1 / 5चीनमध्ये काय चालतं हे जगात कोणालाही कळत नाही. कारण आपल्याकडची एकही बातमी, एकही माहिती कुठे लीक होणार नाही याची ते प्राणपणानं काळजी घेतात; मात्र घटना घडून गेल्यानंतर बऱ्याच काळानं किंवा तिथलं कोणी देशाबाहेर गेल्यानंतरच बऱ्याचदा तिथली माहिती जगासमोर येते. आता नव्या माहितीनुसार चीननं भ्रष्टाचाराच्या प्रकरणात आपले दोन माजी संरक्षण मंत्री ली शांगफू आणि वेई फेंघे यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. सरकारी वृत्तसंस्था Xinhua News Agency च्या माहितीनुसार, दोघांना आधी दोन वर्षं तुरुंगात ठेवण्यात येईल. जर त्यांनी दोन वर्षांत कुठलाही नवा गुन्हा केला नाही, तर शिक्षेचं रूपांतर जन्मठेपेत केलं जाऊ शकतं.2 / 5ली शांगफू यांना गेल्यावर्षी अचानक पदावरून हटवण्यात आलं होतं, तर वेई फेंघे यांच्यावरही लष्करी भ्रष्टाचारप्रकरणी चौकशी सुरू होती. त्यानंतर २०२४ मध्ये दोघांना चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षातून बडतर्फ करण्यात आलं होतं. तज्ज्ञांच्या मते, ही कारवाई राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेचा भाग आहे. ली शांगफू जवळपास दोन महिने गायब होते. त्यामुळे अनेक प्रकारच्या चर्चांना उधाण आलं होतं. आता प्रथमच चिनी अधिकाऱ्यांनी अधिकृतपणे मान्य केलं आहे की त्यांच्याविरोधात भ्रष्टाचारासंबंधी चौकशी सुरू होती.3 / 5 ली शांगफू आणि वेई फेंघे यांच्यावर मोठ्या प्रमाणात लाच घेणं, इतरांना लाच देणं आणि पदाचा गैरवापर केल्याचे आरोप आहेत. चीनच्या लष्करी न्यायालयानं त्यांना भ्रष्टाचारासाठी दोषी ठरवलं आहे. चौकशीत समोर आलं की वेई फेंघे यांनी संरक्षण मंत्रालय आणि सैन्याशी संबंधित निर्णयांमध्ये फायदा करून देण्याच्या बदल्यात कथितरीत्या लाच घेतली होती. वेई फेंघे हे चीनमधील वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांपैकी एक मानले जात होते. ते चीनचे माजी संरक्षणमंत्री असण्यासोबतच चिनी सैन्यात रॉकेट फोर्सचे ते कमांडरही होते. रॉकेट फोर्स चीनच्या क्षेपणास्त्र आणि अण्वस्त्र प्रणालीचं नियंत्रण सांभाळतं.4 / 5अहवालांनुसार, चीनमध्ये सुरू असलेल्या भ्रष्टाचार चौकशीचं सर्वात मोठं केंद्र रॉकेट फोर्स आणि सैन्याच्या शस्त्र खरेदी विभागाला मानलं जात आहे. चीनच्या सैन्याचं हे विशेष युनिट असून देशाच्या अण्वस्त्र क्षेपणास्त्र आणि लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक मिसाइल्सचं ते नियंत्रण करतं. हे युनिट चीनच्या लष्करी ताकदीचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, कारण गरज पडल्यास अणुहल्ला करण्याची क्षमता याच युनिटकडे आहे. चौकशी संस्थांना संशय आहे की सैन्यासाठी शस्त्रखरेदी, संरक्षण करार आणि लष्करी उपकरणांच्या पुरवठ्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. अनेक अधिकाऱ्यांनी कंत्राटं देताना आणि लष्करी करारांमध्ये मोठी लाच घेतली!5 / 5ली शांगफू आणि वेई फेंघे प्रकरणात सेंट्रल मिलिटरी कमिशनच्या (सीएमसी) चौकशी संस्थांनी भ्रष्टाचार आणि लाचखोरीच्या आरोपांची चौकशी केली होती. सीएमसी ही चीनची सर्वोच्च लष्करी संस्था आहे. चिनी कम्युनिस्ट पक्ष आणि चीन सरकारतर्फे ती सैन्यावर नियंत्रण ठेवते. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत. पीपल्स लिबरेशन आर्मी, पीपल्स आर्म्ड पोलिस आणि मिलिशिया याच संस्थेच्या अधिपत्याखाली कार्यरत आहेत. गेल्या एका वर्षात चीनच्या लष्करी आणि एरोस्पेस क्षेत्राशी संबंधित डझनभर वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांच्या पदांवरून हटवण्यात आलं आहे.