शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Uddhav Thackeray Interview: उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीतील टॉप १० मुद्दे; हिंदुत्वापासून बंडखोरीपर्यंत... एका क्लिकवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 09:36 IST

1 / 11
शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत घेतली. या मुलाखतीत ठाकरेंनी सध्या राजकीय घडामोडींवर सडेतोड भाष्य केले. भाजपासह एकनाथ शिंदेंवर घणाघात साधला. याच मुलाखतीतील टॉप १० मुद्दे जाणून घेऊया.
2 / 11
मी त्यांना त्या वेळेला मुख्यमंत्री केलं असतं. त्यांनी आणखी काहीतरी वेगळं केलं असतं. कारण त्यांची भूकच भागत नाही. त्यांना मुख्यमंत्रीपद पण पाहिजे आणि आता शिवसेनाप्रमुख व्हायचंय? शिवसेनाप्रमुखांबरोबर स्वतःची तुलना करायला लागलात? ही राक्षसी महत्त्वाकांक्षा आहे. याला हावरटपणा म्हणतात.
3 / 11
महाविकास आघाडीचा प्रयोग जर का चुकला असता तर लोकांनी उठाव केला असता. जनतेने उठाव केला असता. तसं झालं नाही. जनता आनंदी होती, कारण आल्या आल्याच आम्ही शेतकऱ्याला कर्जमुक्त केलं. त्यानंतर मी अभिमानाने सांगेन की, कोरोना काळात माझ्या मंत्रिमंडळातील सगळ्या सहकाऱ्यांनी, प्रशासनाने आणि जनतेने उत्तम सहकार्य केलं. म्हणून आणि म्हणूनच देशातील ज्या पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये माझं नाव आलं.
4 / 11
एकतर ‘असत्यमेव जयते’ आणि दुसरं वाक्य ‘सत्तामेव जयते.’ त्यामुळे सत्तामेव जयतेपुढे तुम्ही असत्य घेऊन जर काही करणार असाल तर ते लोक खपवून घेणार नाहीत. तसेच लोकं निवडणुकांची वाट पाहात आहेत. आम्हाला पुरावे द्यायची गरज नाही. लोकं म्हणतात निवडणुक येऊ द्या.. यांनाच पुरून टाकतो.
5 / 11
सरकार गेले, मुख्यमंत्रीपद गेले याची खंत नाही; पण माझीच माणसे दगाबाज निघाली. मी रुग्णालयात शस्त्रक्रियेनंतर गुंगीत असताना सरकार पाडण्याचे प्रयत्न झाले. काळात माझ्या कानावर येत होतं की, काहीजण मी बरा व्हावा म्हणून देवावर अभिषेक करत होते आणि काहीजण मी असाच राहावा म्हणून देव पाण्यात बुडवून बसले होते. ते देव पाण्यात बुडवून बसलेले लोक आता पक्ष बुडवायला निघाले आहेत.
6 / 11
मी पक्षप्रमुख, कुटुंबप्रमुख आहे, पण शस्त्रक्रिया झाल्यानंतर माझी हालचाल होत नव्हती. त्या काळात यांच्या हालचाली जोरात सुरू होत्या. हे वेदनादायी सत्य आयुष्यभर माझ्यासोबत राहणार आहे. जेव्हा मी तुम्हाला पक्ष सांभाळण्याची जबाबदारी दिली होती, नंबर दोनचं पद दिलं होतं. पक्ष सांभाळण्यासाठी पूर्ण विश्वास टाकला होता, त्या विश्वासाचा घात तुम्ही केलात.
7 / 11
खरे सांगायचे तर मला चिंता नाहीये. चिंता माझी नाहीये, शिवसेनेची तर बिलकूल नाहीये. मात्र थोडीफार चिंता आहे ती नक्कीच मराठी माणसांची, हिंदूंची आणि हिंदुत्वाची आहे. याचं कारण हिंदुद्वेष्टे, मराठीद्वेष्टे हे आपल्या घरातच आहेत. मराठी माणसांची एकजूट तुटावी, हिंदूंमध्ये फूट पडावी आणि मराठी माणसाची, हिंदूंची एकजूट करण्यासाठी जी मेहनत माननीय शिवसेनाप्रमुखांनी हयातभर केली ती आपल्याच काही कपाळकरंटय़ांच्या हातून तोडावी, मोडावी असा हा प्रयत्न केला जातोय याची मला चिंता आहे.
8 / 11
शिवसेनाप्रमुखांनी हिंदुत्वासाठी राजकारण केले, ते हिंदुत्व मजबूत व्हायला हवे म्हणून! पण हे राजकारणासाठी हिंदुत्व वापरतायत. हा आमच्या आणि त्यांच्या हिंदुत्वातला फरक आहे. शिवसेनेचे राजकारण हे आम्ही हिंदुत्व मजबूत होण्यासाठी केले. पण त्यांचे राजकारण मजबूत करण्यासाठी त्यांनी हिंदुत्व वापरले.
9 / 11
ठाकरे आणि शिवसेना हे नातं तोडून दाखवा, हे माझं त्यांना आव्हान आहे. मात्र ते करताना माझ्या वडिलांचे फोटो लावून मतं मागू नका. स्वतःच्या आई-वडिलांचे फोटो लावावेत आणि मतं मागावीत. “माझे वडील का चोरताय? म्हणजेच काय तुमच्यामध्ये कर्तृत्व नाहीये, तुमच्यात हिंमत नाहीये. तुम्ही मर्द नाहीत. तुम्ही विश्वासघातकी आहात आणि माझा तर विश्वासघात केलाच. लोकांचा विश्वासघात करताना बाळासाहेबांबद्दल संभ्रम निर्माण कशाला करताय? तुम्ही स्वतःला मर्द वगैरे समजता ना? तुमचा मर्दाचा चेहरा घ्या, जा पुढे आणि मागा मतं.
10 / 11
“तुम्ही ज्या बाळासाहेबांचा फोटो लावता, त्या बाळासाहेबांच्या पुत्राला गादीवरून खाली उतरवले? का तर म्हणे हिंदुत्व वगैरे, काँग्रेस-राष्ट्रवादी नको. ठीक आहे, पण आजच्या मुख्यमंत्र्यांची भरसभेतही नाटके पहा. भाजप किती भयंकर म्हणून त्यांनी भरसभेत मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. ती क्लिप फिरतेय. भाजप कसा शिवसैनिकांवर अन्याय-अत्याचार करतो ही ती क्लिप आहे. माझ्याच समोर त्यांनी तो राजीनामा दिला होता,”
11 / 11
स्वतःला मुख्यमंत्री पद त्यांनी अत्यंत वाईट पद्धतीने मिळवले. आता तर शिवसेनाप्रमुखांबरोबर तुलना करायला लागले की, ‘ही आमची शिवसेना’ म्हणून. अत्यंत घाणेरडा, दळभद्री प्रकार आहे. हे बघितल्यानंतर भाजप त्यांना कधी पुढे करेल असे वाटत नाही. नाही तर नंतर ते नरेंद्र मोदींशी स्वतःची तुलना करतील आणि पंतप्रधान पद मागतील. शेवटी लालसा, अशी घाणेरडी असते, ही चटक आहे.
टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपा