शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

धक्कादायक आकडेवारी! जगातली निम्मी संपत्ती फक्त १% लोकांकडे, भारताचा नंबर कितवा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 10:30 IST

1 / 10
जगात आजमितीस १९५ देश आहेत आणि त्यांची एकूण लोकसंख्या ८.९ अब्ज (८९० कोटी) आहे. पण या आकडेवारीपेक्षाही एक धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. जगातील जवळपास सर्वच देशांमध्ये, त्यांच्या एकूण लोकसंख्येच्या फक्त १ टक्के लोकांकडे देशाची सर्वाधिक संपत्ती एकवटलेली आहे.
2 / 10
'वर्ल्ड वेल्थ रिपोर्टने २०२३ च्या आधारावर नुकतीच एक यादी प्रसिद्ध केली आहे, ज्यात कोणत्या देशांतील १% लोकांकडे सर्वाधिक संपत्ती आहे, हे सविस्तरपणे सांगितलं आहे.
3 / 10
या अहवालानुसार, संपत्तीच्या केंद्रीकरणात ब्राझील जगातील अव्वल देश ठरला आहे. ब्राझीलमध्ये फक्त १ टक्के लोकांकडे देशाच्या एकूण संपत्तीच्या ४८.४% हिस्सा आहे. ब्राझीलमध्ये अनेक अब्जाधीश आहेत, ज्यात ग्रांजा फारियाचे मालक आणि कृषी शास्त्रज्ञ असलेले रिकार्डो कॅस्टेलर डी फारिया आणि देशातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रिक मोटर उत्पादक कंपनी WEG चे सर्वाधिक शेअर्स असलेल्या लिव्हिया वोइग्ट यांचा समावेश आहे.
4 / 10
या यादीत भारताची स्थितीही चिंताजनक आहे. वर्ल्ड वेल्थ रिपोर्टनुसार, भारतातील १ टक्के लोकांकडे देशाच्या एकूण संपत्तीच्या तब्बल ४१% हिस्सा आहे, ज्यामुळे भारत या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
5 / 10
फोर्ब्सच्या अहवालानुसार, भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये मुकेश अंबानी, गौतम अदानी, सावित्री जिंदाल, शिव नाडर, दिलीप संघवी, राधाकिशन दमानी आणि अझीम प्रेमजी यांचा समावेश होतो, ज्यांच्याकडे देशाच्या या मोठ्या संपत्तीचा वाटा आहे.
6 / 10
या यादीत इतर देशांचा विचार केल्यास, अमेरिका तिसऱ्या स्थानावर आहे, जिथे १ टक्के लोकांकडे देशाच्या ३४.३% संपत्ती आहे. त्यानंतर चीन चौथ्या क्रमांकावर आहे, जिथे १ टक्के लोकांकडे ३१.१% संपत्ती एकवटलेली आहे.
7 / 10
जर्मनी पाचव्या क्रमांकावर आहे, जिथे १ टक्के लोकांकडे ३०% संपत्ती आहे. दक्षिण कोरिया (२३.१%) आणि इटली (२३.१%) अनुक्रमे सहाव्या आणि सातव्या स्थानावर आहेत. ऑस्ट्रेलिया (२१.७%) आणि फ्रान्स (२१.२%) हे आठव्या आणि नवव्या स्थानावर आहेत, तर युके (२०.७%) आणि जपान (१८.८%) अनुक्रमे दहाव्या आणि अकराव्या स्थानावर आहेत.
8 / 10
फोर्ब्सच्या २०२५ च्या टॉप १० श्रीमंतांच्या यादीत इलॉन मस्क ३४५.६ अब्ज डॉलर्स संपत्तीसह अव्वल स्थानी आहेत. दुसऱ्या क्रमांकावर जेफ बेझोस (२०८.७ अब्ज डॉलर्स) आणि तिसऱ्या क्रमांकावर मार्क झुकरबर्ग (२०२.६ अब्ज डॉलर्स) आहेत. यानंतर, लॅरी एलिसन (१७७.६ अब्ज डॉलर्स) चौथ्या स्थानावर आणि वॉरेन बफेट (१६६.३ अब्ज डॉलर्स) सहाव्या क्रमांकावर आहेत. विशेष म्हणजे, जगातील पहिले सहा श्रीमंत व्यक्ती अमेरिकेतील आहेत.
9 / 10
या यादीत फ्रान्सचे रहिवासी असलेले बर्नार्ड अर्नॉल्ट (१६२.२ अब्ज डॉलर्स) सातव्या क्रमांकावर आहेत. त्यानंतर, अमेरिकेचे लॅरी पेज (१३१.३ अब्ज डॉलर्स) आठव्या स्थानावर, सर्गेई ब्रिन (१२५.८ अब्ज डॉलर्स) नवव्या स्थानावर आणि स्टीव्ह बाल्मर (११५.६ अब्ज डॉलर्स) दहाव्या स्थानावर आहेत.
10 / 10
या आकडेवारीवरून हे स्पष्ट होतं की, जागतिक पातळीवर संपत्तीची विषम वाटणी मोठ्या प्रमाणात झाली आहे आणि जगातील काही निवडक व्यक्तींकडेच मोठी आर्थिक ताकद केंद्रित झाली आहे.
टॅग्स :Brazilब्राझीलIndiaभारतAmericaअमेरिकाelon muskएलन रीव्ह मस्कJapanजपान