शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Ritual: 'हुंडा देणे' ही कुप्रथा भारतीय संस्कृतीत वा इतिहासात नव्हतीच, मग आली कुठून?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 15:29 IST

1 / 6
प्राचीन ग्रंथात, पुराणात, इतिहासात कुठेही हुंडा या शब्दाचाही उल्लेख नाही. उलट पूर्वी स्वयंवर योजले जात असून मुलीला ऐच्छिक वर शोधून विवाह करण्याची मुभा होती. एवढे स्वातंत्र्य आपल्या संस्कृतीत होते. मग हुंडा देण्याची संकल्पना आणि त्याच्या नावे केली जाणारी लूटमार कधी आणि कशी सुरु झाली? त्यामागचा इतिहास जाणून घेऊ.
2 / 6
वीणा तलवार ओल्डनबर्ग यांचे 'डॉवरी मर्डर: द इम्पीरियल ओरिजिन्स ऑफ अ कल्चरल क्राइम' यांच्या पुस्तकात दिलेल्या माहितीनुसार हेन्री सातव्याला त्याच्या मोठ्या मुलाचे लग्न स्पॅनिश राजकन्या, आरोगनची कॅथरीनशी करण्यासाठी खूप मोठा हुंडा मिळाला. ब्रिटिश भारतात येण्याच्या १०० वर्षांहून अधिक काळापूर्वी हे घडले होते. तेव्हा ते (भारतीय आणि ब्रिटिश) एकमेकांना ओळखत नव्हते. नंतर ते येथे आले आणि स्थायिक झाले. १८ व्या आणि १९ व्या शतकापर्यंत ब्रिटिश राजघराण्यातील विवाह भारतीयांसाठी गप्पा आणि चर्चेचा महत्त्वाचा विषय बनले.
3 / 6
त्यांचे अनुकरण म्हणून भारतातही हुंडा प्रथा सुरु झाली. मात्र तेव्हाच्या हुंड्याचे स्वरूप आतासारखे बीभत्स नव्हते. प्राचीन हुंड्याच्या पद्धतीनुसार वधूचे पालक, तिचे नातेवाईक, मित्रपरिवार तिला मौल्यवान भेटवस्तू संपत्ती स्वरूपात देत असत. ज्याला आपण स्त्रीधन असे म्हणतो. त्या भेटवस्तूवर वधूचा हक्क असे. वराचा किंवा त्याच्या कुटुंबीयांचा त्यावर हक्क नसे. यामुळे महिलांना आवश्यक आर्थिक स्वातंत्र्य मिळाले, जेणेकरून त्या शेतीच्या जमिनीतून मिळणारे उत्पन्न मिळवून चरितार्थ चालवू शकत असत.
4 / 6
ब्रिटिश आले आणि त्यांनी खाजगी मालकीच्या जमिनीवर अधिकार मिळवले आणि स्त्रीधनावरही डल्ला मारण्यास सुरुवात केली. स्त्रियांच्या मालमत्तेचे हक्क काढून घेतले. त्यामुळे सासरकडचे त्यावर हक्क सांगू लागले. आर्थिक स्थैर्य गेल्यामुळे स्त्रिया परावलंबी झाल्या आणि त्याचा लाभ विकृत मानसिकतेच्या लोकांनी घेत, मुलींना सांभाळण्याची रक्कम या अर्थाने हुंडा मागणे हा हक्क बनला. त्यामुळे मुलीचा जन्म हा वडिलांसाठी काळजीचा विषय बनला. यातूनच गर्भलिंग निदान करून भ्रूणहत्या सुरु झाली. विवाहापूर्वी आणि विवाहानंतर सासरकडच्या लोकांच्या मागण्या वाढू लागल्या. हे दुष्ट चक्र गुंतागुंतीचे होत गेले. सासरच्या जाचाला कंटाळून महिला आत्महत्या करू लागल्या, हत्येला बळी पडू लागल्या, तेव्हा सरकारने हुंडा बळीला विरोध करणारा कायदा तयार केला आणि त्यासाठी शिक्षा देण्यासही सुरुवात केली.
5 / 6
१९६१ साली हुंडा प्रतिबंधक कायदा भारतात पारित करण्यात आला. सदर कायद्याच्या कलम ३ नुसार हुंडा घेणाऱ्यास ५ वर्षें सक्त मजुरी आणि रु. १५०००/- पर्यंत दंडाची शिक्षा आहे. हुंडा मागणे हा देखील गुन्हा असून त्यासाठी ६ महिने पर्यंतची कैद आणि रु. १००००/- दंडाची शिक्षा आहे. जर एखाद्या मुलीच्या लग्नाच्या सात वर्षाच्या आत असामान्य परिस्थितीमध्ये ती मरण पावली तर हे सिद्ध केले जाते की मरणाआधी तिला हुंड्यासाठी तिला प्रताडित केले जात होते. यात भारतीय दंड संहिताच्या कलम ३०४-बीच्या अंतर्गत मुलीचा पती आणि नातेवाईक यांना कमीत कमी सात वर्ष ते आजीवन कारावासाची शिक्षा होऊ शकते.
6 / 6
५१ तोळे सोनं, चांदीची भांडी, फॉर्च्युनर गाडी, लाखाचं घड्याळ हुंड्यात देऊन आणि कोट्यवधी रुपये खर्चून लग्न लावून दिलं तरी वैष्णवी हगवणे ही नवविवाहिता या कुप्रथेला बळी पडली. १० महिन्याचं बाळ मागे सोडून तिने आत्महत्या केली. या प्रकरणाबाबत अनेक खुलासे आता समोर येत असले तरी गेलेली मुलगी आणि एका लहानग्या बाळाची आई परत येणार नाही हे दुर्दैव! हे घडू आपल्या बाबतीत घडू नये असे वाटत असेल तर सासरकडून होणाऱ्या दबावाला वेळीच विरोध करणे, तक्रार करणे आणि अन्यायाविरुद्ध वेळीच आवाज उठवणे हे गरजेचे आहे, हे सर्व मुलींनी लक्षात ठेवायला हवे!
टॅग्स :Vaishnavi Hagawane Death Caseवैष्णवी हगवणेmarriageलग्न