शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Gold Silver Price: खिशाला लागणार कात्री! नवीन वर्ष २०२६ मध्ये चांदी ₹३ लाख आणि सोनं ₹१.६० लाखांच्या पार जाणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 09:05 IST

1 / 11
Gold Silver Price in 2026: भारतीय गुंतवणूकदारांसाठी २०२५ हे वर्ष अत्यंत खास ठरलं आहे, कारण सोने आणि चांदीच्या किमतीत झालेल्या प्रचंड वाढीमुळे त्यांना अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळालाय. या दोन्ही धातूंनी त्यांच्या आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीला स्पर्श केलाय. तज्ज्ञांच्या मते, किमतींमधील ही तेजी पुढील वर्षीही कायम राहू शकते आणि गुंतवणूकदारांना मोठा परतावा मिळू शकतो.
2 / 11
२०२५ मध्ये चांदीनं सर्वोत्तम कामगिरी केली. देशांतर्गत बाजारपेठेत चांदीचा भाव प्रति किलो २,४२,००० रुपयांच्या पार गेलाय. ३१ डिसेंबर २०२४ रोजी चांदीचा भाव ८५,८५१ रुपये प्रति किलो होता. अशा प्रकारे, गेल्या एका वर्षात चांदीने आपल्या गुंतवणूकदारांना १६७ टक्क्यांचा जबरदस्त परतावा दिला आहे.
3 / 11
केवळ गेल्या एका आठवड्यातच चांदीच्या किमतीत प्रति किलो २८,००० रुपयांची मोठी वाढ झाली. आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीची मागणी वेगाने वाढत आहे. परंतु पुरवठा मर्यादित असल्यानं किमतीत सतत मोठी वाढ नोंदवली जातेय.
4 / 11
आंतरराष्ट्रीय बाजारातही स्पॉट सिल्व्हरनं इतिहास रचला असून, त्याचा भाव पहिल्यांदाच ७५ डॉलर प्रति औंसच्या पुढे गेला आहे. तज्ज्ञांच्या मते, जागतिक स्तरावर मजबूत मागणी आणि मर्यादित पुरवठ्यामुळे चांदीत ही उसळी पाहायला मिळत आहे. हे वातावरण पुढील वर्षीही कायम राहिल्यास चांदी १०० डॉलर प्रति औंसची पातळी गाठू शकते. या पार्श्वभूमीवर भारतीय बाजारपेठेत चांदीचे दर प्रति किलो ३ लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकतात.
5 / 11
सोन्यानेही गुंतवणूकदारांना निराश केलेलं नाही. चांदीच्या तुलनेत सोन्याचा वेग कमी असला तरी, अनिश्चित जागतिक वातावरणात सोने हा स्थिरता आणि विश्वासाचा पर्याय ठरला आहे. सोन्यानं अवघ्या एका वर्षात सुमारे ७८ टक्के परतावा दिलाय.
6 / 11
३१ डिसेंबर २०२४ रोजी सोनं ७८,९५० रुपये प्रति १० ग्रॅम होतं, ते आता ६१,९०० रुपयांच्या वाढीसह १.४० लाख रुपयांच्या पुढे गेलंय. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, नवीन वर्षात आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं ५००० डॉलर प्रति औंसच्या पार जाऊ शकतं, ज्यामुळे भारतीय बाजारपेठेत सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम १.६० लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकतात.
7 / 11
वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या मते, गेल्या एका वर्षात जागतिक स्तरावर सोनं ६० टक्क्यांहून अधिक महागलंय. अनेक दशकांमधील सोन्याची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. यामागील मुख्य कारण गुंतवणुकीची वाढती मागणी आहे. अत्यंत तणावपूर्ण भू-राजकीय परिस्थिती आणि कमकुवत अमेरिकन डॉलरमुळे गुंतवणूकदार सोन्यात पैसे गुंतवत आहेत.
8 / 11
याव्यतिरिक्त, केंद्रीय बँकांकडूनही सोन्याची मागणी मोठी आहे. रिझर्व्ह बँकेच्या डिसेंबरच्या मासिक अहवालात म्हटले आहे की, सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याची उपयुक्तता कायम आहे आणि मूल्याच्या बाबतीत ही सर्वात स्थिर कमॉडिटी आहे. दुसरीकडे, सोन्याच्या तुलनेत अस्थिर असूनही चांदी सुरक्षित गुंतवणुकीचे गुणधर्म मोठ्या प्रमाणात आहेत.
9 / 11
बाजार तज्ज्ञांच्या मते, सोने आणि चांदीकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. या दोघांपैकी कशाची निवड करावी, हे गुंतवणूकदाराच्या जोखीम घेण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते. सोन्यातील गुंतवणूक म्हणजे अधिक स्थिरता आणि मालमत्ता सुरक्षित ठेवणं होय, कारण सोने हा एक सुरक्षित पर्याय मानला जातो. तर, चांदीमध्ये वाढीची शक्यता जास्त असते, परंतु तिच्या किमती वारंवार वेगाने कमी-जास्त होतात.
10 / 11
याउलट सोन्याचे दर संथ आणि स्थिर गतीनं वाढतात. याच कारणामुळे पोर्टफोलिओमध्ये दोन्हींना स्थान देणं अधिक चांगलं मानलं जातं. योग्य निवड ही तुमच्या गुंतवणुकीचा कालावधी, जोखीम सहन करण्याची क्षमता आणि आर्थिक लक्ष्यांवर अवलंबून असते.
11 / 11
जागतिक स्तरावरील अस्थिरता, टॅरिफ आणि युद्धामुळे निर्माण झालेला वाढता तणाव हे या दरवाढीचे मुख्य कारण आहे. गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोने आणि चांदीला प्राधान्य देत आहेत. सोन्याच्या तुलनेत चांदीमध्ये जास्त वेगानं वाढ होण्याचे कारण म्हणजे तिचा औद्योगिक वापर वाढणे हे आहे. सध्याच्या काळात सौर पॅनेलसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या निर्मितीमध्ये मोठ्या प्रमाणावर चांदीचा वापर केला जात आहे. इतकंच नाही तर चांदीचा पुरवठा मर्यादित असल्यानं तिच्या किमतीत अधिक तेजी दिसून येत आहे.
टॅग्स :GoldसोनंSilverचांदी