Vastu Tips: २०२५ संपण्याआधी घरात आणा 'या' ५ शुभ वस्तू, ज्या करतील २०२६ मध्ये भाग्योदय
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 13:06 IST
1 / 7या ५ वस्तू घरात आणल्याने लक्ष्मीचा वास राहतो, नकारात्मकता दूर होते आणि संपूर्ण वर्षभर सौभाग्य टिकून राहते, असे वास्तू शास्त्रात म्हटले आहे. कारण वस्तू या केवळ घराची शोभा वाढवत नाहीतर तर त्याबरोबरच सकारात्मक ऊर्जादेखील वाढवतात. त्यामुळे वास्तू आणि वैयक्तिक आयुष्यात भरभराटीसाठी पुढील गोष्टी २०२५ संपण्याआधीच घरी आणा. 2 / 7तुळशीला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. तुमच्या घरात मोठी बाग, अंगण नसले तरी छोटीशी बाग खिडकीत फुलवता येते आणि त्यात तुळस असणे अनिवार्य ठरते. ती धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहे. घरात तुळस लावल्याने सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि घरातील सदस्यांना आरोग्य लाभते. विशेषतः घराच्या उत्तर किंवा ईशान्य दिशेला तुळस ठेवल्यास आर्थिक स्थिरता येते. यासाठी तुळशीला रोज थोडे थोडे पाणी घाला आणि संध्याकाळी आठवणीने दिवा लावा.3 / 7फेंगशुई आणि वास्तुशास्त्रानुसार, लाफिंग बुढ्ढा (हसणारा बुद्ध) घरात ठेवणे शुभ मानले जाते. लाफिंग बुढ्ढा हे आनंद, समृद्धी आणि चांगल्या नशिबाचे प्रतीक आहे. तो घरात ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा आणि आनंदी वातावरण निर्माण होते. त्याला घराच्या मुख्य दारासमोर (प्रवेशद्वाराकडे तोंड करून) ठेवा, जेणेकरून तो घरात प्रवेश करणारी नकारात्मकता शोषून घेईल.4 / 7कासव हे भगवान विष्णूचे रूप मानले जाते आणि ते दीर्घायुष्य, स्थिरता आणि प्रगतीचे प्रतीक आहे. तांब्याचे, पितळ्याचे कासव घरात ठेवल्याने आर्थिक प्रगती होते आणि कामामध्ये स्थैर्य येते. तसेच, ते घरातील नकारात्मक ऊर्जा दूर ठेवते. कासवाला घराच्या उत्तर दिशेला किंवा पाण्याच्या भांड्यात ठेवा. त्याचे तोंड घराच्या आतल्या दिशेने असावे.5 / 7श्री यंत्राला देवी लक्ष्मीचे आसन मानले जाते. हे यंत्र धन, वैभव आणि ऐश्वर्याचे प्रतीक आहे. घरात किंवा कामाच्या ठिकाणी श्री यंत्राची स्थापना केल्यास आर्थिक अडचणी दूर होतात आणि व्यवसायात यश मिळते. दररोज सकाळी याची पूजा करून 'श्रीं' या मंत्राचा जप केल्यास लक्ष्मीची कृपा कायम राहते.6 / 7शंखाला भगवान विष्णू आणि लक्ष्मी दोघांशी जोडलेले आहे. पूजा-अर्चना करताना शंख वाजवल्याने सकारात्मकता येते. घरात दक्षिणावर्ती शंख ठेवल्याने घरात सुख-समृद्धी आणि धन-धान्य टिकून राहते. शंखाच्या आवाजाने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. शंखाला पाण्याने भरून देवघरात ठेवा आणि रोज पूजा झाल्यावर वाजवा.7 / 7नवीन वर्ष २०२६ मध्ये घरात या वस्तू स्थापित करून, तुम्ही तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि सौभाग्य आकर्षित करू शकता. या वस्तू आणि त्यामुळे निर्माण होणारी स्पंदनं तुम्हाला नवीन वर्षात नवीन ऊर्जा देतील तसेच तुम्हाला सकारात्मकता प्रदान करून आर्थिकदृष्ट्या सबळ आणि करिअरमध्ये प्रगतीपथावर नेतील असे वास्तू तज्ज्ञ सांगतात.