व्हेनेझुएलात मोठा ट्विस्ट! नोबेल विजेत्या मचाडोंना डावलून ट्रम्प यांचा 'टायगर' डेल्सींना पाठिंबा; जाणून घ्या कोण आहेत?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 16:03 IST
1 / 8या अभूतपूर्व संकटाच्या काळात, व्हेनेझुएलाच्या सर्वोच्च न्यायालयाने उपराष्ट्रपती डेल्सी रॉड्रिग्ज यांची अंतरिम राष्ट्रपती म्हणून नियुक्ती केली आहे. मादुरो यांच्या अत्यंत विश्वासू आणि टायगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डेल्सी आता देशाची धुरा सांभाळत आहेत.2 / 8देशातील प्रशासकीय कामकाज सुरु ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने डेल्सी रॉड्रिग्ज यांना शपथ दिली. व्हेनेझुएलाच्या संविधानातील अनुच्छेद २३३ नुसार, जर राष्ट्राध्यक्ष पदावर नसतील, तर उपराष्ट्रपतींना कार्यवाहू राष्ट्रपती म्हणून जबाबदारी स्वीकारण्याचा अधिकार आहे.3 / 8५६ वर्षीय डेल्सी यांचा जन्म १८ मे १९६९ रोजी काराकासमध्ये झाला. त्यांचे वडील जॉर्ज अँटोनियो रॉड्रिग्ज हे डावे विचारसरणीचे विद्रोही नेते होते. १९७६ मध्ये पोलीस कोठडीत झालेल्या छळात त्यांचा मृत्यू झाला, ज्याचा डेल्सींच्या राजकीय जीवनावर मोठा प्रभाव पडला.4 / 8डेल्सी यांनी वकिलीची पदवी घेतली असून त्या गेल्या दशकापासून ह्युगो शावेझ यांच्या समाजवादी क्रांतीच्या खंद्या समर्थक आहेत. २०१३-१४ मध्ये त्या माहिती व प्रसारण मंत्री, २०१४-१७ दरम्यान परराष्ट्र मंत्री आणि २०१८ पासून उपराष्ट्रपती म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याकडे तेल मंत्री पदाचा अतिरिक्त भारही आहे.5 / 8देशातील महागाई रोखण्यासाठी त्यांनी खासगी क्षेत्राशी संबंध सुधारले. चाविझम विचारसरणीच्या इतर नेत्यांच्या तुलनेत त्या काहीशा उदारमतवादी मानल्या जातात. निकोलस मादुरो यांच्याप्रति असलेली त्यांची निष्ठा आणि आक्रमक कार्यशैली पाहून मादुरो यांनी त्यांना टायगर ही उपमा दिली होती. २०१८ मध्ये त्यांची नियुक्ती करताना मादुरो यांनी त्यांचे वर्णन 'शहिदाची मुलगी, अनुभवी क्रांतिकारक आणि हजारो युद्धांमध्ये पारखलेली वाघीण' असे केले होते.6 / 8कार्यवाहू राष्ट्रपती म्हणून सूत्रे हाती घेताच डेल्सी यांनी कडक पवित्रा घेतला आहे. लष्करी कमांडरसोबत दूरदर्शनवर येत त्यांनी स्पष्ट केले की, 'या देशाचे खरे राष्ट्रपती केवळ निकोलस मादुरोच आहेत.' त्यांनी मादुरो आणि त्यांच्या पत्नीच्या सुटकेची मागणी केली असून अमेरिकन हल्ला हा संयुक्त राष्ट्रांच्या सनदेचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे.7 / 8अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नोबेल विजेत्या विरोधी नेत्या मारिया कोरिना मचाडो यांना डावलून डेल्सी यांना पाठिंबा दर्शवला आहे. 'डेल्सी आम्हाला जे हवे आहे ते करण्यास तयार आहेत,' असा दावा ट्रम्प यांनी केला असला तरी, डेल्सी यांनी जाहीरपणे मादुरो यांचेच समर्थन करत अमेरिकेचा निषेध केला आहे.8 / 8मादुरो यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये अमली पदार्थ तस्करी आणि दहशतवादाचे खटले चालवले जाणार आहेत. या काळात डेल्सी रॉड्रिग्ज व्हेनेझुएलाची अर्थव्यवस्था आणि लष्कर कसे सांभाळतात, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.