By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 18:31 IST
1 / 5दरवर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा काळ येत असल्याने, राखी बांधण्याच्या मुहूर्ताबद्दल आणि तिथीबद्दल बराच गोंधळ होतो. सोशल मीडियावर उलट सुलट चर्चा होते. त्यातून अनेक गैरसमज निर्माण होतात. ते दूर करण्यासाठी पंचांगात याबाबत काय माहिती दिली आहे ते पाहू. 2 / 5पंचांगानुसार, ज्या दिवशी 'विष्टी' करण असते, त्या दिवशी भद्रा काळ असतो. याचा संबंध चंद्राच्या करण आणि राशीतून होणाऱ्या भ्रमणाशी आहे. मुहूर्त चिंतामणी, मुहूर्त मार्तंड ग्रंथात याची सखोल माहिती मिळते. भद्राकाळ अशुभ मानला जातो. महत्त्वाची शुभ कार्ये भद्राकालात करू नयेत, असे म्हटले जाते. शास्त्रानुसार, जर मंत्रोपचार, पूजा व धार्मिक विधी करून रक्षाबंधन करायचे असेल, तर भद्राकालात केले जात नाही. पण, महाराष्ट्रात मंत्रोपचार, पूजा व धार्मिक विधी करून रक्षाबंधन करण्याची पद्धत नाही. तसेच भद्राकालात राखी बांधली तर वाईट होईल, असे जे म्हटले जाते, त्यात काहीही तथ्य नाही, असे तज्ज्ञ सांगतात. 3 / 5जेव्हा जेव्हा चंद्र मेष, वृषभ, मिथुन आणि वृश्चिक राशीत भ्रमण करतो तेव्हा भद्रा स्वर्गात राहते असे मानले जाते. तर, जेव्हा चंद्र कन्या, तूळ, धनु आणि मकर राशीत भ्रमण करतो तेव्हा भद्रा पाताळात वास करते असे मानले जाते. परंतु, जेव्हा चंद्र कर्क, सिंह, कुंभ आणि मीन राशीत भ्रमण करतो तेव्हा भद्रा पृथ्वीवर वास करते असे मानले जाते. जेव्हा भद्रा स्वर्ग आणि पाताळात वास करते तेव्हा तो अशुभ परिणाम देत नाही. पौराणिक ग्रंथ चिंतामणिनुसार, भद्रा जिथे राहते तिथे प्रभावी असते. स्थितभुर्लोस्थ भद्रा सदात्याज्ञ स्वर्गपातलग शुभ : याचा अर्थ असा की जेव्हा जेव्हा भद्रा पृथ्वीवर वास करते, तेव्हा कोणतेही शुभ कार्य भद्रामुक्त काळात करावे. अन्यथा, शुभ फळ मिळत नाही. 4 / 5९ ऑगस्ट रोजी चंद्र मकर राशीत वास करेल. भद्रा पाताळात वास करेल आणि भद्राचे तोंड खाली तोंड असेल. त्यामुळे ९ ऑगस्ट रोजी सकाळपासूनच रक्षाबंधन साजरी करता येईल. त्यावर भद्राचे सावट नसेल. मात्र पंचकाआधी रक्षाबंधन पार पाडावे. 5 / 5यंदा, शनिवार, ०९ ऑगस्ट २०२५ रोजी रक्षाबंधन आहे. श्रावण पौर्णिमा शुक्रवार, ०८ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ०२ वाजून १२ मिनिटांनी सुरू होत असून, शनिवार, ०९ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ०१ वाजून २४ मिनिटांपर्यंत समाप्त होत आहे. ०९ ऑगस्ट २०२५ रोजी उत्तररात्रौ ०२ वाजून ११ मिनिटांनी पंचक सुरू होत आहे. त्यामुळे पौर्णिमा कालावधीत किंवा पंचक सुरू व्हायच्या आधी रक्षाबंधन करावे, असे सांगितले जात आहे.