शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 17:26 IST

1 / 8
भाद्रपद महिन्यात घरोघरी येणारे गणपती बाप्पा सार्वजनिक ठिकाणी देखील येऊ लागले आहेत. मात्र सार्वजनिक मंडळात सुरु असलेल्या चढाओढीचा परिणाम गणेश मूर्तीवर दिसू लागला आहे. मूर्तीची वाढती उंची, होणारे अपघात, मूर्तीचा दुखावला जाणारा अवयव आणि मंडळांची सारवासारव हे नित्याचेच झाले आहे. विशेषतः शहरात हे चित्र प्रकर्षाने दिसून येते. अलीकडे गावाकडेही त्याचे लोण पसरत चालले आहे. ते टाळण्यासाठी शास्त्रात दिलेले नियम जाणून घ्या.
2 / 8
शहरी भागात जिथे माणसाला राहायला जागा नाही, प्रवासाला पूरक रस्ते नाहीत, गर्दीची ठिकाणं आहेत, तिथे उत्सवाच्या नावावर मोठमोठे मंडप बांधून रस्त्याची आणि पर्यायाने जनतेची अडवणूक करणे सर्वार्थाने चुकीचे आहे. शिवाय मूर्तीसाठी वापरले जाणारे प्लॅस्टर ऑफ पॅरिस पर्यावरणासाठी घातक आहे. त्यावर शाडूची मूर्ती हा देखील पर्याय नाही! कारण शाडूची मातीदेखील लवकर निसर्गाशी एकरूप होत नाही.
3 / 8
काही लोक यावर पर्याय म्हणून चॉकलेट गणेश बनवण्यासारखा पोरकटपणा करतात. ती मूर्ती दुधात विसर्जित करून ते दूध गरीब मुलांना देतात. मात्र तसे करणे देखील शास्त्र मान्य नाही. गणपती ही देवता आहे, खेळणे नाही. दानधर्म करायचाच असेल तर स्वतंत्रपणे करावा, देवाच्या मूर्तीशी खेळ करून नाही. तरच त्याचे पुण्य लाभेल. गणेश उत्सवानिमित्त गरजू मुलांना बोलवून शालेय उपयोगी वस्तू, पुस्तकं, खाऊवाटप करून तुम्ही दानाचे श्रेय घेऊ शकता, पुण्य कमावू शकता, परंतु चॉकलेट मूर्ती बनवून तिचे विसर्जन करणे ही विटंबना आहे. मग धर्मशास्त्र काय सांगते?
4 / 8
गणपती हा पार्वती मातेचा सुपुत्र. पार्वती अर्थात शक्ती. जन्मदात्री भूमी. जिची मशागत करणारा शेतकरी पावसाळ्यात बियाणे पेरून कामातून उसंत घेतो, त्यावेळेस भाद्रपदात या काळ्या आईच्या गर्भातून अर्थात मातीतून वीतभर उंचीची मूर्ती बनवून तिची स्थापना करतो. लेकाबरोबर आईचाही पाहुणचार करतो. गौरी गणपती साजरा करतो आणि मातीतून निर्माण केलेली मूर्ती पाण्यात विसर्जित करतो. मग ते मातीयुक्त पाणी शेतात वापरले जाते. त्या पाण्याची वाफ होते आणि ते पाणी ढगात जाऊन पुन्हा जमिनीवर बरसते. म्हणजेच गणपती बाप्पाचा कृपाशिर्वाद ही प्रक्रिया पूर्ण करून आपल्यापर्यंत पोहोचतो. शास्त्रही तेच सांगतं....
5 / 8
आपला देश हा कृषिप्रधान आहे. आपण शेतकरी नसलो तरी आपले सगळे काम शेतीवर आवलंबून आहे. म्हणून शेतकऱ्यांचा जो सण, तो आपलाही सण! या कृतज्ञ भावनेने, आपणही भाद्रपदात येणाऱ्या चतुर्थीला गणेशोत्सव साजरा करतो. मात्र तो साजरा करताना धर्म शास्त्राने दिलेली नियमांची चौकट आपणही पाळायला हवी.
6 / 8
त्यासाठी गणेश मूर्ती ही मातीचीच असावी आणि वीतभर उंचीचीच असावी. जेणेकरून मूर्ती पाण्यात विसर्जित करणे सोपे जाईल आणि वर लिहिल्याप्रमाणे माती मिश्रित पाणी निसर्गाशी एकरूप होऊन कालांतराने त्या पाण्याची वाफ होऊन ढगात जाईल आणि त्याचेच पाणी पुन्हा जमिनीवर पडेल आणि बाप्पाचा कृपाशिर्वाद आपल्यावर कायम राहील.
7 / 8
म्हणून यंदा आपण पुढाकार घेऊन मातीचा किंवा फार फार तर शेणाच्या गणेश मूर्तीचा आग्रह धरूया आणि वीतभर उंचीची गणेश मूर्ती घरी आणून पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करूया. एकेकाने बदल केला तरी मोठा फरक पडेल हे कायम लक्षात ठेवा आणि सुरुवात स्वतः पासून करा.
8 / 8
अंगठ्यापासून पंजा उघडल्यावर मधल्या बोटाच्या उंची पर्यंतच मूर्ती मातीची, जी पाण्यात मिसळून जाईल, त्याच पाण्याची वाफ होऊन ते ढगात जाईल आणि पाऊस रूपाने त्याचा कृपाशीर्वादाचे पाणी आपल्यावर पडेल
टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव 2024Ganesh Festival Ritualsगणेशोत्सव विधीGanesh Chaturthiगणेश चतुर्थीTraditional Ritualsपारंपारिक विधीIndian Festivalsभारतीय उत्सव-सणganpatiगणपती 2024