Sanjay Raut: १० लाखांच्या बंडलावर ‘एकनाथ शिंदें’चे नाव! संजय राऊतांच्या घरात सापडलेल्या कॅशचा हिशोब लागला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 08:22 IST
1 / 12मुंबईतील १ हजार ०३४ कोटींच्या पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घराची झाडाझडती घेतल्यानंतर सुरुवातीला ताब्यात घेऊन रात्री उशीरा ईडीने अटक केली. 2 / 12रविवारी सकाळी ७ वाजता ईडीची टीम राऊत यांच्या घरी पोहोचली आणि त्यानंतर साडे नऊ तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना त्यांच्या निवासस्थानातून ताब्यात घेण्यात आले. ED ने त्यांना मुंबईच्या फोर्ट परिसरातील ईडीच्या कार्यालयात आणले. ईडीच्या कार्यालयात त्यांची चौकशी करण्यात आली.3 / 12सकाळी ७ वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत चाललेल्या चौकशीत राऊत हे ईडीला सहकार्य करत नव्हते. यामुळे त्यांना अटक करण्यात आल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यात ईडीच्या अधिकाऱ्यांना ११ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम सापडली. काही कागदपत्रेही ईडीने या कारवाईत जप्त केल्याची माहिती आहे. 4 / 12ही रोख रक्कम जप्त केल्यानंतर संजय राऊत यांना ही कॅश कुठून आली, याची विचारणा करण्यात आली. त्याच्यावर संजय राऊत समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत, अशी माहिती आहे. संजय राऊतांच्या घरात सापडलेल्या ११ लाख रुपयांच्या रोख रकमेपैकी १० लाख रुपयांच्या एका बंडलावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव आढळून आल्याचे सांगितले जात आहे. 5 / 12यानंतर या प्रकरणाला आता वेगळेच वळण लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) औरंगाबाद दौऱ्यावर होते. यावेळी संजय राऊत यांच्या घरी सापडलेल्या १० लाखांच्या बंडलावर ‘एकनाथ शिंदे अयोध्या’ असे नाव असल्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. 6 / 12संजय राऊत यांच्या घरात सापडलेल्या रकमेवर माझे नाव होते याची माहिती मला नाही. त्याची माहिती संजय राऊतच देऊ शकतात. अधिक माहिती घेऊन मग बोलेन. संजय राऊतांच्या घरात सापडलेल्या रकमेवर माझे नाव असेल तर ते राऊतांनाच विचारा, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 7 / 12दरम्यान, आपल्याकडे कोणतीही कागदपत्रे नाहीत. सर्व कागदपत्रे चार्टर्ड अकाउंटंटकडे आहेत तसेच ती कागदपत्रे मी प्राप्तिकर विभागालाही दिल्याची माहिती राऊत यांनी ईडीला दिल्याचे समजते. मात्र, अधिकाऱ्यांना झडतीत दुसरी काही कागदपत्रे सापडली आहेत. एकनाथ शिंदे यांची अयोध्येच्या राम मंदिराला देण्याची ही रक्कम राऊतांनी घरात का ठेवली? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.8 / 12१९ जुलै आणि २७ जुलै असे दोनदा ते ईडीच्या चौकशीला अनुपस्थित राहिले होते. १,०३९ कोटी रुपयांच्या पत्राचाळ पुनर्विकास घोटाळ्यामध्ये राऊत यांचे निकटवर्तीय आणि गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे माजी संचालक प्रवीण राऊत यांना वैयक्तिक १०० कोटी रुपयांचा लाभ झाल्याची माहिती प्रवीण यांच्या चौकशीत पुढे आली होती. 9 / 12तसेच, यामध्ये संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबीयांनादेखील आर्थिक लाभ झाल्याची माहिती ईडीला मिळाली होती. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीने सर्वप्रथम २८ जून रोजी राऊत यांना पहिले समन्स दिले होते. मात्र, त्यावेळी राज्यातील सत्तासंघर्ष शिगेला होता. 10 / 12संजय राऊत यांनी आपल्या वकिलामार्फत १४ दिवसांची मुदत देण्याची विनंती ईडीला केली होती. मात्र, ही विनंती फेटाळण्यात आली होती. १ जुलै रोजी राऊत ईडी कार्यालयात हजर झाले. त्यावेळी त्यांची दहा तास चौकशी झाली होती.11 / 12१९ जुलै रोजी ईडीने राऊत यांना दुसरे समन्स जारी केले होते. मात्र संसदेचे अधिवेशन असल्यामुळे उपस्थित राहणे शक्य नसल्याचे सांगत ७ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याची विनंती त्यांनी केली होती. ईडीने ही विनंती फेटाळत २७ जुलै रोजी राऊत यांना चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी तिसरे समन्स जारी केले होते. 12 / 12या चौकशीला राऊत अनुपस्थित राहिले. ३१ जुलै सकाळी सात वाजताच ईडीने राऊत यांच्या घरी धाडसत्र सुरू केले. मध्यरात्री अटक केली. दादर येथील हा फ्लॅट ईडीने यापूर्वीच जप्त केला आहे.