शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भावाकडून घेतले ₹२००० उसने, बॅकेकडून ₹८००० चं कर्ज, आता आहे सोन्याचा ९२०० कोटींचा व्यवसाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2024 09:34 IST

1 / 9
आजकाल देशात स्टार्टअप कल्चरची मोठी क्रेझ आहे. आपल्याला अनेक दिग्गज तरुणांबद्दल ऐकायलाही मिळतं. पण असेही काही उद्योजक आहेत, जे आजच्या तरुण उद्योजकांसाठी प्रेरणास्थान आहेत. आम्ही तुम्हाला अशा एका व्यावसायिकाबद्दल सांगणार आहोत, जे एकेकाळी दुकानात जाऊन सोन्याचे दागिने विकायचे. पण आज ते देशातील एक आघाडीचे सोन्याचे निर्यातदार आहेत.
2 / 9
अवघ्या १०,००० रुपयांपासून सोन्याचा व्यवसाय सुरू करणाऱ्या राजेश मेहता यांनी आज ९,२०० कोटी रुपयांचं व्यवसायाचं साम्राज्य निर्माण केलं आहे. आज त्यांना देशातील सर्वात मोठे सोन्याचे व्यापारी म्हटले जाते.
3 / 9
राजेश मेहता हे राजेश एक्सपोर्ट्सचे (Rajesh Exports) मालक आणि कार्यकारी अध्यक्ष आहेत. ही कंपनी सोन्याची प्रोडक्ट तयार करते आणि त्यांची निर्यात करते. यामध्ये दागिने, पदकं आणि नाणी यांचा समावेश आहे. राजेश एक्सपोर्ट्स लिमिटेडच्या उत्पादन युनिटची दरवर्षी ४०० टन सोन्याची उत्पादनं तयार करण्याची क्षमता आहे.
4 / 9
राजेश मेहता यांनी लहानपणी डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं होतं पण कदाचित त्यांच्या नशिबात वेगळेच काही लिहिलं होतं. मूळचे गुजरातचे असलेले राजेश मेहता यांनी बंगळुरू येथून शिक्षण घेतलं. त्यांचे वडील जसवंतरी मेहता कर्नाटकात दागिन्यांच्या व्यवसायासाठी आले होते.
5 / 9
शिक्षणादरम्यान वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी राजेश हे देखील वडिलांसोबत काम करू लागले. आपल्या कौटुंबिक व्यवसायाला पुढे नेण्यासाठी राजेश मेहता यांनी मोठ्या भावाच्या खांद्याला खांदा लावून काम केलं.
6 / 9
व्यवसायात काहीतरी मोठं करायचं म्हणून राजेश मेहता यांनी भावाकडून २ हजार रुपये आणि बँकेकडून ८ हजार रुपयांचं कर्ज घेतलं. यानंतर त्यांनी १९८२ मध्ये पैसे उसने घेऊन व्यवसाय सुरू केला.
7 / 9
राजेश मेहता चेन्नई येथून दागिने खरेदी करून गुजरातमधील राजकोटमध्ये विकायचे. सुरुवातीला त्यांनी हे काम अगदी लहान प्रमाणात केलं. मात्र या कामात त्यांना यश मिळू लागल्यावर त्यांनी गुजरातमधील घाऊक विक्रेत्यांना दागिने विकण्यास सुरुवात केली.
8 / 9
यानंतर राजेश मेहता यांनी मागे वळून पाहिलं नाही. त्यांनी आपल्या व्यवसायाचा बंगळुरू, चेन्नई आणि हैदराबाद येथे विस्तार केला. १९८९ मध्ये जेव्हा त्यांनी सोन्याच्या दागिन्यांच्या व्यवसायात प्रवेश केला तेव्हा त्यांच्या कारकिर्दीला कलाटणी मिळाली. बंगळुरूमध्ये त्यांच्या छोट्या गॅरेजमध्ये सोन्याचे दागिने बनवण्याचं युनिट सुरू केलं. येथे त्यांनी दागिने तयार करून ब्रिटन, दुबई, ओमान, कुवेत, अमेरिका आणि युरोपमध्ये निर्यात केले.
9 / 9
स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड असलेल्या त्यांच्या कंपनी राजेश एक्सपोर्ट्स लिमिटेडचं ​​मार्केट कॅप ९९.८४ बिलियन म्हणजे सुमारे ९,२०० कोटी रुपये आहे. स्वित्झर्लंड आणि भारतात त्यांची गोल्ड रिफायनरी आहे. आज त्यांनी देशात आणि जगात एक यशस्वी सोने निर्यातदार म्हणून आपला ठसा उमटवलाय.
टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीGoldसोनंbusinessव्यवसाय