भारतातलं अनोखं मंदिर, ना कुठली मूर्ती ना पुजारी; दरवर्षी शेकडो घड्याळं नदीत टाकली जातात, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2022 02:42 PM2022-03-07T14:42:39+5:302022-03-07T14:46:33+5:30

भारतात अशा अनेक अजब आणि रहस्यमय गोष्टी आहेत. ज्या ऐकल्या तर त्यावर विश्वास बसणंही कठीण होतं. काही मंदिरांमध्ये अनोख्या परंपरा आजही निभावल्या जातात. लोकांची आस्था असलेल्या मंदिरात मोठ्या संख्येने भक्त पोहचतात.

भक्तांच्या या श्रद्धेवर विश्वास ठेवला जातो. आज आम्ही तुम्हाला मध्य प्रदेशातील मंदसौरच्या एका मंदिराची गोष्ट सांगणार आहोत ज्याठिकाणी कुठल्याही देवाची मूर्ती नाही. ना या मंदिरात कुठलाही पुजारी बसलेला असतो. तरीही याठिकाणी लोकं बऱ्याच प्रमाणात येतात.

आता तुम्ही म्हणाल, नेमकं ही भानगड काय? ज्याठिकाणी मूर्ती नाही, पुजारी नाही. तरी लोकं श्रद्धेने या मंदिरात त्यांच्या इच्छा मागण्यासाठी येतात. जाणून घेऊया, या मंदिराचं नाव सगस बावजी मंदिर(Sagas Bavji Temple) असं आहे. सगस बावजी म्हणजे यक्ष.

स्थानिक लोक मानतात की, सगस बावजींना शास्त्रात यक्ष म्हटले गेले आहे. ते पैशाचे रक्षण करतात. इथल्या लोकांचं म्हणणं आहे की, इथे यक्ष प्राकृत रूपात प्रकट होऊन दिशाभूल झालेल्या लोकांना मार्ग दाखवतात. त्यामुळे त्यांना योग्य दिशा मिळावी आणि त्यांच्या आयुष्यातील दु:ख दूर व्हावे, यासाठी दूरदूरवरून लोक येथे येतात.

या मंदिराशी संबंधित रंजक गोष्टी इथेच संपत नाहीत. त्यापेक्षा या मंदिरात भाविकांनी दिलेला नैवेद्यही खूप विचित्र आहे. लोक इथे येतात आणि सगस बावजींना घड्याळ देतात. असे केल्याने त्यांची वाईट वेळ निघून जाते आणि जीवनात आनंद येतो असे मानले जाते.

असं सांगितलं जातं की, या मंदिरात दर काही दिवसांनी घड्याळांचा ढीग लागतो. इतकंच नाही तर इथून एखाद्या व्यक्तीने घड्याळ चोरलं तर त्याच वेळेपासून त्याचा वाईट काळ सुरू होतो. त्यामुळे चुकूनही ही घड्याळे कोणी घरी नेत नाही असंही म्हटलं जातं.

जेव्हा मंदिरात घड्याळांचा ढीग असतो तेव्हा ते जवळच्या नदीत फेकले जातात. या मंदिरात घड्याळांचा एवढा ढीग पडूनही येथे कधी कुलूप लावले जात नाही. असे म्हणतात की, एकदा एका व्यक्तीने येथून ५ घड्याळे चोरली होती, त्यानंतर त्याची दृष्टी गेली

त्यानंतर हा व्यक्ती अंध म्हणून फिरत होता. कालांतराने त्याला कुणीतरी मंदिरात घड्याळ देण्यास सांगितले. तेव्हा त्याने मंदिराला १० घड्याळे आणली तेव्हा त्याचे डोळे पुन्हा बरे झाले. मुल होण्यापासून ते हरवलेल्या वस्तू मिळवण्यापर्यंत सर्व नवस फेडण्यासाठी लोक येथे येतात

असे म्हटले जाते की, यक्ष कोणतीही समस्या त्वरित सोडवतो, म्हणूनच लोक येथे आपल्या समस्येचे त्वरित निराकरण करण्यासाठी आणि वाईट काळ चांगल्यामध्ये बदलण्यासाठी प्रार्थना करण्यासाठी येतात. यक्ष देव ज्याला लोक येथे सगस बावजी या नावाने ओळखतात. त्यांची इच्छा देखील त्वरित पूर्ण होते.

हे अनोखे मंदिर मध्य प्रदेशातील मंदसौरमध्ये आहे. येथे लोक परंपरेनुसार घड्याळे भेट देतात. असं मानले जातं की, जेव्हा तुमच्या जीवनात खराब वेळ आली असेल तेव्हा येथे घड्याळ अर्पण करावे. घड्याळ याठिकाणी दिल्यावर तुमच्या जीवनातील वाईट वेळ निघून जाते आणि चांगली वेळ येते.