शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 13:35 IST

1 / 10
चीनच्या वाढत्या जागतिक महत्त्वाकांक्षा पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. अमेरिकन पेंटागॉनच्या ताज्या २०२५ च्या रिपोर्टमधून चीनच्या दुहेरी रणनीतीवर प्रकाश टाकण्यात आला आहे. एकीकडे चीन भारतासोबतचा तणाव कमी करण्याचा प्रयत्न करतोय तर दुसरीकडे तो शांतपणे भारताच्या प्रदेशावर दावे मजबूत करतोय. अरुणाचल प्रदेशवरील चीनच्या दाव्याचा उल्लेख रिपोर्टमध्ये आहे.
2 / 10
या रिपोर्टमुळे एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो, चीनचे लक्ष केवळ भारतापुरते मर्यादित आहे का? तज्ञ आणि आंतरराष्ट्रीय अहवालानुसार याचे उत्तर नाही असं आहे. भारतापलीकडे अशी अनेक क्षेत्रे आहेत जिथे चीन आपले दावे मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे, ज्यात रशिया, फिलीपिन्स आणि तैवान यांचा समावेश आहे.
3 / 10
भारत आणि चीनमध्ये ३,५०० किलोमीटरची सीमा आहे. अरुणाचल प्रदेशवरील वाद हा एक प्रमुख मुद्दा आहे. चीन अरुणाचल प्रदेशला दक्षिण तिबेट म्हणून दावा करतो तर आंतरराष्ट्रीय स्तरावर हा भारताचा अविभाज्य भाग म्हणून ओळखला जातो.
4 / 10
बीजिंग अरुणाचल प्रदेशचा मुद्दा तैवान आणि दक्षिण चीन समुद्राइतकाच महत्त्वाचा मानतो. तवांगसारख्या क्षेत्रांवर चीनचा दावा दोन्ही देशांमधील अविश्वास आणखी वाढवतो.
5 / 10
भारताव्यतिरिक्त चीन रशियामधील काही क्षेत्रांवर लक्ष ठेवून असल्याचे म्हटले जाते. चीन आणि रशियामधील मैत्री अनेकदा पाश्चात्य देशांविरुद्ध भागीदारी म्हणून दर्शविली जाते, परंतु जमिनीवरील वास्तव वेगळेच सूचित करते.
6 / 10
२०२३ मध्ये चीनने प्रसिद्ध केलेल्या नवीन सरकारी नकाशांमध्ये काही रशियन शहरे चिनी नावे दर्शविली गेली, ज्यामुळे वाद निर्माण झाला. यामध्ये व्लादिवोस्तोक सारखी महत्त्वाची शहरे समाविष्ट होती. याव्यतिरिक्त उस्सुरी आणि अमूर नद्यांच्या संगमावरील एक बेट २००८ च्या करारानुसार दोन्ही देशांमध्ये विभागले गेले असले तरी ते पूर्णपणे चीनचे क्षेत्र म्हणून दाखवण्यात आले. रशिया आणि चीनमध्ये ४,२०० किलोमीटरची सीमा आहे, जिथे १९६० च्या दशकात गोळीबारही झाला आहे.
7 / 10
चीन रशियाच्या सायबेरियन प्रदेशांवर विशेषतः व्लादिवोस्तोक आणि अमूर ओब्लास्टमधील एका बेटावर लक्ष ठेवून आहे. अमेरिकन मासिक न्यूजवीकने असा दावा केला आहे की, चीन रशियन सीमेजवळील शेतीची जमीन खरेदी करत आहे आणि ती दीर्घकालीन आधारावर भाड्याने देत आहे.
8 / 10
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, हे त्याचे भविष्यातील दावे मजबूत करण्यासाठी एक रणनीती असू शकते. या भागांवर आपला दावा करण्यासाठी चीन इतिहासावर अवलंबून आहे. सुमारे १५० वर्षांपूर्वी किंग राजवंशाच्या काळात हे क्षेत्र चीनचा भाग होते, परंतु १९ व्या शतकात ते रशियन साम्राज्याला देण्यात आले.
9 / 10
दक्षिण चीन समुद्रात चीनचा फिलीपिन्सशी असलेला वाद लपून राहिलेला नाही. पाग-आसा (Thitu Island) हे फिलीपिन्समधील एक लहान पण धोरणात्मक बेट आहे, ज्यावर चीनने दीर्घकाळ नजर ठेवली आहे. २०१६ मध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दक्षिण चीन समुद्रातील चीनचे बहुतेक दावे फेटाळून लावले, परंतु चीनने हा निर्णय स्वीकारण्यास नकार दिला आहे. त्यानंतर चीनने कृत्रिम बेटे बांधली, लष्करी संरचना उभारल्या आणि या भागात आपली नौदल उपस्थिती वाढवली.
10 / 10
तैवानबाबत चीनची भूमिका सर्वात कठोर आहे. अलीकडच्या काळात चीनने तैवानभोवती मोठ्या प्रमाणात लष्करी सराव केले आहेत. चीन कोणत्याही किंमतीत तैवानला आपल्या नियंत्रणाखाली आणू इच्छित आहे असं तज्ज्ञ सांगतात. पेंटागॉनच्या रिपोर्टनुसार पीएलए तैवानला जबरदस्तीने ताब्यात घेण्यासाठी अनेक पर्यायांचा शोध घेत आहे, ज्यात समुद्री आक्रमण, क्षेपणास्त्र हल्ले आणि तैवानची नाकेबंदी यांचा समावेश आहे.
टॅग्स :chinaचीनIndiaभारतrussiaरशियाAmericaअमेरिका