शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

समृद्धी महामार्गावर धावणारी पहिली बस शिर्डीत दाखल; नागपूरहून किती तासांत पोहचली?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 12:31 PM

1 / 10
महाराष्ट्राच्या विकासाची भाग्यरेषा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं उद्धाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रविवारी करण्यात आले. या महामार्गाच्या लोकार्पणामुळे नागपूर-शिर्डी यांच्यातील अंतर कमी झाले आहे.
2 / 10
पंतप्रधानांनी उद्धाटन केल्यानंतर या महामार्गावरून नागपूर-शिर्डी ही बस धावली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बसला हिरवा झेंडा दाखवून नागपूरहून रवाना केली होती. दुपारी ३.३० वाजता ही बस नागपूरहून शिर्डीसाठी निघाली होती.
3 / 10
शिर्डीत दाखल झाल्यानंतर या प्रवासी बसचं स्वागत नगर-मनमाड रोड कोकमठाण येथील सर्कल साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव आणि कर्मचाऱ्यांकडून करण्यात आले. या बसमध्ये बसणाऱ्या प्रवाशांनी समृद्धी महामार्गावरील प्रवासाचा आनंद लुटला.
4 / 10
या बसचा चालकाने भावना व्यक्त करताना म्हणाला की, साईबाबाचं नाव घेऊन प्रवासाला सुरुवात केली. साधारण आम्ही दुपारी ३.३० निघालो आणि रात्री १०.१५ पर्यंत शिर्डीत पोहचलो. जेमतेम साडेसहा ते सात लागला. अवजड वाहन असल्याने ८० ची वेगमर्यादा होती असं त्याने सांगितले.
5 / 10
तर ज्यावेळी समृद्धी महामार्गावर तुम्ही प्रवेश करता तेव्हा तुमच्या वाहनाची नोंद केली जाते. त्यानंतर ज्याठिकाणी तुम्ही बाहेर पडणार आहे तिथे एक्झिटला टोलनाक्यावर टोल भरला जातो. साधारण ३ हजार आम्ही टोल भरला असंही वाहन चालकाने म्हटलं.
6 / 10
दरम्यान, पहिल्यांदाच आम्ही समृद्धी महामार्गावर आम्ही प्रवास केला. या रोडवरून प्रवास करताना आम्ही आनंद घेतला. शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी इतक्या कमी वेळात पोहचलो त्यामुळे मस्त वाटलं. साडे सहा तासांत आम्ही शिर्डीत पोहचलो असं बसमधील महिला प्रवाशाने सांगितले.
7 / 10
२००२ साली १६०० कोटी रुपये खर्च करून ९४.५ किमीचा मुंबई-पुणे ‘एक्स्प्रेस वे’ बांधण्यात आला होता. या मार्गामुळे मुंबई-पुण्याच्या एकूणच विकासात भर घातली. आता तब्बल ५५ हजार कोटी रुपये खर्च करून ७०१ किलोमीटर लांबीचा नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग साकारला आहे.
8 / 10
हा मार्ग तब्बल १० जिल्हे व २६ तालुक्यांना जोडणार असून, हा मार्ग महाराष्ट्रासाठी ‘गेमचेंजर’ ठरणार आहे. या महामार्गामुळे १८ तासांचा नागपूर ते मुंबई हा प्रवास आता फक्त ८ तासांत करता येणार आहे. नागपूर ते शिर्डी हे अंतर पार करण्यासाठी पूर्वी १३ तास लागत होते. आता ६ तासांत हा प्रवास होत आहे.
9 / 10
हा महामार्ग शिर्डी, वेरुळ, लोणार सरोवर, अजिंठा, औरंगाबाद, त्र्यंबकेश्वरचे ज्योतिर्लिंग आणि घृष्णेश्वर, नाशिक, इगतपुरी तसेच अहमदनगरमधील शिर्डी आदी विविध पर्यटन स्थळांना जोडतो. त्यामुळे येथील पर्यटनाला चालना मिळेल.
10 / 10
समृद्धी महामार्गामुळे देशात महाराष्ट्राची मान उंचावणार आहे. सर्वाधिक लांबीचा द्रुतगती महामार्ग असलेल्या राज्यांच्या पंक्तीत महाराष्ट्र आता दुसऱ्या क्रमांकावर असेल. याआधी महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर होता. पहिल्या क्रमांकावर उत्तर प्रदेश हे राज्य आहे.
टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गshirdiशिर्डीEknath Shindeएकनाथ शिंदे