-Ravindra Moreनिसर्गाची किमया तशी वेगळीच आहे. एकीकडे उन्हाळ्यात सर्वत्र उष्णतेची लाट पसरली आहे आणि दुसरीकडे मनुष्य प्राण्याचा या रणरणत्या उन्हापासून बचाव व्हावा म्हणून याच काळात काही फळांची निर्मिती होते. उन्हाळ्यात जांभूळ, करवंद, बोर, कलिंगड, तुती यासारखी फळं दिसू लागतात. मात्र आपण अनेकदा या फळांकडे दुर्लक्ष करतो आणि आजारपणाला आमंत्रण देतो. या फळांचे काही आरोग्यदायी गुणधर्म असल्याने उन्हाळ्यात यांचे सेवन केल्यास शरीराला फायदेशीर ठरतात. जाणून घेऊया त्या फळांबाबत...* कलिंगडशरीराला आतून थंडावा मिळण्यासाठी कलिंगडाचा वापर करण्यास डॉक्टरही सल्ला देतात. शिवाय उन्हाळ्यात होणाऱ्या अनेक त्रासांवर जसे लघवीचा त्रास, अंगावर उष्णतेमुळे उठणारे पुरळ आदींवर कलिंगड म्हणजे रामबाण उपाय आहे. कलिंगडामध्ये मुबलक प्रमाणात पोटॅशियम असते, जे तुमचा रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास साहाय्य करते. कलिंगडात शरीराला आवश्यक अमिनो अॅसिड्स असतात. कलिंगडाच्या साली डोळ्यांवर ठेवल्यास डोळ्यांना थंडावा मिळतो.* जांभूळचवीला आंबट-गोड व रसरशीत अशी लाबंट आकाराची जांभूळ आरोग्यासाठी फायदेशीर असतात. या फळात लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस, क जीवनसत्त्व यांचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे शरीराला पोषकत्व मिळते. लोहामुळे कावीळ, रक्तदोषाविकार हे आजार लवकर बरे होतात. जांभळाचे बी व साल यांचे चुर्ण मधुमेह या आजारावर अत्यंत उपयुक्त आहे. दात व हिरड्या कमकुवत झाल्या असतील व त्यातून रक्त येत असेल तर त्यावरही जांभळाच्या सालीचा वापर केला जातो. जांभळाच्या सरबतामुळे पोट साफ होण्यास मदत होते. पण जांभळे खाताना नेहमी काळजी घ्यावी, रिकाम्या पोटी जांभळे खाऊ नयेत. * बोरविविध जातीत उपलब्ध असणाऱ्या बोरांपैकी आंबटगोड बोर हे औषधी गुणधर्माची समजली जातात. बहुतेक ठिकाणी तोंडाला चव येण्यासाठी बोरे वाळवून चूर्ण तयार केले जाते. तसेच वात विकार आणि जुलाब होण्याचा त्रासही बोरांच्या सेवनाने बरा होतो. वारंवार चक्कर येत असतील तर अशावेळी बोरांचे सेवन करावे. * करवंद'डोंगरची काळी मैना' म्हणून ओळखले जाणारे करवंद या रानमेव्यात अनेक औषधी गुणधर्म आहेत. यात 'क'जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात आहे जे त्वचाविकारामध्ये अधिक फायदेशीर ठरते. शिवाय यात मोठ्या प्रमाणात सायट्रिक अॅसिड असल्याने या दिवसांत उष्णतेमुळे होणाऱ्या अनेक आजारांवर करवंद फायदेशीर आहेत. या दिवसात उष्णतेमुळे शरीराची काहिली होते तेव्हा करवंदाचे सरबत प्यायल्याने अधिक आराम मिळतो. करवंदामध्ये फायबरदेखील भरपूर प्रमाणात असते त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. करवंदामध्ये कॅल्शिअमही भरपूर प्रमाणात असल्याने हाडांसाठी देखील करवंद उत्तम आहेत. * तुती या फळात 'अ' जीवनसत्त्व तसेच कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते, ज्याचे उन्हाळ्यात सेवन करणे फायदेशीर ठरते. तुतीची फळं ही आंबट, गोड असतात.