CoronaVirus Live Updates : कोरोनाचा हाहाकार! अमेरिकेत एका दिवसात 14 लाख नवे रुग्ण; फ्रान्स, स्वीडननेही मोडला रेकॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 12:15 PM2022-01-12T12:15:19+5:302022-01-12T12:40:04+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाने थैमान घातले असून प्रगत अमेरिकाही हतबल झाली आहे. कोरोना रुग्णांचा आणि मृतांचा सर्वाधिक आकडा हा अमेरिकेत आहे.

जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 31 कोटींचा टप्पा पार केला असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर अनेक देशांत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

जगभरातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 314,182,349 वर पोहोचली आहे. तर कोरोनाने 5,521,528 लोकांचा बळी घेतला आहे. याच दरम्यान अनेकांनी कोरोनावर मात केली आहे. 261,787,027 जण बरे झाले आहेत.

कोरोनाने थैमान घातले असून प्रगत अमेरिकाही हतबल झाली आहे. कोरोना रुग्णांचा आणि मृतांचा सर्वाधिक आकडा हा अमेरिकेत आहे. रुग्णसंख्येने रेकॉर्ड मोडला असून पुन्हा एकदा धडकी भरवणारी आकडेवारी समोर आली आहे.

अमेरिकेत कोरोना रुग्णांच्या विक्रमी संख्येची नोंद झाली आहे. सोमवारी अमेरिकेत 14 लाखांहून अधिक कोरोना केसेस नोंदवण्यात आल्या आहेत. यापूर्वी कधीही अमेरिकेत किंवा जगातील इतर कोणत्याही देशात इतक्या संख्येने रुग्ण नोंदवले गेले नव्हते.

देशात ओमायक्रॉन (Omicron) व्हेरिएंट आणि डेल्टाचा धोका अजिबात कमी होताना दिसत नाही. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या ट्रॅकरनुसार, अमेरिकेत 14,81,375 नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर यापूर्वी 3 जानेवारी रोजी 11.7 लाख प्रकरणे नोंदवली गेली होती.

अमेरिकेतील एकूण कोरोना प्रकरणांची संख्या आता 6,15,58,085 झाली आहे. तर सोमवारी 1,906 मृत्यू झाल्यानंतर एकूण मृतांची संख्या 8.39,500 वर पोहोचली आहे. सोमवारी जास्तीत जास्त प्रकरणे नोंदवली गेली.

ज्या दिवशी कोरोनाची विक्रमी आकडेवारी समोर आली, त्याच दिवशी रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांच्या संख्येनेही विक्रम मोडला. अवघ्या तीन आठवड्यांत हा आकडा दुप्पट झाला आहे.

अमेरिकेत कोरोनामुळे 1,41,000 लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याआधी गेल्या वर्षी जानेवारीमध्ये हा आकडा 1,32,051 एवढा विक्रमी होता. फ्रान्स आणि स्वीडननेही रेकॉर्ड मोडला आहे.

फ्रान्सच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार 24 तासांत विक्रमी 3,68,149 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. शुक्रवारनंतर स्वीडनमध्ये विक्रमी 70,641 प्रकरणे नोंदवली गेली. यादरम्यान 54 मृत्यूंचीही नोंद झाली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) म्हणणे आहे, की जर येत्या दोन महिन्यांपर्यंत संसर्गाची प्रकरणे अशीच समोर येत राहिली तर युरोपमधील निम्म्याहून अधिक लोकसंख्येला ओमायक्रॉनची लागण होऊ शकते.

फ्लूसारख्या किरकोळ आजार म्हणून ओमायक्रॉनवर उपचार करणे खूप घाईचे असल्याचेही ‘डब्ल्यूएचओ’ने सांगितले आहे. ऑस्ट्रेलियातही परिस्थिती नियंत्रणात नाही. न्यू साऊथ वेल्समध्ये, एका दिवसात 34,759 प्रकरणे नोंदवली गेलीत.

2,242 रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. व्हिक्टोरिया राज्यात 40,127 प्रकरणे नोंदवली गेली असून रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या 946 होती. दोन्ही राज्यात 21 मृत्यूंची नोंद झाली आहे.

आता न्यू साउथ वेल्समध्ये, एखाद्याने कोरोनाच्या बाधित अहवालाची माहिती दिली नाही, तर त्याला 1000 डॉलरचा दंड देखील ठोठावला जाईल. ब्रिटनमध्ये 24 तासांत 1,20,821नवीन रुग्ण आढळले आहेत आणि या कालावधीत 379 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

4 जानेवारीपासून केसेसमध्ये सातत्याने घट होत आहे. त्यानंतर 2,18,376 प्रकरणे दाखल झाले आहे. पण कोरोना मृतांचा आकडा सातत्याने वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.