शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

देशावर तिहेरी संकट! एडिनो अन् H3N2, कोरोनाला विसरून कसे चालेल? आठवड्यात ६३ टक्क्यांनी वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 14:19 IST

1 / 8
देशात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांनी पुन्हा एकदा धास्ती वाढविण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून लहान मुलांसाठी जीवघेणा ठरलेला एडिनो व्हायरस धुमाकूळ घालत असतानाच दुसरीकडे H3N2 व्हायरसने देखील हातपाय पसरण्यास सुरुवात केल्याने अनेकांच्या मनात कोरोनावेळची धाकधूक वाढू लागली आहे.
2 / 8
गेल्या आठवडाभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये ६३ टक्क्यांची वाढ झाली आहे. ६७ दिवसांनी कोरोनाच्या रुग्णांना ३००० चा टप्पा ओलांडला आहे. कोरोना रुग्णांमध्ये अचानक वाढ होण्याबरोबरच H3N2 विषाणूच्या रुग्णांमध्येही वाढ होऊ लागल्याने आरोग्य यंत्रणांना तीन आघाड्यांवर लढावे लागत आहे.
3 / 8
H3N2 ची लागण झाल्याने आतापर्यंत ९० रुग्ण सापडले असून सहा जणांचा मृत्यू झाला आहे. आजच कर्नाटक आणि हरियाणामध्ये दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचे रुग्ण केरळमध्ये वाढू लागले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी H3N2 इन्फ्लूएंझाच्या वाढत्या रुग्णांवर चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली होती.
4 / 8
सर्व विषाणूजन्य तापांची लक्षणे जवळपास सारखीच आहेत. वाहणारे नाक, सौम्य खोकला, ताप, अंगदुखी आणि डोकेदुखी असू शकते, असे लोहिया रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. अजय शुक्ला यांनी सांगितले.
5 / 8
लोकांमध्ये सध्याचा होत असलेला संसर्ग मुख्यत्वे H3N2 इन्फ्लूएंझा व्हायरसचा आहे असे आयसीएमआरच्या अभ्यासात समोर आले आहे. H3N2 विषाणू अजूनही हवेत आहे, परंतु तो कोरोनाचा प्रकार नाही, असे शुक्ला म्हणाले.
6 / 8
भारतात ज्या दराने इन्फ्लूएन्झा रुग्ण वाढले आहेत, ते पाहता हा व्हायरस बराच काळ संक्रमित करत राहणार आहे. खोकला आणि वेदना यांसारखी लक्षणे तीन आठवड्यांपर्यंत असू शकतो. दुसरीकडे, ताप आणि खोकला साधारणपणे पाच ते सात दिवस राहू शकतो, असे डॉक्टरांनी म्हटले आहे.
7 / 8
एम्सचे माजी संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या मते H3N2 इन्फ्लूएंझा विषाणू हा कोरोनासारखाच हवेतून थेंबांद्वारे पसरतो. ज्यांना सर्दी, खोकला आहे त्यांनी सावध राहणे गरजेचे आहे.
8 / 8
पुण्यात गेल्या महिन्यापासून लहान मुले पोटदुखी, उलटी, हगवण सारख्या आजाराने आजारी आहेत. ही लक्षणे बराच काळ राहत आहेत. त्यातच आता इन्फ्लुएन्झाने विविध राज्यांत हातपाय पसरण्यास सुरुवात केल्याने लहानांपासून थोरामोठ्यांपर्यंत सर्वच प्रकारचे विषाणू थैमान घालतील की काय अशी भीती वाटू लागली आहे.
टॅग्स :Healthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्या