CoronaVirus News : कोरोना संक्रमणामुळे आता मृत्यूचा धोका झाला कमी?; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2022 16:25 IST
1 / 8देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. गेल्या काही आठवड्यांपासून देशात कोरोना संसर्गाच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. बाधितांची संख्या पुन्हा एकदा वाढली असून काही राज्यामध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकांना कोरोना नियमावलीचं पालन करण्याचं आवाहन करण्यात येत आहे. 2 / 8देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 12,751 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर देशातील एकूण रुग्णांच्या संख्येने तब्बल चार कोटींचा टप्पा पार केला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 526772 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात खबरदारीचे उपाय केले जात आहे. तसेच लसीकरण मोहीम देखील वेगाने सुरू आहे. 3 / 8देशातील बहुतेक लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे तसेच अनेकांना बूस्टर डोस देण्यात आला आहे. असे असूनही लोक कोरोना व्हायरसला बळी पडत आहेत. आता प्रश्न असा येतो की, लसीनंतर कोरोना संसर्गामुळे मृत्यूचा धोका कमी झाला आहे का?. या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाला जाणून घ्यायचे आहे. या प्रश्नावर तज्ज्ञांनी मात्र हैराण करणारं उत्तर दिले आहे.4 / 8नवी दिल्ली येथील सर गंगाराम हॉस्पिटलच्या प्रतिबंधात्मक आरोग्य आणि कल्याण विभागाच्या संचालक डॉ. सोनिया रावत यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकांना याआधी कोरोनाचा मोठ्या संख्येने संसर्ग झाला आहे. एकदा तुम्ही संसर्गातून बरे झाल्यानंतर, शरीरात अँटीबॉडीज विकसित होतात, ज्यामुळे पुढील वेळी संसर्ग अधिक धोकादायक नसतो. 5 / 8सध्या बहुतांश लोकांचे लसीकरण झाले असून त्यामुळे मृत्यूचा धोकाही कमी आहे. तथापि, लस मिळाल्यानंतर कोरोना संसर्गामुळे मृत्यू होऊ शकत नाही, असे म्हणणे चुकीचे ठरेल. जर संसर्ग शरीराच्या अनेक भागात पसरला तर मृत्यू होऊ शकतो. ज्यांना हृदयविकार, मधुमेह, किडनी किंवा यकृताच्या गंभीर आजाराने ग्रासले आहे त्यांच्यासाठी हा संसर्ग जीवघेणा ठरू शकतो.6 / 8डॉ. सोनिया रावत म्हणतात की, कोरोना संसर्गासह सर्व आजारांपासून दूर राहण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही पूर्णपणे तंदुरुस्त असाल आणि प्रतिकारशक्ती मजबूत असेल तर कोरोनामुळे कोणतीही गंभीर स्थिती उद्भवणार नाही. रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी, सर्व लोकांना त्यांची जीवनशैली सुधारावी लागेल. 7 / 8वेळेवर झोपणे आणि उठणे, पोषक आहार घेणे, स्वत:ची नीट काळजी घेणं आणि नियमित व्यायाम करणे अत्यंत महत्वाचे आहे. खासकरून व्हिटॅमिन सी आणि इतर पोषक तत्वांनी युक्त फळे आणि भाज्यांचा आहारात समावेश करा. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती अधिक मजबूत होईल आणि तुम्ही निरोगी राहाल.8 / 8तज्ज्ञांच्या मते, कोरोनापासून बचाव करण्यासाठी लोकांनी कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा आणि घराबाहेर पडताना मास्क घाला. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा आणि सॅनिटायझरने वारंवार हात स्वच्छ करत रहा. कोरोनाची लक्षणे दिसल्यास कुटुंबातील इतर सदस्यांपासून स्वतःला दूर ठेवा आणि डॉक्टरांशी संपर्क साधा. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.