पहिला पगार घेऊन घरी येतो म्हणाला, पण आलाच नाही; हॉटेलमध्ये काय घडलं 'त्या' रात्री?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 06:43 PM2021-09-08T18:43:57+5:302021-09-08T18:49:15+5:30

हाताशी आलेला लेक गेल्यानं कुटुंबावर शोककळा; वडिलांनी केला हत्येचा आरोप

चंदिगढच्या पिंजौरमध्ये घडलेल्या एका घटनेनं खळबळ माजली आहे. सेल्फी काढत असताना मित्राच्या हाती असलेल्या बंदुकीतून गोळी सुटल्यानं एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

सोमवारी रात्री साडे अकरा वाजता पिंजौरमधील रॉयल गजीबो रेस्टॉरंटमध्ये एक खळबळजनक प्रकार घडला. अंशा नावाचा तरुण त्याच्याच मित्राकडे असलेल्या बंदुकीतून गोळी सुटून मरण पावला. अंशच्या वडिलांनी हत्येचा आरोप केल्यानं प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे.

पोलिसांनी या प्रकरणात दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अंश तीन महिन्यांपासून नोकरीला होता. मात्र पहिला पगार त्याला मंगळवारी मिळणार होता. रविवारी त्यानं याबद्दलची माहिती कुटुंबीयांना दिली होती. बुधवारी पहिला पगार घेऊन येतोय, असा निरोप त्यानं दिला होता. मात्र मंगळवारी सकाळी त्याच्या मृत्यूची बातमी कुटुंबाला मिळाली.

अंशचे वडील कनधीर सिंह वकील आहेत. अंश घरातला मोठा मुलगा होता. तीन महिन्यांपासून तो चंदिगढच्या राजीव गांधी टेक्नॉलॉजी पार्कमध्ये असलेल्या एका कंपनीत काम करत होता. मंगळवारी पहिला पगार मिळाल्यावर त्याच रात्री बरेलीची ट्रेन पकडून घेणार असल्याची माहिती अंशनं वडिलांना रविवारी सकाळी दिली होती.

मुलगा पहिला पगार घेऊन घरी येत असल्यानं कुटुंबात आनंदाचं वातावरण होतं. मात्र अंश काही घरी आला नाही. त्याच्या मृत्यूची माहिती आल्यानं कुटुंबावर शोककळा पसरली. त्यानंतर अंशचे वडील धाकट्या मुलासह चंदिगढला गेले.

बरेलीत वास्तव्यास असलेल्या कनधीर यांच्या घराचं काम सुरू आहे. सध्या ते एका घरात भाड्यानं राहतात. अंशची आई दोन वर्षांपासून आजारी आहे. त्यामुळे तिला अंशच्या निधनाची माहिती देण्यात आलेली नाही. अंश घरी येईल याच विचारात आई अजूनही आहे. आई लेकाची वाट पाहतेय. पण तिचा लेक या जगात नाही.

अंशच्या वडिलांनी त्यांच्या मुलाची हत्या झाल्याचा आरोप केला आहे. पोलीस घटनेची चौकशी करत आहेत. पहिला पगार घेऊन घरी येतो म्हणणारा अंश कनधीर यांना आजही आठवतो. लाडक्या लेकानं घर सोडलंय यावर त्यांचा विश्वास बसत नाही. हाताशी आलेला लेक नियतीनं हिरावून घेतल्यानं कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.