By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 11:54 IST
1 / 10पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांच्यातील संरक्षण करार झाला आहे. रियादमध्ये १७ सप्टेंबरला पाकिस्तान आणि सौदी अरेबियात स्ट्रॅटेजिक म्युचुअल डिफेन्स एग्रीमेंट झाले. पाक पंतप्रधान शहबाज शरीफ आणि सौदी प्रिन्स सलमान यांनी या करारावर स्वाक्षरी केली. 2 / 10सौदी अरेबियासोबत झालेल्या या संरक्षण करारामुळे पाकिस्तानला आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत. स्वत: पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. परंतु सौदी अरेबियाचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी लढवलेली शक्कल पाकिस्तानला कळलीच नाही का असा प्रश्न पुढे आला आहे.3 / 10भलेही पाकिस्तानला या करारामुळे आनंद झाला असेल परंतु या करारामुळे त्याचा फायदा कमी आणि सौदी अरेबियाचा अधिक फायदा झाल्याचं दिसून येते. त्याचं सर्वात मोठे कारण म्हणजे पाकिस्तान हा अणुसंपन्न देश आहे.पाकिस्तान न्यूक्लियर वेपन असणारा देश आहे. सौदी अरेबियाकडे अजूनही अण्वस्त्रे नाहीत. त्यामुळेच सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी अत्यंत विचारपूर्वक पाकसोबत हा संरक्षण करार केला आहे. त्यातून सौदी अरेबियाचा फायदा अधिक आहे. 4 / 10हा संरक्षण करार सौदी अरेबियाला पाकिस्तानी अण्वस्त्रांचा अप्रत्यक्षपणे फायदा मिळण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या बदलत्या धोरणामुळे सौदी अरेबियाची चिंता वाढली आहे. त्यात आता अमेरिकेच्या सुरक्षा गॅरंटीवर आधीसारखा भरवसा नाही. त्यामुळेच सौदीने पाकिस्तानला न्यूक्लियर शील्ड म्हणून वापरण्याची रणनीती अवलंबली आहे.5 / 10पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांच्यातील या करारामुळे दोन्ही देशातील संरक्षण संबंध मजबूत झाले आहेत. या डिफेन्स डीलनुसार, जर एका देशावर हल्ला झाला तर तो दुसऱ्या देशावरील हल्ला मानला जाईल. सोप्या शब्दात जर पाकिस्तानवर हल्ला झाला तर तो सौदीवरील हल्ला मानला जाईल आणि सौदीवर हल्ला झाला तर तो पाकिस्तानवरील हल्ला समजला जाईल. 6 / 10या करारात संरक्षण उद्योग सहकार्य, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि लष्करी सहउत्पादन यांचा समावेश आहे. पाकिस्तान हा इस्लामिक जगातील एकमेव अणुशक्ती संपन्न देश आहे. या करारानुसार पाकिस्तान आता सौदी अरेबियाला शस्त्रे आणि प्रशिक्षण पुरवेल पण खरा खेळ अणु क्षेत्रात आहे. 7 / 10सौदी अरेबियाला बऱ्याच काळापासून अणु क्षमता बनवण्याची इच्छा आहे. सौदी अरेबियाचे इराण आणि इस्रायलशीही चांगले संबंध नाहीत. इराणच्या अणु कार्यक्रमाची भीती केवळ पाश्चात्य देशांनाच नाही तर सौदी प्रिन्स सलमान यांनाही आहे, म्हणूनच सौदी अरेबियाने हा करार करून पाकिस्तानला त्यांचा भागीदार बनवलं आहे.8 / 10हा करार सौदी अरेबियासाठी न्यूक्लियर अम्ब्रेला म्हणून काम करेल. पाकिस्तानकडे १७० न्यूक्लियर वेपन्स आहेत. जर भविष्यात कधी सौदी अरेबियावर हल्ला झाला तर अशा स्थितीत पाकिस्तानलाही सौदीच्या बाजूने युद्धात उतरावे लागेल. अशावेळी पाकिस्तानचा न्यूक्लियर थ्रेट सौदीचं कायम संरक्षण करत राहू शकतो. 9 / 10दुसरीकडे पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांना या करारातून आर्थिक दिलासा मिळाला आहे. सौदी पाकिस्तानला पैशांची मदत करतो. याआधीही अब्जावधीची मदत सौदीने पाकिस्तानला केली आहे. मात्र आता या पैशांच्या बदल्यात सौदीला न्यूक्लियर पॉवर संरक्षण मिळाले आहे. सौदी आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. तो तेलाचा मोठा निर्यातदार आहे मात्र सैन्याच्या दृष्टीने सौदी कमकुवत आहे. 10 / 10म्हणूनच सौदी अरेबियाचे प्रिन्स सलमान यांनी शक्कल लढवली आणि पैशाच्या कमतरतेमुळे अडचणीत असलेल्या पाकिस्तानला त्यांचा संरक्षण भागीदार बनवले. सौदी अरेबियाचं प्राधान्य न्यूक्लियर संरक्षण मिळवणे आहे. पाकिस्तान आणि सौदी अरेबियामधील या करारामुळे भारताचे नुकसान होणार नाही. सौदी अरेबियाचे भारताशी चांगले संबंध आहेत. त्याशिवाय भारताला या कराराची आधीच माहिती होती असं भारत सरकारने स्वतःच म्हटले आहे.