दीड वर्षांचा हिशोब! CNG मध्ये ३५ रुपयांची वाढ, PNG चे दर २९ रुपयांनी वाढले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2022 03:14 PM2022-10-09T15:14:34+5:302022-10-09T15:22:37+5:30

गेल्या काही दिवसांमध्ये पीएनजी आणि सीएनजीच्या किंमतीत सातत्यानं वाढ होत आहे.

दिल्लीत शनिवारी सीएनजी आणि पीएनजीच्या दरात तीन रुपयांनी वाढ करण्यात आली. केंद्र सरकारने 1 ऑक्टोबरपासून नैसर्गिक वायूच्या किमतीत 40 टक्क्यांनी वाढ केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. यापूर्वी महानगर गॅस लिमिटेडने मुंबईच्या आसपासच्या भागात सीएनजीच्या दरात प्रतिकिलो 6 रुपयांनी वाढ केली होती.

याशिवाय पाईपद्वारे पुरवल्या जाणाऱ्या पीएनजीच्या दरातही प्रति युनिट चार रुपयांनी वाढ करण्यात आली होती. सोमवारपासून हे नवे दर लागू करण्यात आले. यानंतर शनिवारी दिल्लीत सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली.

7 मार्च 2022 पासून दिल्लीत सीएनजीच्या किमती 14 वेळा प्रति किलो एकूण 22.60 रुपयांनी वाढल्या आहेत. गेल्या वेळी 21 मे रोजी सीएनजीच्या दरात किलोमागे 2 रुपयांची वाढ करण्यात आली होती. आकडेवारीनुसार, एप्रिल 2021 पासून आत्तापर्यंत दिल्लीत सीएनजीच्या किमतीत प्रति किलो 35.21 रुपये (सुमारे 80 टक्के) वाढ झाली आहे.

त्याच वेळी, पीएनजीबद्दल बोलायचे झाल्यास, ऑगस्ट 2021 पासून आतापर्यंत याची किंमत दहा वेळा वाढली आहे. या कालावधीत, PNG ची किंमत 29.93 रुपये प्रति एससीएम (सुमारे 91 टक्के) वाढली आहे. आयजीएलने दिलेल्या माहितीनुसार, CNG आणि PNG च्या किमती नोएडा, ग्रेटर नोएडा, गाझियाबाद आणि गुरुग्राम तसेच उत्तर प्रदेशातील कानपूर आणि राजस्थानमधील अजमेरसारख्या इतर शहरांमध्ये वाढवण्यात आल्या आहेत.

गेल्या चार महिन्यांत प्रथमच सीएनजीच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे, तर पीएनजीच्या (पाईप गॅस) दरात गेल्या दोन महिन्यांत पहिल्यांदाच वाढ करण्यात आली आहे. इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड (IGL) च्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत सीएनजीची किंमत 75.61 रुपये प्रति किलोवरून 78.61 रुपये प्रति किलोपर्यंत वाढली आहे. त्याच वेळी, PNG ची किंमत आता दिल्लीमध्ये प्रति एससीएम 50.59 रुपये (एससीएम) वरून 53.59 रुपये प्रति एससीएम झाली आहे.

नुकतीच महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरात 6 रुपयांनी आणि पीएनजीच्या दरात प्रति युनिट 4 रुपयांची वाढ केली आहे. यासह, सीएनजीचे दर प्रति किलो 86 रुपये आणि पीएनजीची किंमत प्रति एससीएम 52.50 रुपये झाली आहे.

आता सीएनजी आणि पेट्रोलमधील किंमतीतील तफावत 45 टक्क्यांवर आली आहे, असे या वाढीनंतर महानगर गॅस लिमिटेडने सांगितले. सीएनजी आणि पेट्रोलच्या किंमतीत आता 45 टक्क्यांच्या फरक राहिला आहे. तर पीएनजी आणि एलपीजीच्या किंमतीत आता 11 टक्क्यांचा फरक राहिला आहे.