Russia Ukraine Dispute: रशिया युद्धाच्या तयारीत?; सीमेवर १ लाख सैनिक पाठवले, ‘या’ देशावर कब्जा करण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2021 09:08 PM2021-11-14T21:08:01+5:302021-11-14T21:12:13+5:30

Russia Ukraine Current Situation: चीननंतर आता रशियाही युद्धाच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. सॅटेलाईट इमेजवरुन याचे फोटो काढण्यात आले आहेत.

रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष सातत्याने वाढत आहे. तणाव इतका वाढला आहे की, दोन्ही देशांमध्ये युद्ध होण्याची शक्यता आहे. युक्रेनच्या सीमेजवळ सुमारे १ लाख रशियन सैन्य दाखल झाले आहे. ज्यामुळे रशिया युक्रेनचा काही भाग ताब्यात घेण्याचा प्रयत्न करू शकेल अशी भीती निर्माण झाली आहे असं युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे.

झेलेन्स्की म्हणाले की, त्यांच्या देशाला पाश्चात्य देशांनी सीमेवर कार्यरत असलेल्या रशियन सैन्याच्या कारवायांची माहिती दिली आहे. युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने अमेरिकेच्या इशाऱ्यांना न जुमानता या महिन्याच्या सुरुवातीला युक्रेनजवळ रशियन सैन्याची संख्या सुमारे ९० हजार असल्याचं सांगितले होते.

राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले, 'मला आशा आहे की संपूर्ण जग आता स्पष्टपणे पाहू शकेल की, कोणाला खरोखर शांतता हवी आहे आणि कोण आमच्या सीमेवर सुमारे १ लाख सैनिक पाठवत आहे.' युरोपमधील निर्वासितांच्या संकटाच्या वेळी हे घडत आहे. (Russia Ukraine Conflict 2021) .

ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री लिझ ट्रस यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना बेलारूस आणि पोलंडच्या सीमेवर लज्जास्पदपणे निर्माण झालेल्या स्थलांतरित संकटात" हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे. वास्तविक रशिया आणि बेलारूस हे एकमेकांच्या खूप जवळचे मानले जातात.

बेलारूसवर युरोपियन संघाने आरोप लावलाय की, ते मध्यपूर्व आणि आफ्रिकेतील स्थलांतरितांना पोलंडच्या सीमेवर पाठवत आहे. जेणेकरून हे लोक इथून युरोपातील कोणत्याही देशात जाऊ शकतील, ज्यामुळे तेथे स्थलांतरित संकट येईल. युरोपियन संघाने रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे या सगळ्यामागील सूत्रधार असल्याचे म्हटले आहे.

मात्र, या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचे पुतिन यांचे म्हणणे आहे. या आरोपांदरम्यान रशियाने आता युरोपीय देश युक्रेनबाबत आक्रमकता दाखवली आहे. गेल्या काही काळापासून त्यांनी सीमेवर लष्करी हालचाली तीव्र केल्या आहेत. दुसरीकडे बेलारूसनेही स्वतःवरील आरोप फेटाळून लावले आहेत.

२०१४ मध्ये, रशियाने युक्रेनचा भाग असलेल्या क्रिमियावर कब्जा केला होता. आता या वर्षाच्या सुरुवातीपासून येथे लष्कराच्या जवानांची संख्या वाढवली आहे. ज्याचा जगभरातील नेत्यांकडून निषेध केला जात आहे. मॉस्कोने पाश्चात्य देशांच्या कारवाईला प्रक्षोभक म्हणत आक्षेप घेतला आहे

या प्रदेशात नाटो आघाडीच्या वाढत्या हालचालींबद्दल तक्रार केली आहे, परंतु अमेरिकन कंपनी मॅक्सार टेक्नॉलॉजीने प्रसिद्ध केलेल्या उपग्रह प्रतिमांनी रशियाचा पर्दाफाश केला आहे. बेलारशियन आणि युक्रेनियन सीमेजवळील शहरांमध्ये हजारो बख्तरबंद रशियन तुकड्या आणि सैनिक जमा झाल्याचे फोटोंमध्ये दिसून आले.

रशियाप्रमाणे चीनदेखील युद्धाच्या तयारीत असल्याचं म्हटंल जात आहे. अलीकडेच चीनमधील बहुतांश शहरांमधील सुपरमार्केट्समध्ये लोकांच्या रांगा लागल्या आहेत. घाबरलेले लोक जास्तीत जास्त सामान खरेदी करण्यासाठी तासनतास सुपरमार्केट्समध्ये उभे आहेत.

अत्यावश्यक वस्तूंचा साठा करण्याचे आदेश चीन सरकारनं काही दिवसांपूर्वी दिले. त्यानंतर चिनी जनता चिंतेत पडली. कोरोनाचा संभाव्य धोका ओळखून अत्यावश्यक वस्तूंचा साठा करण्याचे आदेश देण्यात आल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं. परंतु चीन तैवानसोबत युद्ध करण्याच्या तयारीत असल्याचा कयास आहे.