गेल्या 48 तासांत 57 हल्ले! पाकिस्तान घाबरला, ईदच्या दिवशी खेळण्यांच्या बदुकांवर घातली बंदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 15:10 IST
1 / 9 Pakistan News : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या हल्ल्यांमुळे पाकिस्तानने मोठी धास्ती घेतली आहे. बलुच लिबरेशन आर्मी(बीएलए)ने एकामागून एक हल्ले करुन शाहबाज शरीफ सरकारची झोप उडवली आहे. गेल्या आठवड्यात बीएलएने ट्रेन हायजॅक केली होती, ज्यामुळे जगभर खळबळ उडाली. त्यानंतर बीएलएने रविवारी सकाळी लष्कराच्या वाहनांवर हल्ला केला. या हल्ल्यांमुळे पाकिस्तान इतका घाबरला आहे की, त्याने ईदच्या दिवशी खेळण्यांच्या प्लास्टिक बंदुकांवरही बंदी घातली आहे.2 / 9 इस्लाम धर्माचा सर्वात पवित्र महिना असलेल्या रमजानमध्ये पाकिस्तानात हे हल्ले होत आहेत. शनिवारी पेशावरमधील एका मशिदीत स्फोट झाला होता, ज्यात तेथील सुप्रसिद्ध मुफ्ती मुनीर शाकीर ठार झाले. अशा दहशतवादी हल्ल्यांच्या भीतीच्या छायेत ईदची तयारी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाकडून जास्तीची खबरदारी घेण्यात येत असून, या अनुषंगाने रविवारी खेळण्यांच्या बंदुका आणि फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे.3 / 9 पेशावरचे उपायुक्त सरमद सलीम अक्रम यांनी एक प्रसिद्धीपत्रक जारी करून म्हटले की, टॉय गन आणि फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे. या बंदीचे कोणी उल्लंघन केल्यास संबंधित अधिकारी कलम 188 अंतर्गत कारवाई करतील. दुकानदार आणि अधिकारी दोघांच्याही सोयीसाठी हे पाऊल उचलण्यात आले असल्याचे त्यात म्हटले आहे. यामुळे अतिरेकी प्रवृत्तींना आळा बसेल आणि ईदच्या काळात शांतता राखणे सोपे जाईल. 4 / 9 पाकिस्तानमध्ये बीएलए आणि तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने मिळून शेहबाज शरीफ सरकारची झोप उडवली आहे. गेल्या 48 तासांत 57 हल्ले झाले असून, यातील बहुतांश हल्ले टीटीपी आणि बीएलएने केले आहेत. अधिकृत आकडेवारीनुसार या हल्ल्यांमध्ये 16 जणांना आपला जीव गमवावा लागला असून, 46 जण जखमी झाले आहेत. पण बीएलएच्या दाव्यानुसार मृतांचा आकडा जास्त आहे.5 / 9 बलुचिस्तानचा बंडखोर गट बीएलए अनेक दशकांपासून पाकिस्तान सरकारच्या विरोधात मोर्चा उघडला असून, सातत्याने हल्ले करत आहे. अलीकडच्या काळात त्यांचे हल्ले तीव्र झाले आहेत. गेल्या आठवड्यात मंगळवारी क्वेट्टाहून पेशावरला जाणारी जाफर एक्स्प्रेस बीएलए बंडखोरांनी ताब्यात घेतली होती. बचाव मोहिमेला 30 तासांपेक्षा जास्त वेळ लागला, ज्यामध्ये 33 बंडखोर मारले गेले, तर 30 हून अधिक ओलीसांनाही आपले प्राण गमवावे लागले.6 / 9 या हल्ल्यानंतर बीएलएने रविवारी पुन्हा मोठा हल्ला केला. क्वेट्टाहून तफ्तानला जाणाऱ्या लष्कराच्या ताफ्यावर हा हल्ला झाला, ज्यात पाकिस्तान सरकारच्या म्हणण्यानुसार 5 लोक मारले गेले, तर 90 पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाल्याचा दावा बीएलएने केला आहे. हा हल्ला नोश्की-दलबंदीन राष्ट्रीय महामार्गावर झाला. स्फोटकांनी भरलेले वाहन घेऊन आलेल्या आत्मघातकी हल्लेखोराने ताफ्याला धडक दिली, ज्यामुळे स्फोट झाला.7 / 9 पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी या हल्ल्याचा निषेध केला असून 'अशा भ्याड कृत्यांमुळे दहशतवादाविरोधातील आमचा संकल्प कमकुवत होऊ शकत नाही,' असे म्हटले आहे. बलुच बंडखोरांनी यापूर्वीही रेल्वे ट्रॅक आणि पाकिस्तानी सैनिकांच्या ताफ्यांवर रॉकेट आणि बॉम्बने हल्ले केले आहेत. पाकिस्तानी सैनिकांशिवाय ते चिनी नागरिकांनाही लक्ष्य करतात.8 / 9 बलुच बंडखोर पाकिस्तानपासून बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची मागणी करतात आणि या भागात सुरू असलेल्या चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (CPEC) चा चीनच्या प्रकल्पाला विरोध करतात. 9 / 9CPEC अंतर्गत, बलुचिस्तानमधील अनेक प्रकल्पांवर काम केले जात आहे, ज्यात ग्वादर बंदर आणि ग्वादर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा समावेश आहे. या प्रकल्पांवर काम करणारे चिनी अभियंते अनेकदा बलुच बंडखोरांचे लक्ष्य बनतात.