शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Garud Puran: स्मशानातून निघताना मागे वळून पाहू नका आणि चुकूनही काढू नका 'हे' शब्द!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 16:10 IST

1 / 7
हिंदू धर्मात एकूण १६ संस्कार सांगितले आहेत, त्यापैकी १६ वा संस्कार हा अंतिम संस्कार मानला जातो. त्याला जोडूनच प्रथा, परंपरा रुढींचे पालन केले जाते. वडीलधारी मंडळी सांगतात, त्याप्रमाणे आपण वागतो, पण काही गोष्टीचे ज्ञान आपण अनुकरणातून वा अभ्यासातून जाणून घ्यायला हवे. त्यापैकी एक म्हणजे अंत्यसंस्कारानंतर निघताना स्मशानभूमीकडे मागे वळून पाहू नये तसेच विशिष्ट शब्द उच्चारू नयेत. कोणते? त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
2 / 7
मृत्यू ही बाब जेवढी वेदनादायी आहे तेवढीच गूढदेखील आहे. देहावर शेवटचे संस्कार केले जातात, पण आत्म्याचे काय? तो अमर आहे, मग पुढे तो कुठे जातो? त्याला पुन्हा देहप्राप्ती होऊन नवीन जन्म मिळतो का? कोणत्या योनीत मिळतो? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात, ज्याची उत्तरे शास्त्रकारांनी गरुड पुराणात दिली आहेत. व्यक्तीच्या मृत्यूपश्चात त्याच्या घरी तेराव्या दिवसापर्यंत या पुराणाचे वाचन केले जाते, त्यात मृत्यूसंबंधी अनेक प्रश्नांची उत्तरे सापडतात. मृत व्यक्ती संसार बंधने सोडून निघून गेली तरी तिच्या पश्चात राहणाऱ्या लोकांवर सामाजिक, धार्मिक बंधने असतात आणि ती पाळावी लागतात. त्यासाठी गरुड पुराणात काही महत्त्वाचे नियम सांगितले आहेत. कोणते ते पाहू...
3 / 7
हिंदू धर्मात असे मानले जाते की अंत्यसंस्काराने शरीराचा नाश झाल्यानंतरही आत्मा कायम राहतो. अशा स्थितीत स्मशानभूमीतून बाहेर पडताना मागे वळून पाहिल्यास आत्म्याला पुढील जगात जाण्यास अडथळा होतो. तो याच संसारात घुटमळत राहतो. कुटुंबीयांची आसक्ती कमी होत नाही आणि त्यामुळे तो सद्गती मिळून परलोकी जाण्याऐवजी या मृत्युलोकात घिरट्या घालत राहतो. त्या आत्म्याला त्रास होऊ नये म्हणून विरक्त भावाने अंत्यसंस्कार झाल्यावर मागे वळून न पाहता पुढे निघून जावे असे गरुड पुराणात म्हटले आहे.
4 / 7
हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, सूर्यास्तानंतर अंत्यसंस्कार केले जात नाहीत. सूर्य हा प्रकाशाचा स्तोत्र आहे आणि त्याच्या अनुपस्थितीत म्हणजे रात्री सर्वत्र अंधार असतो. साधा प्रवास करताना आपल्याला चंद्र प्रकाशाची गरज भासते, तर विचार करा आत्म्याला परमात्म्याजवळ पोहोचतानाचा मार्ग किती कठीण असेल? हा प्रवास अंत्यसंस्कार झाले की सुरु होतो. सूर्यास्त झाला की हा प्रवास जिकिरीचा होऊ नये, म्हणून उजेडातच अंत्यविधी करावेत.
5 / 7
स्मशान भूमीत महिलांना प्रवेश नाकारण्याचे शास्त्रीय कारण म्हणजे महिला स्वभावाने कठोर असल्या तरी त्या संवेदनशील असतात. स्मशानातले वातावरण, तिथले विधी, गेलेल्या व्यक्तीच्या आठवणी आणि एकूणच माहोल पाहून मन उदास होते, मनावर ताण येतो, ते वातावरण अस्वस्थ करणारे असते. स्त्रीला नवनिर्मितीची जननी म्हटले आहे. ती जर स्मशानात गेली आणि तिचे मनोधैर्य खचले तर ती परत संसारात रमणार नाही. स्त्रीचे रडणे मृत आत्म्याला वेदनादायी ठरू शकते. बंधनात अडकवू शकते. हे टाळण्यासाठी महिलांवर स्मशानात न येण्याचे नियम घातले आहेत.
6 / 7
आत्म्याला देहातून मुक्ती मिळाली की तो परलोकी जातो. या प्रवासात वाटेत अडथळा होऊ नये म्हणून घरात एका कोपऱ्यात १३ दिवस अखंड तेलाचा दिवा लावला जातो. बाजूला पीठ टाकले जाते. त्यावरून आत्म्याचा प्रवास कोणत्या दिशेने होणार हे कळते याबद्दल गरुड पुराणात माहिती दिली आहे.
7 / 7
आपण कोणाला भेटलो की निघताना 'चला येतो' असे म्हणतो. सवयीप्रमाणे सांत्वनाला गेल्यावर मृत व्यक्तीशी संबंधित असलेल्या कुटुंबीयांची भेट घेऊन स्मशानातून निघताना 'येतो' असे बोलून जातो. हा शब्द त्या प्रसंगी उच्चारणे योग्य नाही. गरुड पुराणानुसार अंत्यविधीसाठी स्मशानात गेल्यावर तुम्ही हे शब्द उच्चारले तर दुर्दैवाने परत त्या स्थळी येण्याचा योग निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आठवणीने हा शब्द बोलणे टाळा!
टॅग्स :Puja Vidhiपूजा विधीDeathमृत्यू