शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

म्युच्युअल फंडावर टॅक्स कसा लागतो? इक्विटी आणि डेट फंडसाठीचे नियम काय, टॅक्स वाचवण्याचे मार्ग जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 09:13 IST

1 / 11
म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करणारे बहुतेक लोक परतावा चांगल्या प्रकारे समजून घेतात, पण कर आकारणीकडे अनेकदा दुर्लक्ष करतात. प्रत्यक्षात म्युच्युअल फंड विकल्यावर लागणारा कॅपिटल गेन टॅक्स तुमच्या खऱ्या नफ्यावर मोठा परिणाम करू शकतो.
2 / 11
काहीवेळा चुकीच्या वेळी फंड विकल्यास तुम्हाला अनावश्यक कर देखील भरावा लागू शकतो. त्यामुळे फंड विकण्यापूर्वी टॅक्स कधी, कसा आणि किती लागेल, हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. इक्विटी आणि डेट म्युच्युअल फंड विकल्यावर कर कसा लावला जातो, नुकतेच कोणते नियम बदलले आहेत आणि कोणत्या गोष्टींची काळजी घेतल्यास तुमचा कर भार कमी होऊ शकतो, हे येथे जाणून घेऊया.
3 / 11
म्युच्युअल फंड विकल्यावर तुम्हाला जो नफा मिळतो, त्याला कॅपिटल गेन म्हणतात. हा दोन प्रकारचा असू शकतो. एक म्हणजे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन (STCG) आणि दुसरा म्हणजे लाँग टर्म कॅपिटल गेन (LTCG). या दोन्हीवर लागणारे कराचे दरदेखील वेगवेगळे असतात. हे पूर्णपणे तुम्ही कोणत्या श्रेणीचा फंड खरेदी केला होता (इक्विटी की डेट) आणि तो तुम्ही किती काळ ठेवला होता, यावर अवलंबून असते.
4 / 11
इक्विटी आणि डेट म्युच्युअल फंडवरील कर आकारणीचे नियम पूर्णपणे वेगळे आहेत, त्यामुळे दोघांनाही स्वतंत्रपणे समजून घेणे आवश्यक आहे. इक्विटी म्युच्युअल फंड म्हणजे ज्या फंडमध्ये किमान ६५% हिस्सा शेअर मार्केटमध्ये गुंतवलेला असतो. जर १ वर्षाच्या आत तो विकला तर याला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन मानलं जाईल. यावर कर दर २०% आहे.
5 / 11
जर १ वर्षानंतर विकल्यास: याला लाँग टर्म कॅपिटल गेन मानलं जाईल. यावर कर दर १२.५% आहे. पण एक दिलासा देखील आहे: एका आर्थिक वर्षात ₹ १.२५ लाख पर्यंतचा नफा टॅक्स-फ्री आहे. याचा अर्थ असा की, जर तुम्ही एक वर्षापेक्षा जास्त कालावधीनंतर म्युच्युअल फंड विकला आणि तुमचा नफा ₹ १.२५ लाख पेक्षा कमी असेल, तर तुम्हाला कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही. ही सूट केवळ इक्विटी फंडवर लागू होते.
6 / 11
डेट म्युच्युअल फंडमध्ये पैसा बाँड, सरकारी सिक्युरिटी आणि कॉर्पोरेट डेटमध्ये लावला जातो. २०२३ नंतर या फंड्सवरील कर आकारणीच्या नियमांमध्ये मोठा बदल झाला आहे, जो गुंतवणूकदारांना नक्कीच माहित असणं आवश्यक आहे. डेट फंडवर टॅक्स पूर्णपणे तुम्ही फंड कधी खरेदी केला होता, यावर अवलंबून असतो.
7 / 11
१ एप्रिल २०२३ पूर्वी खरेदी केलेले डेट फंड: जर २ वर्षांपेक्षा कमी कालावधीत विकल्यास, याला शॉर्ट टर्म मानले जाईल. टॅक्स तुमच्या इन्कम टॅक्स स्लॅबनुसार लागेल. २ वर्षानंतर विकल्यास, हा लाँग टर्म कॅपिटल गेन असेल आणि यावर कर दर १२.५% असेल.
8 / 11
१ एप्रिल २०२३ नंतर खरेदी केलेले डेट फंड: होल्डिंग कालावधी एक वर्ष असो किंवा १० वर्षे, संपूर्ण नफा तुमच्या इन्कम टॅक्स स्लॅबनुसार करपात्र असेल. याचा अर्थ असा की, आता डेट फंडमध्ये लाँग टर्म कॅपिटल गेनचा फायदा पूर्णपणे संपला आहे. ज्या दराने तुमचा पगार किंवा इतर उत्पन्न करपात्र होते, त्याच दराने डेट फंडवर टॅक्स लागेल.
9 / 11
म्युच्युअल फंड विकण्यापूर्वी ५ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. होल्डिंग कालावधी तपासा: फक्त एका दिवसाचा फरक देखील टॅक्स बदलू शकतो. इक्विटी फंडमध्ये १ वर्ष पूर्ण होईपर्यंत विकणं टाळा. लाँग टर्म इक्विटी गेनमध्ये ₹ १.२५ लाख ची सूट लक्षात ठेवा. डेट फंडमध्ये युनिट १ एप्रिल २०२३ पूर्वी खरेदी केली होती की नंतर, हे तपासा. जास्त टॅक्स वाचवण्यासाठी तुमच्या पोर्टफोलिओची आर्थिक वर्षाच्या शेवटी योजना बनवा.
10 / 11
टॅक्स समजून घेतल्यानंतर फंड्स विकले तरच योग्य नफा होईल. म्युच्युअल फंडात झालेली चांगली कमाई तेव्हाच खरी मानली जाते, जेव्हा तिचा टॅक्स योग्य प्रकारे व्यवस्थापित केला जातो. चुकीच्या वेळी फंड विकल्यास तुम्हाला अनावश्यक २०% किंवा ३०% पर्यंतचा टॅक्स भरावा लागू शकतो. इक्विटी फंडमध्ये जास्त काळ गुंतवणूक ठेवणं आणि डेट फंडमध्ये खरेदीची तारीख तपासणं तुमचा कर भार खूप कमी करू शकते. त्यामुळे पुढच्या वेळी म्युच्युअल फंड विकण्यापूर्वी हे नियम नक्की समजून घ्या, अन्यथा नुकसान होऊ शकतं.
11 / 11
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
टॅग्स :Mutual Fundम्युच्युअल फंडInvestmentगुंतवणूकMONEYपैसा