By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 13:16 IST
1 / 10मध्य पूर्वेतील युद्धामुळे मागील १ महिन्यापासून जगातील वेगवेगळ्या देशात तेल संकट निर्माण झाले होते. भारतासह अनेक देशांना याचा फटका बसला होता. जागतिक ऊर्जा संकट ओढावल्याने अमेरिकेने रशियावरील निर्बंधात तात्पुरती सूट देत तेल खरेदीला परवानगी दिली. 2 / 10युद्ध काळात रशियाने भारताला तेल पुरवठा केला होता आता एलएनजी(लिक्विफाइड नॅच्युरल गॅस) बाजारातही रशिया मोठा डाव टाकण्याच्या तयारीत आहे. रशियाने भारतासह इतर आशियाई देशांना एलएनजी खरेदीवर ४० टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट ऑफर दिली आहे.3 / 10रशियाकडून आलेली ही आकर्षक ऑफर अशावेळी आली आहे जेव्हा बहुतेक देशांमध्ये ऊर्जा पुरवठा एक मोठी चिंतेची बाब बनली आहे. त्यामुळे आशियाई देश एलएनजी खरेदीसाठी सहजपणे पुढे जाऊ शकतात. 4 / 10या बातमीमुळे भारतीय एलएनजी क्षेत्रावर लक्षणीय परिणाम दिसून येत आहे. पेट्रोनेट एलएनजीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. गेल्या वर्षभरात हा स्टॉक ६% ने घसरला होता, परंतु आज या बातमीमुळे स्टॉकमध्ये थोडी सुधारणा पाहायला मिळाली. 5 / 10रशियाने यापूर्वी पुरवठा वाढवण्याचा दिला होता प्रस्ताव - गेल्या आठवड्यात मध्य पूर्वेतील तणावामुळे जागतिक ऊर्जा क्षेत्रात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर रशियाने भारताला आपला कच्च्या तेलाचा आणि नैसर्गिक गॅसचा पुरवठा वाढवण्याचा प्रस्ताव दिला. रशियाचे प्रथम उपपंतप्रधान डेनिस मंटुरोव्ह यांच्या नवी दिल्ली दौऱ्यादरम्यान हा प्रस्ताव देण्यात आला होता. 6 / 10रशियन कंपन्या भारताला कच्च्या तेलाचा आणि एलएनजीचा पुरवठा आणखी वाढवू शकतात असं रशियाने म्हटलं होते. यावरून रशियाची भारताच्या ऊर्जा बाजारावरील आपली पकड मजबूत करण्याची इच्छा स्पष्टपणे दिसून येते. जागतिक पुरवठ्याबाबत अनिश्चिततेचे ढग दाटून आले असताना रशिया भारताच्या मदतीला धावून आली.7 / 10पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक तेल आणि गॅस बाजारात अस्थिरता वाढली आहे. स्ट्रेट होर्मुझमध्ये अडथळा आल्याने तेलाच्या किमतींमध्ये तीव्र चढ-उतार होत आहेत. याच सामुद्रधुनीतून जगातील सुमारे २०% तेल आणि एलएनजीची वाहतूक होते. 8 / 10भारत जो आपल्या ऊर्जेच्या गरजांचा मोठा भाग या प्रदेशातून आयात करतो तो या परिस्थितीमुळे थेट प्रभावित झाला. आता एलएनजीवरील सवलतींचा रशियाचा प्रस्ताव आशियाई बाजारपेठेत आपले स्थान मजबूत करण्याची त्याची इच्छा आहे आणि हे साध्य करण्यासाठी तो ही रणनीती वापरत आहे. 9 / 10पार्शियन खाडी आणि ओमानची खाडी यांच्यामधील अत्यंत महत्त्वाचा समुद्री मार्ग म्हणजे होर्मुझ सामुद्रधुनी. इराणने हा मार्ग बंद केल्यामुळे जागतिक तेल आणि गॅस पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला. जगभरात तेल आणि गॅसच्या किमती वाढल्या. 10 / 10युद्ध काळात भारतीय रिफायनर्सनी पुढील महिन्यात डिलिव्हरीसाठी अंदाजे ६ कोटी बॅरल रशियन तेल खरेदी केले आहे. हा माल ब्रेंटपेक्षा प्रति बॅरल ५ ते १५ डॉलरच्या प्रीमियमवर बुक करण्यात आला होता. युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ रोखण्यासाठी अमेरिकेने अखेर नमते घेत रशियन तेलाच्या विक्रीला तात्पुरती मंजुरी दिली होती.