Health Care Tips: मजेने, आनंदाने जगत वयाची 'शंभरी' ओलांडायची असेल तर हे पाच नियम अंमलात आणा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 14:34 IST
1 / 5निवृत्तीचे वय ५८ आणि ६० ठरवण्यात आले असले तरी, त्या वयात शरीर थकते असे नाही. उलट तुम्ही जितके जास्त कार्यक्षम राहाल तेवढे जास्त आयुष्य जगाल. जी व्यक्ती कामात मग्न असते, त्या व्यक्तीला चांगले आयुष्य लाभते. सक्रिय राहा, हा मंत्र लक्षात ठेवा. डोकं आणि हात रिकामे राहिले की शरीर आणि मन दोन्ही निवृत्ती पत्करतात. म्हणून काम करा, घाम गाळा आणि आनंदी राहा. 2 / 5जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूंचि शोधूनि पाहे, असे समर्थ रामदास स्वामी सांगतात. प्रत्येकाला दुःखं आहे. मात्र ते कुरवाळत न बसता जो त्यावर मात करतो, विविध पर्याय शोधून आनंदी आयुष्य जगण्याच्या वाटा धुंडाळतो तोच आनंदी जीवन जगू शकतो. आनंदी आहोत असे लोकांना दाखवणे आणि आतून आनंदी असणे यात खूप फरक आहे. जो खरोखरीच आनंदी असतो, त्याला आनंद दाखवावा लागत नाही, तो न दाखवताही दिसतो!3 / 5व्यायामाकडे आपण गांभीर्याने बघत नाही. परंतु व्यायाम हा केवळ देहाच्या तंदरुस्तीसाठी नाही, तर मनाला चैतन्य देण्यासाठीसुद्धा केला पाहिजे. आपल्या प्रकृतीला झेपेल असा व्यायाम करावा. याशिवाय दैनंदिन जीवनातही जिने चढणे, उतरणे, चालणे, कष्टाची कामे करून घाम गाळणे या गोष्टींचा समावेश करावा. त्यामुळे उत्साह टिकून राहील. हृदयाचे आरोग्य चांगले राहील आणि तुम्ही दीर्घायुषी व्हाल!4 / 5आपले अर्ध्याहून अधिक आयुष्य हे कोणत्या ना कोणत्या गोष्टींच्या किंवा ध्येयाच्या प्राप्तीसाठी खर्च होते. मात्र मिळवलेली वस्तू उपभोगायची वेळ येते तेव्हा पुरेसे आयुष्य हाती नसते. म्हणून वस्तूंमध्ये जीव अडकवण्यापेक्षा नात्यांमध्ये, माणसांमध्ये गुंतवणूक करा. पैसा किंवा तत्सम महागड्या गोष्टी अडीअडचणीच्या काळात कामास येत नाहीत, मात्र प्रेमाने जोडलेली माणसं आयुष्याच्या शेवट्पर्यंत कामी येतात. 5 / 5सरते शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्ही किती जगता हे महत्त्वाचं नाही, कसे जगता हे महत्त्वाचं! ६० नंतरचे आयुष्य रिटायर्ड होण्याचे नाही तर समाजोपयोगी जीवन जगण्याचे आहे. त्याची सवय आतापासून लावून घेतली तर जेवढे आयुष्य मिळेल ते आनंदाने जगता येईल हे नक्की!