दैव बलवत्तर! इमारतीच्या ९ व्या मजल्यावरुन तरुण पडला, कारच्या छताचा चुराडा झाला, सुदैवानं वाचला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 08:59 PM2021-10-11T20:59:34+5:302021-10-11T21:15:19+5:30

Man jumped from 9th floor : 'वेळ आली होती पण काळ आला नव्हता' अशी एक म्हण आहे. असाच काहीसा प्रकार अमेरिकेतील न्यू जर्सीमधील एका व्यक्तीबाबत घडली आहे. येथे एका व्यक्तीने आत्महत्या करण्यासाठी इमारतीच्या ९ व्या मजल्यावरून उडी मारली पण तरीही तो मरण पावला नाही. ज्या कारवर तो माणूस पडला त्या गाडीचे छत उडून गेले, पण तरीही त्या व्यक्तीचे प्राण वाचले.

डेली मेलमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, इमारतीच्या ९ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे वय ३१ वर्षे आहे. पोलिसांनी त्या व्यक्तीचे नाव उघड केले नाही. तो माणूस इमारतीच्या खाली उभ्या असलेल्या बीएमडब्ल्यू कारवर पडला आणि कारचे छप्पर तुटले. (All Photos - Daily Mail)

आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात ती व्यक्ती जखमी झाली. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे त्याच्यावर उपचार सुरु आहेत. त्या व्यक्तीचे प्राण वाचल्याने डॉक्टरही आश्चर्यचकित झाले आहेत.

हा माणूस इमारतीतून खाली पडल्यानंतर बीएमडब्ल्यू कारचे छत पूर्णपणे तुटले होते. गाडीच्या खिडक्याही तुटल्या. आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात त्या व्यक्तीचा उजवा हातही तुटला.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने सांगितले की, अचानक एक मोठा आवाज झाल्याचा आवाज आला. त्याने जवळ जाऊन पाहिले असता एक व्यक्ती जखमी अवस्थेत गाडीच्यावर पडलेला होता.

त्याचवेळी दुसऱ्या एका महिलेने सांगितले की, ती या अपघातामुळे खूप घाबरली होती. सुरुवातीला तिला काय करावे हे कळलं नव्हतं. यानंतर तिने पोलिसांना बोलावले आणि नंतर जखमी व्यक्तीस रुग्णालयात नेण्यात आले.