शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 09:49 IST

1 / 7
India Russia Deal: भारत आणि रशिया एकत्रितपणे अमेरिकेला आणखी एक धक्का देण्याची तयारी करत आहेत. कच्च्या तेलाच्या करारानंतर आता दोन्ही देश आणखी एक करार करण्याची योजना आखत आहेत. रशियाचे उपपंतप्रधान डेनिस मंटुरोव्ह यांनी म्हटले आहे की रशिया भारताला एलएनजी विकण्याचा विचार करत आहे.
2 / 7
त्यांनी असंही म्हटलंय की रशिया अणुऊर्जेच्या क्षेत्रातही भारतासोबत सहकार्य वाढवू इच्छित आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियन तेल खरेदी करण्यासाठी भारतावर २५% अतिरिक्त कर लादला आहे. त्यांच्या या निर्णयानंतर या गोष्टी समोर आल्या आहेत. रशियानं त्यांचा हा निर्णय बेकायदेशीर असल्याचं म्हटलंय.
3 / 7
दिल्लीतील रशियन दूतावासातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या इशाऱ्याला न जुमानता, रशिया भारताला तेल पुरवठा करत राहील. रशियाला आशा आहे की भारत आणि चीनसोबत लवकरच त्रिपक्षीय चर्चा होईल. रशियन दूतावासातील चार्ज डी'अफेअर्स रोमन बाबुश्किन यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, 'मी असं म्हणू इच्छितो की राजकीय परिस्थिती असूनही, आपण असा अंदाज लावू शकतो की भारत त्याच पातळीवर कच्चं तेल आयात करत राहील.' याचा अर्थ असा की भारत रशियाकडून पूर्वीइतकंच कच्चं तेल खरेदी करत राहील.
4 / 7
सध्या रशियाकडून कच्चं तेल खरेदी करण्याबाबत अमेरिका आणि भारत यांच्यात काही तणाव आहे. अशा परिस्थितीत, रशियाचं हे विधान खूप महत्वाचं आहे. रशिया भारतासोबतचे संबंध अधिक मजबूत करू इच्छितो, विशेषतः ऊर्जेच्या क्षेत्रात संबंध अधिक मजबूत करायचे आहेत. एलएनजी हा एक प्रकारचा वायू आहे जो थंड करून द्रव स्वरूपात रूपांतरित केला जातो, जेणेकरून तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजपणे वाहून नेता येतो.
5 / 7
भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा पेट्रोलियम आयात करणारा देश आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सुरू झाल्यापासून, भारतानं रशियाकडून कच्च्या तेलाची आयात लक्षणीयरीत्या वाढवली आहे. याचं मुख्य कारण म्हणजे रशियन कच्चं तेल मोठ्या सवलतीत विकलं जात आहे.
6 / 7
रशियाचे भारतातील उप-व्यापार प्रतिनिधी एवगेनी गॅरीव यांनी, भारताची रशियन कच्च्या तेलाची आयात सध्याच्या पातळीवरच राहण्याची शक्यता असल्याचं सांगितलं. गॅरीव म्हणाले की, रशिया भारताला सुमारे ५% सवलतीनं कच्चं तेल विकतो. त्यामुळे आशियातील तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेकडे फारसे पर्याय नाहीत. त्यांनी असंही सांगितले की, दोन्ही देशांमधील व्यापार दरवर्षी सुमारे १०% वाढण्याची अपेक्षा आहे.
7 / 7
अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेझंट यांनी मंगळवारी पुन्हा एकदा भारतातून आयातीवर कर वाढवण्याची धमकी दिली. हा बंदी घातलेलं रशियन तेल खरेदी करण्यासाठी लावण्यात आलेला कर असल्याचं त्यांनी म्हटलं. त्यांनी असंही म्हटलं की, भारत कच्च्या तेलाच्या खरेदीतून नफा कमवत आहे आणि भारतातील काही श्रीमंत कुटुंबांना याचा फायदा होत आहे.
टॅग्स :IndiaभारतrussiaरशियाAmericaअमेरिकाCrude Oilखनिज तेल