China Coronavirus : अखेर चीनचा खोटारडेपणा उघड; वुहानमधील कोरोना प्रकरणाची झाली पोल-खोल!

By श्रीकृष्ण अंकुश | Published: December 30, 2020 06:36 PM2020-12-30T18:36:35+5:302020-12-30T18:55:07+5:30

चीनच्या वुहान शहरात गेल्या वर्षी कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यावेळी कुणी अंदाजही लावला नसेल, की हा व्हायरस जगातील जवळपास सर्वच देशांना आपल्या कवेत घेईल आणि मृत्यूंचे तांडव करेल.

कोरोनासंदर्भातील आकडेवारी लपवण्याच्या मुद्द्यावरून चीनवर अमेरिकेसह अनेक देशांनी निशाणा साधला आहे. आजही चीनकडे संशयाच्या नजरेने पाहिले जात आहे. मात्र, आता वुहानमध्ये कोरोनासंदर्भातील एक अध्यन समोर आले आहे. या अध्ययनामुळे, चीनच्या खोटारडेपणावरील संशय अधिक बळावला आहे.

वुहानमधील कोरोनासंदर्भात जरी करण्यात आलेल्या अधिकृत आकडेवारीपेक्षा खरी आकडेवारी दहापट अधिक असू शकते, असे चीनच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी केलेल्या एका अध्ययनातून समोर आले आहे.

चिनी सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या (सीडीसी) अहवालात म्हणण्यात आले आहे, की एप्रिलपर्यंत शहरातील 11 मिलियन (एक कोटी दहा लाख) लोकांपैकी जवळपास 4.4 टक्के लोकांमध्ये कोविड-19 तयार करणाऱ्या पॅथोगनविरोधातील अँटीबॉडी विकसित झाली होती.

यानुसार, एप्रिल महिन्यापर्यंत वुहानमधील जवळपास 4,80,000 लोक संक्रमित झाले होते. मात्र, अधिकृत आकडा 50 हजार एवढाच आहे. हा आकडा दहापट कमी आहे.

वुहानमध्ये कोरोना व्हायरसच्या आकडेवारीसंदर्भात अधिक माहिती देणाऱ्यांना चीनने छळायला सुरुवात केली होती. चीन व्हिसल-ब्लोवर्सना शांत करण्यासाठी आणि प्रकरणांची नोंद न घेण्यासाठी अनेक प्रयत्न करत होता. यामुळे चीनला संपूर्ण जगाच्या टीकांचा सामना करावा लागला होता.

चीनमधील शंघायच्या एका न्यायालयाने सोमवारी सिटिझन जर्नालिस्ट झांग झान यांना चार वर्षांची शिक्षा सुनावली आहे. कारण, झांग यांनी वुहानमधील सत्य जगासमोर आणण्यासाठी अनेक लाइव्ह न्यूज केल्या होत्या. यामुळे संतापलेल्या चीनने झांग यांना अनेक प्रकारे त्रास द्यायला सुरुवात केली आणि त्यांना दोषी ठरवले.

काउंसिल ऑन फॉरेन रिलेशन (CFR)च्या ग्लोबल हेल्थमधील वरिष्ठ फेलो हुआंग यंझोंग यांनी एएफपीबरोबर बोलताना सांगितले, की सीडीसीच्या आकडेवारीतून समोर आलेली विसंगती जानेवारीचा शेवट आणि फेब्रुवारीच्या सुरुवातीमधील अराजकतेमुळे संभाव्य अंडररिपोर्टिंगकडे इशारा करू शकते. त्यावेळी मोठ्या प्रमाणावर लोकांची योग्य पद्धतीने कोरोना टेस्ट करण्यात आलेली नव्हती.

सीडीसीने म्हटले आहे, की वुहानच्या बाहेर मध्य हुबेई प्रांतात केवळ 0.44 टक्के लोकांतच व्हायरसविरोधातील अँटीबॉडी विकसित झाली होती. शहरात 77 दिवसांसाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे कोरोनाचा अधिक फैलाव झाला नाही.

...म्हणून चीनच्या आकडेवारीत मोठा फरक - एप्रिल महिन्यात संपूर्ण देशात करण्यात आलेल्या 34,000 हून अधिक लोकांच्या सर्व्हेचा निष्कर्ष सोमवारी रात्री उशीरा जारी करण्यात आला. चीन आपल्या अधिकृत आकडेवारीत लक्षण न दिसणाऱ्या रुग्णांचा समावेश करत नाही. यामुळेही समोर आलेल्या एकूण आकडेवारीत आणि पुष्टी करण्यात आलेल्या आकडेवारीत फरक पडू शकतो.

नॅशनल हेल्थ कमीशनच्या आकडेवारीनुसार, चीनमध्ये बुधवारपर्यंत कोरोना व्हायरसच्या एकूण रुग्णांची संख्या 87,027 एवढी आहे. तर आतापर्यंत 4,634 जणांचा मृत्यू झाला आहे.

चीनने केवळ वुहानमध्येच लॉकडाउन लागू केला होता. तर भारतासह इतर देशांना संपूर्ण देशभरात लॉकडाऊन लागू करावा लागला होता. यामुळेच चीनची अर्थव्यवस्था इतर देशांच्या तुलनेत चांगली राहिली आहे.