Join us  

स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  

विराट कोहली ( Virat Kohli) वर सातत्याने स्ट्राइक रेटवरून टीका होत राहिली आहे आणि त्याने मागच्या वेळेस टीकाकाराना जोरदार उत्तर दिले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2024 10:30 PM

Open in App

विराट कोहली ( Virat Kohli) वर सातत्याने स्ट्राइक रेटवरून टीका होत राहिली आहे आणि त्याने मागच्या वेळेस टीकाकाराना जोरदार उत्तर दिले होते. पण, त्याच्या या उत्तरावर महान फलंदाज व समालोचक सुनील गावस्कर प्रचंड संतापले आणि त्यांनी किंग कोहलीचे कान टोचले होते. पण, विराटने आज पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे त्यांना कोपरखळी मारली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या या स्टार फलंदाजाने आज पंजाब किंग्सविरुद्ध ४७ चेंडूंत ७ चौकार व ६ षटकारांसह ९२ धावा चोपल्या. त्याने १९५.७४च्या स्ट्राइक रेटने ही फटकेबाजी केली आणि कामगिरीने टीकाकारांची बोलती बंद केली. 

अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले

इनिंग्ज ब्रेकमध्ये विराट म्हणाला, "इनिंगमध्ये माझा स्ट्राइक-रेट कायम राखणे महत्त्वाचे होते, त्यामुळे मला धावांना वेग घ्यायचा होता. रजत बाद झाला तेव्हा तो अवघड टप्पा होता, आमच्या तीन विकेट पडल्या आणि पाऊस आला. त्यामुळे आम्हाला त्यानंतर सेटल व्हायला थोडा वेळ हवा होता. पण एकदा कॅमेरून ग्रीन आणि मी सेटल झाल्यानंतर पुन्हा आक्रमणाला सुरुवात करावी असे मला वाटले, ” विराटच्या या विधानाचा संदर्भ गावस्करांच्या वक्तव्याशी जोडला जात आहे. बंगळुरूने ७ बाद २४१ धावा उभ्या केल्या.  

कोहलीने उघड केले की ते अमूक एक लक्ष्य ठेवायचे याचा विचार करत नव्हते. आरसीबीला २५० पार जाण्यापासून रोखणाऱ्या हर्षल पटेलचे त्याने कौतुक केले. “आम्ही याचा विचार केला नव्हता. आम्हाला वाटले की येथे २२०+ धावसंख्या चांगली असेल. अलीकडच्या यशामुळे गोलंदाजांना आत्मविश्वास आहे.  मला वाटले की हर्षलचे हे एक षटक चांगले पडले अन्यथा आम्ही २५० पेक्षा जास्त धावा करू शकलो असतो,” असेही तो म्हणाला.  

 विराटने ५८वी धाव पूर्ण करताच यंदाच्या आयपीएलमध्ये ६०० धावांचा टप्पा गाठला. आयपीएलच्या ४ पर्वात  ६०० धावा करणारा लोकेश राहुलनंतर विराट दुसरा फलंदाज ठरला. पंजाबविरुद्ध त्याने आयपीएलमध्ये १००० धावा करण्याचा पहिला मानही पटकावला. तीन ( दिल्ली, चेन्नई व पंजाब) प्रतिस्पर्धींविरुद्ध आयपीएलमध्ये १०००+ धावा करणारा तो एकमेव फलंदाज आहे. डेव्हिड वॉर्नर ( पंजाब व कोलकाता) आणि रोहित शर्मा ( कोलकाता, दिल्ली) यांनी दोन संघांविरुद्ध असा पराक्रम करता आला आहे. 

टॅग्स :आयपीएल २०२४विराट कोहलीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसुनील गावसकरपंजाब किंग्स