1 / 7Income Tax rules for child income: भारतात बालमजुरीवर बंदी आहे. परंतु तरीही असे बरेच मार्ग आहेत ज्यामुळे मुले कायदेशीररित्या कमाई देखील करू शकतात. अनेक मुलं कंन्टेंट क्रिएशन, टॅलेंट शो अशा माध्यमातूनही पैसेही कमवत आहेत. पण प्रश्न असा निर्माण होतो की, मुलांच्या उत्पन्नावर टॅक्स स्लॅबनुसार इन्कम टॅक्स लागत असेल तर त्याची भरपाई मुलांना करावी लागेल का? जाणून घेऊ आयकर विभागाचे नियम याबाबत काय म्हणतात?2 / 7एका अल्पवयीन मुलाचं उत्पन्न दोन प्रकारचं असू शकतं. पहिले म्हणजे कमावलेलं उत्पन्न, जे त्यानं स्वत: कमावलं आहे आणि दुसरं उत्पन्न जे त्यानं कमावलेलं नाही, परंतु मालकी मुलाची आहे. कोणत्याही स्पर्धेच्या किंवा रिअॅलिटी शोच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा इतर कोणत्याही मार्गाने मूल कमावत असेल तर ते त्याचे कमावलेले उत्पन्न समजले जाते. 3 / 7पण मुलाला कोणाकडून कोणतीही मालमत्ता, जमीन इत्यादी भेट म्हणून मिळाली तर ती त्याची न कमावलेली कमाई समजली जाते. पालकांनी मुलांच्या नावावर कोणतीही गुंतवणूक केली आणि त्यावर मिळणारं व्याज ही देखील मुलाचं न कमावलेलं उत्पन्न मानलं जातं.4 / 7आयकर विभागाचं कलम ६४ (१ ए) अल्पवयीन मुलाच्या उत्पन्नाशी संबंधित नियमांशी संबंधित आहे. नियमाप्रमाणे अल्पवयीन मुलानं कमाई केल्यास त्याला कर भरावा लागत नाही. त्याचं उत्पन्न आई-वडिलांच्या उत्पन्नात जोडलं जातं. त्यानंतर पालकांना एकूण उत्पन्नावर ठरलेल्या टॅक्स स्लॅबनुसार आयकर भरावा लागतो.5 / 7कलम १० (३२) अन्वये मुलाचं १५०० रुपयांपर्यंतचं वार्षिक उत्पन्न करमुक्त आहे. यावरील उत्पन्न कलम ६४ (१ ए) अन्वये त्याच्या आई-वडिलांच्या उत्पन्नाशी जोडलं जातं.6 / 7आई आणि वडील दोघेही कमावत असतील तर दोघांपैकी जास्त उत्पन्न असेल त्यांच्या उत्पन्नात मुलाचं उत्पन्न जोडून कराची गणना केली जाते. लॉटरीत अल्पवयीन मुलाने पैसे जिंकले तर त्यावर थेट ३० टक्के टीडीएस कापला जाणार आहे. त्यानंतर या टीडीएसवर १० टक्के अधिभार लावण्यात येणार असून ४ टक्के सेसही भरावा लागणार आहे.7 / 7समजा मुलाच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला असेल तर अशा परिस्थितीत मुलाचा ताबा असलेल्या पालकांच्या उत्पन्नात मुलाचं उत्पन्न जोडलं जातं. याशिवाय मूल अनाथ असेल तर त्याला स्वत: आयटीआर भरावा लागणार आहे. दुसरीकडे, जर मूल कलम ८० यू मध्ये नमूद केलेल्या प्रमाणे दिव्यांग असेल आणि ते ४० टक्क्यांपेक्षा अधिक असेल तर त्याचं उत्पन्न पालकांच्या उत्पन्नात जोडलं जाणार नाही.