शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Omicron Variant : धोका वाढला! 'ओमायक्रॉनला रोखायचं असेल तर हीच योग्य वेळ अन्यथा...'; WHOने दिला गंभीर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2021 2:46 PM

1 / 15
कोरोनाने संपूर्ण जगाचं टेन्शन वाढवलं आहे. जगभरातील रुग्णांच्या संख्येने तब्बल 26 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याच दरम्यान ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने जास्त चिंता वाढवली आहे.
2 / 15
कोरोनामुळे काही देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असतानाच रुग्णसंख्या वाढत आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे रुग्णांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
3 / 15
जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. टेड्रॉस घेब्रेयसेस यांनी ओमायक्रॉन व्हेरिएंटविषयी जगातील सर्व देशांना आता गंभीर इशारा दिला आहे. ओमायक्रॉनला रोखायचं असेल, तर हीच योग्य वेळ आहे अशा शब्दांत त्यांनी जगाला सतर्क केलं आहे.
4 / 15
जागतिक पातळीवर ओमायक्रॉन व्हेरिएंट ज्या वेगाने पसरतोय, ते पाहाता त्याचा एकूणच कोरोनाच्या साथीबाबत मोठा परिणाम जाणवू शकतो हे दिसून येत आहे. जर ओमायक्रॉनला रोखायचं असेल, तर आणखी रुग्ण रुग्णालयात दाखल होण्याआधी पावलं उचलायला हवीत. हीच योग्य वेळ आहे असं टेड्रॉस यांनी म्हटलं आहे.
5 / 15
ओमायक्रॉन व्हेरिएंट आता जवळपास 57 देशांमध्ये पोहोचल्याची माहिती मिळत आहे. तो अजून वेगाने इतर देशांमध्येही पसरेल, अशी शक्यता जागतिक आरोग्य संघटनेला वाटत आहे. त्यामुळेच सतर्क राहणं हे अत्यंत आवश्यक आहे.
6 / 15
ओमायक्रॉनचं जागितक पातळीवर वेगाने पसरणं किंवा 30 हून अधिक संख्येने असणारे म्युटेशन या गोष्टी हेच दर्शवत आहेत की त्याचा कोरोना साथीचा मोठा परिणाम होऊ शकतो. पण तो परिणाम नेमका काय असेल, हे मात्र आत्ता सांगता येणं कठीण आहे असं टेड्रॉस यांनी स्पष्ट केलं आहे.
7 / 15
नवा व्हेरिएंट जीवघेणा नसल्याचं अनेक संशोधकांचं मत आहे. मात्र, याबाबत डॉ. टेड्रॉस यांनी वेगळी भूमिका मांडली आहे. या व्हेरिएंटमुळे मृत्यू होण्याची शक्यता जरी कमी असली, तरी अनेकांना यातून दीर्घकालीन समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
8 / 15
कोरोनाचा दीर्घकाळ सामना करणं किंवा कोरोनातून बरे झाल्यानंतर येणाऱ्या आजारांचा सामना करणं अशा गोष्टी घडू शकतात. आत्ता कुठे आम्हाला ओमायक्रॉनची काही लक्षणं समजू लागली आहेत असं देखील म्हटलं आहे.
9 / 15
'जगातील सर्व देशांनी यावर तातडीने पावलं उचलणं आवश्यक आहे. आज आणि येणाऱ्या काही दिवसांत जगभरातील देश जी पावलं उचलतील, त्यावरच ओमायक्रॉन व्हेरिएंट कशा पद्धतीने वाढेल, हे अवलंबून असेल.'
10 / 15
जर इतर देश त्यांच्या रुग्णालयांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण दाखल होण्याची वाट पाहू लागले, तर फार उशीर होईल. अजिबात वाट पाहू नका, आत्ता पावलं उचला अशा शब्दांत टेड्रॉस यांनी इशारा दिला आहे.
11 / 15
'आम्ही सर्व देशांना आवाहन करतो की त्यांनी सतर्क राहून तपासणी आणि जेनोम सिक्वेन्सिंगची संख्या वाढवायला हवी. यामध्ये आता कोणताही गोंधळ झाला, तर त्यात अजून जीव जातील' असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
12 / 15
अमेरिकेचे टॉप शास्त्रज्ञ डॉ. अँथनी फाउची यांनी ओमायक्रॉनबाबत महत्त्वाती माहिती दिली आहे. कोरोना व्हायरसचा ओमायक्रॉन व्हेरिएंट हा आधीच्या डेल्टा व्हेरिएंटच्या (Delta Variant) तुलनेत जास्त गंभीर नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
13 / 15
ओमायक्रॉन व्हेरिएंट वेगाने पसरत आहे परंतु सुरुवातीचे संकेत सूचित करतात की तो डेल्टा व्हेरिएंटपेक्षा कमी घातक आहे. भारतासह जगातील अनेक वैद्यकीय तज्ज्ञांनी म्हटलं आहे की जरी ओमायक्रॉन व्हेरिएंट वेगाने पसरत असला तरी तो फारसा घातक नाही.
14 / 15
डॉ. अँथनी फाउची यांनी रविवारी सीएनएनच्या स्टेट ऑफ द युनियन कार्यक्रमात सांगितलं की, ओमायक्रॉनच्या गांभीर्याबद्दल निष्कर्ष काढण्यापूर्वी वैज्ञानिकांना अधिक माहिती गोळा करणं आवश्यक आहे.
15 / 15
कोरोना नियमावलीचं पालन करणं अत्यंत गरजेचं आहे. तसेच मास्क, सोशल डिस्टंसिंगसारख्या गोष्टी आवश्यक आहेत. निष्काळजीपण हा जीवघेणा ठरू शकतो त्यामुळे काळजी घ्या असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉनWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना