्या सोहळ्यांची अडचण झाली आहे. कोविड-१९ बाबतच्या नियमावलीमुळे विवाह सोहळे मर्यादित लोकांच्या उपस्थितीत नियम पाळून करावे लागत आहेत. 2 / 7दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकदा वाढू लागले आहे. विदर्भ, मराठवाडा या भागात रुग्णसंख्या वाढीचा वेग अधिक आहे. या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर एका नवरदेवाने आपल्या विवाह सोहळ्यात घेतलेला एक निर्णय सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या नवरदेवाने लग्नासाठी जाताना घोड्यावरून न जाता चक्क उंटावरून जाण्याचा निर्णय घेतला. 3 / 7कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी लग्नात उपस्थित असलेल्यांपासून सोशल डिस्टंसिंग पाळण्यासाठी नवरदेवाने हा निर्णय घेतला. हा विवाह सोहळा बीडमधील साळेगाव येथे संपन्न झाला. येथील माजी सैनिक असलेल्या महादेव सखाराम वरपे यांचे सुपुत्र अक्षय वरपे याने लग्नामध्ये वरातीला जाताना उंटावरून जाण्याचा निर्णय घेतला. अक्षय वरपे याचा विवाह ऐश्वर्या रणदिवे हिच्यासोबत पार पडला. 4 / 7बीडमधील या गावात कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही आहे. अशा परिस्थितीत बाहेरून आलेल्या पाहुण्यांच्या माध्यमातून कोरोना पसरू नये यासाठी अक्षय आणि त्याच्या वडिलांनी विशेष खबरदारी घेतली होती. 5 / 7अक्षय आणि त्याच्या वडिलांनी विवाहामध्ये सरकारच्या नियमांनुसार पाहुण्यांची संख्या ५० पेक्षा कमी ठेवली. तसेच कोरोनाच्या संसर्गाचा धोका राहू नये यासाठी वरातीमध्ये घोड्याऐवजी उंटाच्या पाठीवर बसून जाण्याचा निर्णय घेतला. 6 / 7ही वरातही साधेपणाने काढण्यात आली. तसेच वऱ्हाडी मंडळींना जिथे शक्य असेल तिथे दोन यार्ड अंतर ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. वधुपक्षाकडील मंडळींनीही सुरक्षेच्या दृष्टीने व्यवस्था केली. 7 / 7मात्र वधुला निरोप कारमधून देण्यात आला. मात्र ही कार ड्रायव्हरऐवजी अक्षय याने स्वत:च चालवत नेली. कोरोनाकाळातील या वेगळेपणामुळे हा विवाह सोहळा संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरला.