शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

दिवाळी सप्ताह: ४ राशींना सर्वोत्तम वरदान, लाभच लाभ; पद-पैसा वाढ, लक्ष्मी-कुबेर शुभच करतील!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2024 08:29 IST

1 / 15
Weekly Horoscope: आजपासून वर्षातील मोठा सण दिवाळी सुरू झाली आहे. २९ ऑक्टोबर रोजी बुध वृश्चिक राशीत प्रवेश करेल. अन्य ग्रहस्थिती अशी- गुरू आणि हर्षल वृषभेत, मंगळ कर्क राशीत, तर केतू कन्येत, रवी, बुध तूळ राशीत आहेत. मंगळवारी बुध वृश्चिक राशीत शुक्राशी युती करेल. प्लूटो मकरेत, शनी कुंभेत आहेत. राहू व नेपच्यून मीन राशीत आहे.
2 / 15
चंदाचे भ्रमण सिंह, कन्या, तूळ व वृश्चिक राशीतून राहील. २८ ऑक्टोबर रोजी रमा एकादशी व दिवाळी वसुबारस आहे. २९ रोजी प्रदोष व धनत्रयोदशी आहे. ३१ रोजी नरक चतुर्दशी, अभ्यंगस्नान आहे. ०१ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन, अभ्यंगस्नान, ०२ नोव्हेंबर रोजी दिवाळी पाडवा, बलिप्रतिपदा, अभ्यंगस्नान आहे. ०३ नोव्हेंबर रोजी भाऊबीज आहे.
3 / 15
दिवाळीत बुध ग्रह विशाखा नक्षत्रात विराजमान झाला आहे. तर, गुरु स्वाती नक्षत्रात आहे. तसेच शुक्र आणि मंगळ नक्षत्र परिवर्तन करणार आहेत. २७ ऑक्टोबर रोजी शुक्र ज्येष्ठ नक्षत्रात तर, २८ ऑक्टोबर रोजी मंगळ पुष्य नक्षत्रात प्रवेश करणार आहे. तर, २९ ऑक्टोबर रोजी बुध वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत शुक्र विराजमान असून, लक्ष्मी नारायण योग जुळून येणार आहे. तसेच ३० ऑक्टोबर रोजी नेपच्यून ग्रह पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे. यंदा दिवाळी आठवडाभर असणार आहे. दिवाळीचा हा सप्ताह कोणत्या राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या...
4 / 15
मेष: दिवाळीचा काळ सकारात्मक व यशस्वी असण्याची संभावना आहे. नवीन नोकरीच्या शोधात असाल तर त्यात यश मिळू शकते. व्यापारात अपेक्षित लाभ मिळेल. प्राप्तीचे नवीन मार्ग मिळून आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते. कुटुंबियांच्या सहवासात वेळ घालविण्याची संधी मिळेल. मुलांना आपले विचार पटू शकतील. प्रेम संबंध प्रगल्भ होऊन सौख्य प्राप्ती होऊ शकते. प्रेमिकेशी जवळीक वाढू शकते. एखादी मोठी भेटवस्तू सुद्धा मिळू शकते.
5 / 15
वृषभ: दिवाळीचा कालावधी मोठ्या जोशात घालवावा लागेल. कोणतेही कार्य घाईघाईत करू नये. लहान-सहान समस्या व व्यक्तिगत जीवनातील जवाबदाऱ्या असून मित्रांचा सहवास आनंदित करेल. कार्यक्षेत्री लोकांच्या गोष्टींकडे लक्ष देण्याऐवजी कामावर लक्ष केंद्रित करावे. युवकांचा बहुतांश वेळ मस्ती करण्यात व्यतीत होईल. परीक्षा व स्पर्धेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मेहनत करूनच यश प्राप्त होईल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.
6 / 15
मिथुन: समस्या व आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. आव्हाने आपले धाडस वाढविण्यासाठी असतील. कार्यक्षेत्री अतिरिक्त जबाबदारी येऊ शकते. एखाद्या मोठ्या योजनेत आर्थिक गुंतवणूक करताना तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्यावा लागेल. नोकरी करणाऱ्या महिलांना घर व कार्यालय यांच्यात समन्वय साधण्यात अडचणी येऊ शकतात. कारकीर्द व व्यापाराच्या दृष्टीने काही समस्या निर्माण झाल्या तरी उत्तरार्धात गोष्टी मनाप्रमाणे विकसित होतील. कुटुंबियांच्या भावनांचा विचार करावा. प्रेमिकेच्या भावना व अपेक्षा समजून घेण्याचा प्रयत्न करावा.
7 / 15
कर्क: ध्येयास प्राधान्य द्यावे लागेल. काम पूर्ण करण्यासाठी स्वतःला समर्पित करावे लागेल. अनावश्यक विलंब किंवा अस्थायी स्थगिती देऊ नये. कार्यक्षेत्री नेता बनण्याचा प्रयत्न करू नये. वरिष्ठ व कनिष्ठ यांच्या सहकार्याने काम केल्यास यश प्राप्ती होऊ शकते याची जाणीव ठेवावी. कालांतराने कार्यक्षेत्र, व्यापार व इतर क्षेत्रात चढ-उतार संभवतात. खूप परिश्रम करत असाल व त्याचा परतावा कमी मिळत असेल तर काहीसे निराश होण्याची संभावना आहे. परीक्षा व स्पर्धेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभ्यासात विशेष लक्ष लागणार नाही. वैवाहिक जोडीदाराशी समन्वय काहीसा कमी असू शकतो. एखादा जवळचा किंवा दूरवरचा प्रवास करावा लागू शकतो. हा प्रवास मनोरंजनात्मक व आरामदायी होऊ शकतो.
8 / 15
सिंह: दिवाळीचा सप्ताह सुख, शांती व लाभ देणारा आहे. प्रलंबित कामांना मित्र किंवा प्रतिष्ठित व्यक्तीच्या मदतीने पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. व्यवसाय, विस्तार योजनेसह प्रगती करेल. उत्तरार्धात सुख-सोयींशी संबंधित वस्तूंची खरेदी करताना खिश्याकडे लक्ष द्यावे लागेल. कार्यक्षेत्री मान-सन्मानात वाढ होईल. वरिष्ठ कामाची प्रशंसा करतील. आई-वडिलांचे सहकार्य व सौख्य प्राप्त होईल. कुटुंबात एखादे मंगल कार्य होण्याची संभावना आहे. प्रेमिकेच्या सहवासात सुखद क्षण घालवाल. वैवाहिक जोडीदाराशी उत्तम समन्वय साधू शकाल. एखादी चांगली बातमी मिळू शकते.
9 / 15
कन्या: दिवाळीचा काळ मिश्र फलदायी आहे. कार्यक्षेत्री कामाचा भार जास्त असेल. पूर्तता करण्यासाठी परिश्रम वाढवावे लागतील. व्यवहारात व व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल घडवून आणावा लागेल. असे करण्यात यशस्वी झालात तर आपली अवघडात अवघड कामे वेळेवर पूर्ण होऊ शकतील. कुटुंबाशी संबंधित एखादा मोठा निर्णय घेताना कुटुंबियांच्या भावना व अपेक्षा समजून घ्याव्या लागतील. प्रेमिकेच्या व्यक्तिगत जीवनात जरुरी पेक्षा जास्त हस्तक्षेप करणे टाळावे. अन्यथा संबंधात काहीशी कटुता येऊ शकते. दांपत्य जीवन सुखद होण्यासाठी जोडीदाराच्या गरजा समजून घ्याव्या लागतील. व्यस्त कार्यक्रमातून त्यांच्यासाठी थोडा वेळ काढावा लागेल.
10 / 15
तूळ: एखाद्या कामात मिळेलेले यश आनंदास कारणीभूत ठरेल. कारकीर्द किंवा व्यवसायानिमित्त दूरवरचे प्रवास करण्याची संधी मिळेल. मित्रांचे विशेष सकारात्मक सहकार्य मिळेल. पसंतीच्या ठिकाणी बदली किंवा पदोन्नतीची इच्छा पूर्ण होऊ शकते. कोणत्याही योजनेत आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी विशेष काळजी घेऊन त्यात असलेली जोखीम नीट समजून घ्यावी. असे असले तरी लॉटरीपासून दूर राहणे हितावह होईल. कुटुंबियांच्या सहवासात हसत-खेळत वेळ घालविण्याची संधी मिळेल. वैवाहिक जोडीदारासह अचानकपणे फिरावयास जाण्याचा बेत ठरू शकतो. प्रेमिकेच्या भावनांचा सन्मान करावा.
11 / 15
वृश्चिक: आगामी काळ काहीसा आव्हानात्मक असू शकतो. जास्त धावपळ करावी लागू शकते. सर्व समस्या दूर होऊन अपेक्षित यश मिळेल. कंत्राटावर काम करणाऱ्या व्यक्तींसाठी शुभ फलदायी आहे. कार्यक्षेत्री इतरांवर आपले विचार लादू नका. सहकाऱ्यांशी मिळून मिसळून कामे करावीत. अन्यथा समस्यांना सामोरे जावे लागून त्यात आपली प्रतिष्ठा मलिन होऊ शकते. प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी लागेल. दिनचर्या योग्य ठेवून आहारावर विशेष प्रमाणात नियंत्रण ठेवावे. दांपत्य जीवनातील गोडवा टिकून राहील.
12 / 15
धनु: वेळेचे व आर्थिक गोष्टींचे योग्य नियोजन करावे लागेल. संभवित समस्या टाळण्यासाठी सतर्क राहावे लागेल. घराच्या दुरुस्तीसाठी किंवा सुख-सोयींशी संबंधित वस्तूंची खरेदी कराल तेव्हा खिश्याकडे लक्ष द्यावे लागेल, जेणेकरून नंतर उधारी करावयास लागू नये. मित्र व नातेवाईक ह्यांच्यासोबत राहावे. आहारावर नियंत्रण ठेवावे लागेल. दिनचर्येतून थोडा वेळ योगासन व ध्यान-धारणेसाठी काढावा. वैवाहिक जोडीदाराशी प्रेम व सामंजस्य टिकवून ठेवावे.
13 / 15
मकर: सावध राहून वाटचाल करावी लागेल. मोठे नुकसान होण्याची संभावना असल्याने आळस व बेपर्वाई टाळावी लागेल. व्यवसायात तीव्र स्पर्धेस सामोरे जावे लागू शकते. फायद्यासाठी इतरांचे नुकसान करू नये. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतील. जमीन, घर, वाहन इत्यादींची खरेदी करताना स्वकीयांचा सल्ला घेऊन संबंधित विषयावर विचारपूर्वक निर्णय घ्यावा. प्रेमीजनांना एखादी महिला मित्र मदत करू शकेल. सर्वांना बरोबर घेऊन वाटचाल करावी लागेल. वाणीवर संयम ठेवावा. कटू शब्द टाळावेत. दांपत्य जीवनातील गोडवा टिकून राहील. कठीण प्रसंगी जोडीदार आपल्या पाठीशी राहील. कुटुंबातील एखाद्या वयस्कर व्यक्तीच्या प्रकृतीची काळजी आपणास वाटू शकते.
14 / 15
कुंभ: दिवाळीचा काळ सामान्यच आहे. कमकुवत बाजू शत्रू समोर उघड करणे टाळावे, अन्यथा ते त्याचा गैरफायदा घेऊ शकतात. मित्रांचे पूर्ण सहकार्य मिळेल. कुटुंबाशी संबंधित कोणताही मोठा निर्णय घेताना कुटुंबीय पाठीशी राहतील. बहुतांश वेळ धार्मिक-सामाजिक कार्यात व्यतीत होऊन मान-प्रतिष्ठेत वाढ होईल. प्रवास सुखद व लाभदायी होईल. एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीची ओळख संभवते, ज्याचा उपयोग भविष्यात एखादी लाभदायी योजना आखण्यात होऊ शकतो. प्रेम संबंध दृढ करण्यासाठी परस्पर समन्वय साधावा लागेल.
15 / 15
मीन: एक पाऊल मागे जाऊन दोन पाऊले पुढे जाण्याची संधी संभवत असल्याने कोणत्याही प्रकारचा संकोच बाळगू नये. ऊर्जा व वेळ योग्य दिशेत नेलेत तर कार्यात निश्चितच यशस्वी होऊ शकाल. एखाद्या प्रिय व्यक्तीच्या आगमनाने घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. व्यवसायात अपेक्षित लाभ मिळवू शकाल. परीक्षा व स्पर्धेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एखादी चांगली बातमी मिळू शकते. महिलांचा बहुतांश वेळ पूजा-पाठ किंवा धार्मिक प्रवृत्तीत व्यतीत होईल. प्रेम संबंध प्रगल्भ होतील. प्रेमिकेच्या सहवासात सुखद क्षण घालविण्याची संधी मिळेल. वैवाहिक जोडीदाराशी आपण उत्तम समन्वय साधू शकाल.
टॅग्स :Diwaliदिवाळी 2024Weekly Horoscopeसाप्ताहिक राशीभविष्यAstrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यchaturmasचातुर्मास