बाबा सिद्दिकीच नाही तर या नेत्यांच्या हत्यांनीही हादरली होती मुंबई, समोर आला होता अंडरवर्ल्डचा हात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2024 13:22 IST
1 / 7विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंबईतील हायप्रोफाइल नेते असलेल्या बाबा सिद्दिकी यांच्या हत्येमुळे राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. अनेक वर्षांनंतर मुंबईत एवढ्या मोठ्या नेत्याची हत्या झाल्याने पोलीस, सुरक्षा यंत्रणा आणि सरकारची नाचक्की झाली आहे. दरम्यान, इतिहासात डोकावलं तर मुंबईत अशा अनेक राजकीय हत्या झाल्याचं दिसून येतं. त्यामधील सुमारे अर्धा डझन राजकीय हत्यांमध्ये अंडरवर्ल्डचा हात असल्याचं समोर आलं होतं. यामध्ये भाजपा आणि शिवसेनेच्या काही नामांकित आमदारांसह कामगार नेत्यांचाही समावेश आहे. अशाच काही धक्कादायक हत्यांचा हा आढावा. 2 / 7माजी आमदार बाबा सिद्दिकी यांची जिथे हत्या झाली त्याच परिसरात ३० वर्षांपूर्वी भाजपाच्या एका मोठ्या नेत्याची हत्या झाली होती. भाजपा नेते आणि माजी आमदार रामदास नायक यांची २८ ऑगस्ट १९९४ रोजी सहा हल्लेखोरांनी हत्या केली होती. छोटा शकील याच्या आदेशावरून फिरोज कोकणी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी ही हत्या केली होती. हल्लेखोरांनी एके ४७ मधून केलेल्या गोळीबारात रामदास नायक आणि त्यांचा सुरक्षा रक्षकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर हल्लेखोर दुचाकीवरून पळून गेले होते. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी १२ जणांना त्यात फिरोज कोकणी याचाही समावेश होता. मात्र नंतर तो पोलीस कोठडीतून फरार झाला होता. तर आरोपी कोर्टातून सुटले होते. तर १३ वर्षे चाललेल्या कायदेशीर लढाईनंतर केवळ एका आरोपीला शिक्षा झाली होती. 3 / 7नव्वदच्या दशकात मुंबईमध्ये अशा अनेक राजकीय हत्या झाल्या होत्या. १९९२ मध्ये शिवसेनेचे आमदार विठ्ठल चव्हाण यांची गुरू साटम गँगने हत्या केली होती. पैशांच्या वादातून ही हत्या झाल्याचे सांगण्यात येते. या प्रकरणात कुठल्याच आरोपीला शिक्षा झाली नव्हती.4 / 7 शिवसेना नेते आणि ट्रेड यूनियनचे नेते रमेश मोरे यांची २९ मे १९९३ रोजी ते अंधेरी येथील आपल्या घरी जात असताना चार जणांनी हत्या केली होता. ही हत्या अरुण गवळी टोळीने घडवून आणल्याचा दावा करण्यात येतो. 5 / 7रमेश मोरे यांच्या हत्येनंतर पाच दिवसांनीच ३ जून १९९३ रोजी दोन वेळा भाजपाचे आमदार राहिलेल्या प्रेम कुमार शर्मा यांची दोन बंदूकधारी हल्लेखोरांनी हत्या केली होती. प्रेम कुमार शर्मा हे कुटुंबीयांसह बाहेर भोजनासाठी गेले असताना ही हत्या करण्यात आली होती. प्रेम कुमार शर्मा यांची हत्या करणारे आरोपी हे दाऊद इब्राहिम गँगशी संबंधित होते, असा दावा करण्यात येतो. 6 / 7मुस्लिम लीगकडून आमदार राहिलेल्या जियाउद्दीन बुखारी यांची १९९४ मध्ये भायखळा येथे हत्या करण्यात आली होती. या हत्येमध्ये अरुण गवळी गँगचं नाव समोर आलं होतं. मात्र बहुतांश आरोपी पुराव्यांअभावी सुटले होते. 7 / 7कामगार नेते दत्ता सामंत यांची १६ जानेवारी रोजी एका कामानिमित्त घाटकोपर येथे जात असताना चार हल्लेखोरांनी त्यांच्या कारवर हल्ला केला होता. तसेच गोळ्या झाडून हत्या केली होती. या प्रकरणी २००० मध्ये छोटा राजन आणि त्याच्या दोन शुटर्सनां दोषी ठरवलं होतं. मात्र पुढे या प्रकरणातून छोटा राजनची मुक्तता करण्यात आली होती.