शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरची लेक ते ‘या’ लक्झरी ब्रँडची पहिली भारतीय महिला CEO; कोण आहेत लीना, किती आहे संपत्ती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 09:46 IST

1 / 8
Success Story: भारतीय महिलांमध्ये नेहमीच मोठी स्वप्नं पाहण्याचं धाडस राहिलं आहे आणि अनेकांनी त्या स्वप्नांचं रूपांतर यशोगाथेत केलंय. अशाच दिग्गज महिलांच्या यादीतील एक नाव म्हणजे लीना नायर. फ्रान्सच्या प्रसिद्ध लग्झरी ग्रुप 'शनैल' (Chanel) च्या त्या ग्लोबल सीईओ आहेत. त्यांचा प्रभाव केवळ बोर्डरूमपुरता मर्यादित नाही. जुलै २०२३ मध्ये जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरिसमध्ये त्यांची भेट घेतली, तेव्हा ती केवळ एक औपचारिक भेट नव्हती, तर जागतिक व्यवसायात भारताच्या वाढत्या नेतृत्वाचं ते प्रतीक होतं.
2 / 8
लीना नायर यांचा जन्म ११ जून १९६९ रोजी महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे एका हिंदू मल्याळी कुटुंबात झाला. त्यांच्या पालकांनी त्यांच्या शिक्षणावर विशेष लक्ष दिलं. कोल्हापूरच्या होली क्रॉस कॉन्व्हेंट स्कूलमधील पहिल्या महिला पदवीधर बॅचचा त्या भाग होत्या.
3 / 8
लीना यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकॉम इंजिनीअरिंग पूर्ण केल्यानंतर १९९२ मध्ये XLRI मधून एमबीए पूर्ण केलं. पदवी शिक्षणात त्यांनी सुवर्णपदक पटकावलं होतं. आपल्या कुटुंबात उच्च शिक्षण घेणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या.
4 / 8
त्यांच्या व्यावसायिक प्रवासाची सुरुवात १९९२ मध्ये हिंदुस्थान युनिलिव्हरमध्ये मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून झाली. सुरुवातीच्या काळात त्यांनी कारखाने, सेल्स ऑफिस आणि कॉर्पोरेट हेडक्वार्टरमध्ये काम केलं. पुरुषांचे वर्चस्व असलेल्या क्षेत्रातही त्यांनी स्वतःला सिद्ध केलं. २००७ पर्यंत त्या हिंदुस्थान युनिलिव्हरमध्ये ह्युमन रिसोर्सच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर बनल्या. या पदावर पोहोचणाऱ्या त्या सर्वात तरुण व्यक्ती आणि कंपनीच्या मॅनेजमेंट कमिटीत सामील होणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या.
5 / 8
फोर्ब्सनुसार, लीना नायर यांनी युनिलिव्हरच्या जागतिक नेतृत्वात ५०-५० टक्के जेंडर बॅलन्स (Gender Balance) राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. २०१६ मध्ये त्या कंपनीच्या पहिल्या महिला, पहिल्या आशियाई आणि सर्वात तरुण सीएचआरओ (CHRO) बनल्या. २०२० पर्यंत त्यांनी एक्झिक्युटिव्ह कमिटीमध्ये आपली जबाबदारी पार पाडली.
6 / 8
डिसेंबर २०२१ मध्ये लीना नायर यांची 'शनैल'च्या सीईओ म्हणून नियुक्ती झाली आणि या बातमीने जगभरात खळबळ माजली. या ब्रँडच्या १०० वर्षांहून अधिक इतिहासातील त्या पहिल्या भारतीय आणि दुसऱ्या महिला बॉस ठरल्या. त्यांच्या आधी मौरीन चिक्वेट यांनी २००७ ते २०१६ या काळात शनैलचं नेतृत्व केलं होतं.
7 / 8
लीना नायर यांच्या कार्याची जागतिक स्तरावर दखल घेतली गेली आहे. २०२५ मध्ये त्यांना प्रिन्स विल्यम यांच्या हस्ते ब्रिटनचा प्रतिष्ठित 'कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर' (CBE) पुरस्कार प्रदान करण्यात आला. यापूर्वी २०१७ मध्ये महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी त्यांचा गौरव केला होता, तर २०२१ मध्ये फोर्ब्सच्या सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत त्या ६८ व्या क्रमांकावर होत्या.
8 / 8
व्यावसायिक यशापलीकडे लीना नायर यांचे खाजगी जीवन अतिशय साधं आहे. त्यांचा विवाह कुमार नायर यांच्याशी झाला असून ते एक फायनान्शिअल सर्व्हिसेस उद्योजक आहेत. त्यांना दोन मुले आहेत. शनैलच्या ग्लोबल सीईओ म्हणून कार्यरत असलेल्या लीना नायर यांची एकूण संपत्ती (Net Worth) सुमारे ४ कोटी अमेरिकन डॉलर म्हणजेच ३६२ कोटी रुपयांहून अधिक असल्याचा अंदाज आहे.
टॅग्स :businessव्यवसायInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीkolhapurकोल्हापूर