पोलंडमध्ये सापडले 'नाझीं'च्या सामूहिक हत्येचे पुरावे, जमिनीत सापडली 8000 लोकांची राख; पाहा Photos

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2022 07:29 PM2022-07-17T19:29:16+5:302022-07-17T19:32:59+5:30

दुसऱ्या महायुद्धात हिटलरच्या नाझी सैनिकांनी हजारो-लाखो लोकांची हत्या करुन मृतदेह जाळले होते.

पोलंडच्या (Poland) राष्ट्रीय स्मरण संस्थेने (इंस्टीट्यूट ऑफ नॅशनल रिमेंबरेंस IPN) दुसऱ्या महायुद्धातील नाझी कंसनट्रेशन कँपजवळ सामूहिक कबरीचा शोध लावला आहे. या ठिकाणी कैक टन राख सापडली आहे, जी सुमारे 8,000 लोकांच्या अवशेषांची असल्याचे सांगितले जात आहे.

या पुराव्यांवरून हे स्पष्ट होते की, हिटलरच्या नाझी सैनिकांनी पोलंड आणि शेजारील देशांमध्ये केलेल्या अत्याचारांचे अवशेष लपविण्याचा खूप प्रयत्न झाला. आयपीएनच्या अध्यक्षा कॅरोल नवरोकी यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत या शोधाबद्दल सांगितले.

नवरोकी म्हणाल्या की, जर्मन लोकांना त्यांनी केलेल्या गुन्ह्यांची जबाबदारी घ्यायची नव्हती, त्यामुळेच 1944 मध्ये येथे पुरलेल्या लोकांचे मृतदेह बाहेर काढून त्यांना जाळण्यात आले.

कोणालाही या नरसंहाराबद्दल कळू नये, यासाठी मृतदेह जाळल्यानंतर त्यांचे अवशेषही जमिनीत गाडले. पण, त्यांचा प्रयत्न अयशस्वी झाला, कारण IPNने दुसऱ्या महायुद्धातील बळींना शोधण्याचा निर्धार केला आहे. त्यांच्यापैकी एकालाही कधीही विसरता येणार नाही.

छावणीत व्हायची अनेकांची हत्या- नवरोकी म्हणतात की, उत्तर-पूर्व पोलंडमधील सोल्डाऊ कंसनट्रेनशन कँपजवळ (Soldau concentration camp) मोठ्या प्रमाणात मानवी राख सापडली आहे.

राखेचे वजन सुमारे 15.8 टन आहे. ट्रान्झिट कॅम्प नावाच्या या शिबिरात ज्यू आणि पोलिश विचारवंतांना कामगार शिबिरात पाठवले जाईपर्यंत ठेवले जात असे. पण, हे फक्त सांगण्यापुरतेच होते. मूळात या शिबिराचा उपयोग निष्पापांची हत्या करण्यासाठीच व्हायचा.

होलोकॉस्ट अत्याचारादरम्यान, मृतदेहांची विल्हेवाट लावण्याचे अनेक मार्ग होते. तुरुंगात टाकलेल्या युद्धकैद्यांना ऑशविट्झमध्ये (Auschwitz) मारल्या गेलेल्या युद्धकैद्यांचे अवशेष जाळण्यास भाग पाडले गेले. असे सांगितले जाते की, सोल्डाऊ कॅम्पचे मृतदेह आधी सामूहिक कबरीत दफन करण्यात आले होते.

नंतर नाझींनी ज्यू लोकांना हे मृतदेह खोदून जाळण्याचा आदेश दिला. एका अंदाजानुसार सोव्हिएत सैन्याने 1945 मध्ये सोल्डाऊमध्ये 10 ते 13 हजार निष्पाप लोक मारले होते. आता राखेच्या नमुन्यांचे डीएनए विश्लेषण केले जाणार आहे.