१ डिसेंबरपासून बदलणार 'हे' ६ नियम; पेन्शन, सिमकार्ड, UPI सह आणखी बरंच काही...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 04:03 PM2023-11-30T16:03:09+5:302023-11-30T16:19:42+5:30

या वर्षाचा शेवटचा महिना म्हणजेच डिसेंबर उद्यापासून सुरू होईल. नवीन महिन्यात काही नवे नियमही लागू होतील. हे नियम तुमच्या खिशावर आणि आयुष्यावर परिणाम करतील. त्यामुळे डिसेंबर २०२३ मध्ये होणाऱ्या बदलांची जाणीव असणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे.

सिम कार्ड, UPI आयडी आणि बँक क्रेडिट कार्डशी संबंधित नवीन नियम डिसेंबर २०२३ पासून लागू होतील. याशिवाय बँक कर्जाशी संबंधित एक महत्त्वाचा नियमही बदलणार आहे. चला, आपण १ डिसेंबरपासून काय बदल होणार आहेत ते जाणून घेऊया.

१ डिसेंबर २०२३ पासून देशात सिम कार्डच्या खरेदी-विक्रीशी संबंधित नवीन नियम लागू होत आहेत. पूर्वी असे असायचे की लोक एका आयडीवर एकाच वेळी अनेक सिम खरेदी करायचे, परंतु आता १ डिसेंबरपासून एका आयडीवर मर्यादित सिम खरेदी करण्याची परवानगी दिली जाईल. तसेच, सिम कार्ड विकणाऱ्यांना नोंदणी करण्यापूर्वी आणि सिस्टममध्ये सामील होण्यापूर्वी KYC प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

ज्या केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांनी ३० नोव्हेंबरपर्यंत लाइफ सर्टिफिकेट सादर केले नाही, त्यांची पेन्शनही १ डिसेंबरपासून बंद होणार आहे. मात्र पुढील वर्षी ऑक्टोबरपूर्वी त्यांनी प्रमाणपत्र सादर केल्यास त्यांची पेन्शन पुन्हा सुरू होईल.

उद्यापासून बँकेकडून कर्ज घेताना जमा केलेली मालमत्तेची कागदपत्रे परत मिळण्यात ग्राहकांना फारशी अडचण येणार नाही. यासंबंधी रिझर्व्ह बँकेचा नवा नियमही १ डिसेंबरपासून लागू होणार आहे. कर्ज घेताना जमा केलेली मालमत्तेची कागदपत्रे बँकांना कर्ज जमा झाल्यापासून एक महिन्याच्या आत परत करावी लागणार आहेत. तसे न केल्यास बँकांना दररोज ५ हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो.

HDFC बँकेने आपल्या Regalia क्रेडिट कार्डाबाबत काही बदल केले आहेत. यामध्ये लाऊंज एक्सेससह खर्चाची मर्यादा वाढवण्यात आली आहे. आता लाउंजमध्ये प्रवेश करण्यासाठी ग्राहकांना एका तिमाहीत किमान १ लाख रुपये खर्च करावे लागतील. याशिवाय, त्यांना एका तिमाहीत केवळ दोनदा लाउंजचा लाभ घेता येईल, अशी अटही घालण्यात आली आहे.

पेमेंट रेग्युलेटर NPCI ने अलीकडेच एक परिपत्रक जारी करून थर्ड पार्टी APP निर्माते आणि पेमेंट सर्व्हिस प्रोवाडर्सला सूचना दिल्यात की, असे UPI आयडी निष्क्रिय करण्यास सांगितले आहे, ज्यांनी त्यांच्या आयडीसह वर्षभर कोणताही व्यवहार केला नाही. अशा निष्क्रिय ग्राहकांचा UPI आयडी ३१ डिसेंबरपर्यंत बंद केला जाईल.

सरकार दर महिन्याच्या सुरुवातीला एलपीजी गॅस सिलिंडरचे नवीन दर ठरवते. १ डिसेंबरलाही किमतीत बदल होऊ शकतो. १ नोव्हेंबर रोजी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात १०० रुपयांची वाढ झाली होती.

टॅग्स :बँकbank