शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: August 20, 2025 14:36 IST

1 / 8
मलेशियामध्ये धार्मिक कट्टरतेच्या दिशेने आणखी एक पाऊल उचलण्यात आले आहे. येथील तेरेंगगानू (malaysia terengganu) राज्याने सोमवारी (१८ ऑगस्ट २०२५), योग्य कारणाशिवाय शुक्रवारचे नमाजपठण न करणाऱ्या मुस्लिम पुरुषांना आता दोन वर्षांपर्यंतचा तुरुंगवास आणि ३,००० रिंगित (सुमारे ₹ ६१,७८०) एवढा दंड होऊ शकतो, अशी घोषणा केली आहे. या राज्यात पॅन-मलेशियन इस्लामिक पार्टीचे (PAS) शासन आहे.
2 / 8
यासंदर्भात बोलताना मलेशियातील माहिती उपदेश आणि शरिया सक्षमीकरण राज्यमंत्री मुहम्मद खलील अब्दुल हादी म्हणाले, 'हा कायदा मुस्लिमांना आठवण करून देण्यासाठी आहे की, शुक्रवारची नमाज (प्रार्थना) ही केवळ धार्मिक प्रतीक नाही, तर अल्लाहच्या प्रति आज्ञापालनाचे प्रतीक आहे.
3 / 8
यापूर्वी तेरेंगानू राज्यात, सलग तीन शुक्रवारी नमाज पठण न केल्यास शिक्षा होत होती. मात्र आता नवीन दुरुस्तीनंतर, शुक्रवारची नमाज एकदा चुकली तरीही शिक्षा होईल.
4 / 8
मलेशियातील राजकीय विश्लेषकांच्या मते, हा बदल निवडणूक रणनीतीचा एक भाग आहे. पीएएस स्वतःला इस्लामचा सर्वात मोठा रक्षक म्हणवून मतदारांमध्ये आपली पकड मजबूत करू इच्छित आहे.
5 / 8
तेरेंगानूची लोकसंख्या सुमारे १२ लाख एवढी आहे, यांपैकी ९९% हून अधिक मलय मुस्लिम आहेत. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत पीएएसने सर्वच्या सर्व ३२ जागा जिंकून विधानसभेतील विरोधकांना पूर्णपणे साफ केले होते.
6 / 8
पुढील दोन वर्षांत तेरेंगगानूमध्ये निवडणुका होणार आहेत आणि अशा परिस्थितीत, हा कायदा पक्षाची धार्मिक कट्टर प्रतिमा आणखी मजबूत करू शकतो. तेरेंगानूच्या या निर्णयाने सोशल मीडियावरही वाद निर्माण झाला आहे.
7 / 8
यासंदर्भात बोलताना मलेशियन वकील अजिरा अझीझ म्हणाल्या, हे कुराणच्या त्या शिकवणीच्या विरुद्ध आहे, ज्यात धर्मात कोणतीही सक्ती नाही, असे म्हटले आहे. याच बरोबर, नमाजसाठी जागरूकता मोहीम आणि शिक्षण कार्यक्रम पुरेसा आहे, याला गुन्हा बनवण्याची आवश्यकता नाही, असेही त्यांनी सुचवले.
8 / 8
पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांच्या कार्यकाळात मलेशियामध्ये धार्मिक रूढीवाद वाढत असल्याचे म्हटले जात आहे. नुकतेच, येथील एक प्राचीन मंदीर पाडून, त्याच्या जागी एक मशीद बांधण्यात आली, जिचे उद्घाटन खुद्द अन्वर यांनी केले. तेरेंगानू नवीन कायदा हा, मलेशिया हळूहळू धार्मिक कट्टरतावादाकडे वाटचाल करत असल्याचे प्रतीक मानला जात आहे.
टॅग्स :Muslimमुस्लीमIslamइस्लामMalaysiaमलेशियाMosqueमशिदTempleमंदिर